मुंबई : मुंबईच्या सायन
भागात राहणाऱ्या अक्षय रिडलाण या तरुण अभियंत्याने एक अनोखी कल्पना प्रत्यक्षात
उतरवली आहे. त्याने तयार केलेल्या 'मिलाप सेतु' या प्लॅटफॉर्ममुळे हरवलेले लोक त्यांच्या कुटुंबांपर्यंत
परत पोहोचू शकतात. ही योजना 'प्रोजेक्ट चेतना' अंतर्गत राबवली जात आहे.
या प्रकल्पात कृत्रिम
बुद्धिमत्ता (AI) वापरून
हरवलेल्यांना शोधले जाते. विशेष QR कोड असलेले लॉकेट किंवा पेंडंट व्यक्तींना दिले जाते. हे
स्कॅन केल्यावर त्या व्यक्तीची ओळख, नाव, संपर्क, आजार यांची माहिती एका प्रणालीतून उपलब्ध होते. यामुळे
हरवलेल्यांना ओळखणे सोपे होते. अनेक वेळा वृद्ध नागरिक किंवा अल्झायमर झालेल्या
व्यक्ती रस्ता चुकतात. ते घरचा पत्ता विसरतात. अशा वेळी या पेंडंटचा उपयोग होतो.
कोणीही हा QR कोड
स्कॅन करू शकतो आणि संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाशी संपर्क करू शकतो.
अक्षय रिडलाण यांच्या
ओळखीतील एका व्यक्तीचे वडील हरवले असताना त्यांना ही कल्पना सुचली. त्यांना
अल्झायमर होता. या घटनेनंतर त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्रणाली शोधून
काढली. ही सेवा मोफत किंवा खूप कमी दरात पुरवली जाते. हा प्रकल्प केवळ शहरापुरता
मर्यादित नसून त्याचा वापर देशभर केला जाऊ शकतो. विशेषतः वृद्ध,
लहान मुलं, मानसिक आजार असलेली मंडळी यांच्यासाठी हे फार फायदेशीर आहे.
हे पेंडंट साधारण ३०० ते ५०० रुपयांच्या
दरात उपलब्ध आहे.
पोलिसांची मदत आणि
प्रत्यक्ष उदाहरण!
मुंबई पोलिसांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून १२ वर्षांचा हरवलेला मुलगा शोधला. हा मुलगा मानसिकदृष्ट्या दुर्बल होता. तो कुलाब्याला सापडला. त्याच्या गळ्यात 'मिलाप सेतु' पेंडंट होते. पोलिसांनी QR कोड स्कॅन केला आणि थेट त्याच्या पालकांशी संपर्क केला.