
सेमीकंडटर क्षेत्रात भारताने झपाट्याने केलेली प्रगती ही केवळ औद्योगिक नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेची व धोरणात्मक स्वायत्ततेत घेतलेली उंच झेप आहे. १.६० लाख कोटींची गुंतवणूक, पहिला व्यावसायिक सिलिकॉन कार्बाइड फॅब यामुळे भारत ‘डिजिटल डायमंड्स’ क्षेत्रातील जागतिक खेळाडू म्हणून उदयास आला आहे.जगाच्या औद्योगिक क्रांतीत कधीकाळी कोळसा आणि नंतर तेल हे काळे सोने ठरले. मात्र, २१व्या शतकाच्या डिजिटल युगात चिप्स म्हणजेच सेमीकंडटर हेच खरे ‘डिजिटल डायमंड्स’ ठरले आहेत. स्मार्टफोनपासून चारचाकींपर्यंत, कृत्रिम बुद्धिमत्तेपासून संरक्षण क्षेत्रातील रडारपर्यंत-सेमीकंडटरशिवाय आधुनिक जीवनाची कल्पनाही करवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे जे म्हटले आहे की, "ज्याच्याकडे चिप्सची ताकद आहे, त्याच्याकडे २१व्या शतकाचे सामर्थ्य आहे,” ते यथायोग्य असेच. भारताने २०२१ साली ‘इंडिया सेमीकंडटर मिशन’ सुरू करत, आत्मनिर्भरतेकडे पहिले पाऊल टाकले आणि आज ‘सेमीकंडटर मिशन २.०’च्या स्वरूपात या क्रांतीला गती देण्याचे काम करण्यात आले आहे. विशेषतः अमेरिकेबरोबरचे संबंध तणावपूर्ण असताना, भारतातील पहिली सेमीकंडटर उत्पादन प्रक्रिया सक्रिय झाली, हे शुभ वर्तमानच!
सध्या जागतिक सेमीकंडटर बाजारपेठ अंदाजे ६०० अब्ज डॉलर्सची असून, एका अहवालानुसार, पुढील दशकात ही बाजारपेठ एक ट्रिलियन डॉलरपेक्षाही मोठी होणार आहे. यापैकी ५० टक्के बाजारपेठ ही आशियात असून, यात तैवान, दक्षिण कोरिया, चीन यांचा समावेश आहे. अमेरिका संशोधन आणि चिप डिझाईनमध्ये अग्रेसर आहे. भारत या क्षेत्रात आजही आयातीवर अवलंबून असून, सुमारे ९० टक्के चिप्स या विदेशातून येतात. म्हणूनच, या क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर होणे किती गरजेचे होते, हे अधोरेखित होते. भारत सरकारने त्यासाठीच स्थानिक पातळीवर सेमीकंडटर उत्पादनाला चालना देत, आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठीही ते नितांत गरजेचे असेच आहे.
‘सेमीकंडटर मिशन’ अंतर्गत आजवर दहा प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून, एकूण १.६० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक भारताच्या औद्योगिक नकाशावर निर्णायक ठरणार आहे, हे नक्की! ओडिशामध्ये देशातील पहिला व्यावसायिक ‘सिलिकॉन कार्बाइड फॅब’ उभारला जात असून, तो उच्च-तापमान सहन करणार्या सेमीकंडटरची निर्मिती करेल. ऊर्जा, इलेट्रिक वाहने आणि संरक्षण क्षेत्रात त्यामुळे क्रांती घडेल. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील साणंद येथे भारताच्या पहिल्या सेमीकंडटर उत्पादनाचे केंद्र सुरू झाले. ही ऐतिहासिक अशीच घटना असून, चिपच्या डिझाईनपासून पॅकेजिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया भारतातच पूर्ण केली जाणार आहे. एका आकडेवारीनुसार, या प्रकल्पांमुळे पाच लाख थेट तसेच अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. विशेषतः अभियांत्रिकी, इलेट्रॉनिस, संशोधन, सॉफ्टवेअर या क्षेत्रांमध्ये प्रचंड संधी निर्माण होणार आहेत.
