सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा पाऊस
३४८ तक्रारींपैकी ३०६ तक्रारींचे १०० मिनिटात जलद निराकरण
01-Nov-2024
Total Views | 46
2
ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता ( code of conduct ) लागु आहे. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यात सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात ३१ ऑक्टोबर दुपारपर्यंत ३४८ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींमधील ३०६ तक्रारींचे १०० मिनिटांच्या आत जलद निराकरण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रात एकूण ३४८ पैकी ३२४ तक्रारी दखलपात्र असून उर्वरित २४ तक्रारी अदखलपात्र आहेत. या ३२४ दखलपात्र तक्रारींमधून ३०६ तक्रारींचे १०० मिनिटाच्या आत निराकरण करण्यात आले असून उर्वरित तक्रारींचेही निराकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सी-व्हिजिल कक्षाचे जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी विजयसिंह देशमुख व सहाय्यक समन्वय अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी दिली.
“सी व्हिजिल” वर तक्रार करा.
निवडणुकीच्या दरम्यान काही अनियमितता किँवा आचारसंहिता भंगाविषयी काही बाबी आढळून आल्यास नागरिकांना “सी व्हिजिल” या ॲप्लिकेशनच्या माध्मातून संदेश, फोटो, व्हिडिओ व्दारे ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतात. या ॲपवर तक्रार प्राप्त झाल्यापासून १०० मिनिटांच्या आत तक्रारीचे निवारण केले जाते.