- दि. 15 ऑगस्टपासून होणार सुरुवात; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली घोषणा
19-Jun-2025
Total Views | 10
मुंबई : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक जलद आणि किफायतशीर होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी तीन हजार रुपयांची ‘वार्षिक फास्टॅग टोल पास’ प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही प्रणाली दि. 15 ऑगस्ट रोजीपासून देशभरात उपलब्ध असेल. या पाससाठी एकाच वेळी तीन हजार रुपयांनी रिचार्ज केला जाईल. त्याची वैधता एक वर्षासाठी किंवा 200 टोल प्लाझा फेर्यांपर्यंत (जे आधी असेल तोपर्यंत) असेल. यात वाहनमालकांची वर्षाला सात हजार रुपयांची बचत होणार आहे.
‘फास्टॅग’ वार्षिक पासमुळे 7 हजारांची बचत
त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांसाठी आम्ही एक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एक वार्षिक पास सुरू करण्यात येत आहे, ज्याची किंमत केवळ तीन हजार असेल, जिथे नागरिकांना दहा हजार टोल भरावा लागत होता, तो आता केवळ तीन हजार असेल. याची वैधता एक वर्ष किंवा 200 प्रवास इतकी असेल. एकदा टोल पास केला की, एक प्रवास ग्राह्य धरला जाईल. 200 टोल म्हणजे 200 ट्रिप असे समजले जाईल. यानुसार एका टोलची सरासरी किंमत 15 रुपये इतकी पडेल. एका टोलसाठी 50 रुपये जरी गृहित धरले, तरी एकूण किंमत दहा हजार रुपये इतकी होते. मात्र, हा प्रवास केवळ तीन हजारांत करता येईल. वार्षिक पासमुळे वर्षाकाठी सात हजार रुपयांची बचत होईल. नव्याने येणार्या प्रणालीमुळे टोल नाक्यावर थांबावेही लागणार नाही. ही योजना केवळ राष्ट्रीय महामार्गांसाठी आहे. कोणत्याही राज्यांतर्गत मार्गावर ही योजना लागू नसेल.”
पास काढण्यासाठी काय आहेत अटी?
या पाससाठी ‘राजमार्ग यात्रा’ अॅप आणि ‘एनएचएआय’, ‘एमओआरटीएच’ वेबसाईटवर लवकरच एक वेगळी लिंक उपलब्ध करून दिली जाईल. तिथेच रिचार्ज करता येईल. ही प्रक्रिया सोपी आणि सुलभ असेल.
हा वार्षिक पास वाहन आणि त्याला जोडलेल्या ‘फास्टॅग’ची पडताळणी केल्यानंतरच सक्रिय होईल. यासाठी नवीन ‘फास्टॅग’ खरेदीची आवश्यकता नाही. हा पास तुमच्या वाहनात आधीच बसवलेल्या ‘फास्टॅग’मध्ये रिचार्ज करता येईल.
यासाठी ‘फास्टॅग’ तुमच्या वाहनाच्या विंडशील्डवर योग्यरित्या चिकटलेला असावा व वैध वाहन नोंदणी क्रमांकाशी जोडलेला असावा. तसेच, तो काळ्या यादीत नसावा, या अटी असतील.