१९९०च्या दशकात भारताची ओळख ‘जगाचे बॅक ऑफिस’ म्हणून झाली. आता त्यापुढील अध्याय म्हणजे जगाच्या डिजिटल भवितव्याचा कार्यशाळा होण्याचा. सेमीकंडटर, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, दूरसंचार या क्षेत्रातील भारताची आत्मनिर्भर वाटचाल भारत हा केवळ सेवा पुरवणारा देश नाही, तो जगाला तंत्रज्ञानही देतो, हे यातून स्पष्ट होईल. भारतात बनलेली पहिली सेमीकंडटर चिप हा क्षण ‘आत्मनिर्भर भारता’साठी सुवर्णाक्षरात कोरून ठेवावा असाच आहे. यातून भारताने जगाला हे दाखवले की, भारत जागतिक अस्थिरतेचे आर्थिक संधीमध्ये रूपांतर करण्यात सक्षम आहे. सेमीकंडटर हा केवळ आर्थिक नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीचा महत्त्वाचा घटक ठरत आहे. संरक्षण, अंतराळ, दूरसंचार प्रणालींसाठी चिप्सची आयात करण्यासाठी भारत मोठा खर्च करतो.
‘सेमीकंडटर मिशन २.०’ ही केवळ पहिल्या टप्प्याची पुनरावृत्ती नाही, तर ते प्रत्यक्षात सेमीकंडटरच्या निर्मितीला चालना देणारे आहे. यात उच्च-तंत्रज्ञानाच्या फॅब युनिट्ससाठी आर्थिक साहाय्य दिले जाईल. ओएलईडी आणि अमोलेड स्क्रीनच्या स्थानिक निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जाईल. भारतीय नवोद्योगांना चिप डिझाईनमध्ये जागतिक स्पर्धेसाठी तयार करण्यात येत असून, देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये सेमीकंडटर डिझाईनसंबंधी अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याचवेळी, जपान, तैवान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यासोबत तांत्रिक भागीदारीही करण्यात येत आहे. म्हणजेच, या उद्योगाला आवश्यक ते कुशल मनुष्यबळ देशातच कसे उपलब्ध होईल, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. अमेरिकेबरोबरच्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर याचे महत्त्व ठळकपणे समोर येते. सेमीकंडटर क्षेत्रातील अवलंबित्व संपुष्टात आल्याने भारताला त्याचा थेट लाभ होणार आहे. देशांतर्गतच त्याचे उत्पादन झाल्याने, भारताचे विदेशी चलन वाचेल, पुरवठा साखळी स्थिर राहिल्याने, बाहेरील देशांवरील अवलंबित्व कमी होईल, तसेच निर्यातक्षमता वाढल्याने, भारत जागतिक सेमीकंडटर निर्यातदार म्हणून येत्या काही काळात आंतरराष्ट्रीय नकाशावर नवी ओळख प्रस्थापित करेल. अमेरिकेतील नामांकित माध्यम समूह ‘सिंलेअर’नेही भारताच्या सेमीकंडटर क्षेत्रातील प्रगतीचे विशेष कौतुक केले आहे. एका विशेष अहवालात भारताने गेल्या काही वर्षांत दाखवलेली गती ही जागतिक स्तरावरील आश्चर्यकारक घडामोड असल्याचे त्याने आवर्जून नमूद केले आहे.
सेमीकंडटर क्षेत्रात भारताला अजूनही बरेच काही साध्य करायचे आहे. तंत्रज्ञान हस्तांतरण हे प्रमुख आव्हान भारतासमोर आहे. उच्च-तंत्रज्ञानाच्या फॅब्रिकेशन प्रक्रियेवर अजूनही काही देशांची मक्तेदारी असून, भारताला त्यासाठीचे तंत्रज्ञान अवगत करावे लागेल. एका मोठ्या फॅबला दररोज २० दशलक्ष लीटर पाणी लागते. ही पायाभूत सुविधा उभारणे म्हणूनच मोठे आव्हान. चिप्स डिझाईन व उत्पादनासाठी विशेष कौशल्य असलेले अभियंते लागतील. त्यासाठीच केंद्र सरकार कौशल्य विकास करणार्या अभ्यासक्रमावर भर देत आहे. तैवान (टीएसएमसी), द. कोरिया (सॅमसंग), अमेरिका (इंटेल) यांच्याशी भारताची थेट स्पर्धा असेल. भारत आज ‘डिजिटल डायमंड्स’कडे झेपावत आहे. ‘सेमीकंडटर मिशन २.०’ हे केवळ औद्योगिक धोरण नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेचे ते कवच असून, आर्थिक स्वातंत्र्याची पायरी आणि आत्मनिर्भर भारताचे मूर्त रूप आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. भारत या क्षेत्रात जितका सक्षम होईल, तितका तो २१व्या शतकात जागतिक महासत्ता होण्याकडे वेगाने वाटचाल करेल, यात दुमत नाही!