डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा रत्नागिरीत रविवारी विशेष सत्कार
19-Jun-2025
Total Views | 8
रत्नागिरी: ‘पितांबरी’ उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक तथा जागतिक स्तरावर कोकणाचा गौरव वाढवणारे यशस्वी उद्योजक डॉ. रवींद्र वामन प्रभुदेसाई यांचा ‘रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघ’ यांच्यावतीने रविवार, दि. 22 जून रोजी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांनी त्यांना ‘डी.लिट.’ (डॉक्टरेट) पदवी बहाल करून सन्मानित केले असून, त्यानिमित्ताने राणी लक्ष्मीबाई सभागृह, शेरे नाका येथे सायंकाळी 4.30 वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष कार्यक्रमात ‘कर्हाडे ब्राह्मणांचा इतिहास’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ. प्रभुदेसाई यांच्या हस्ते होणार आहे. या पुस्तकाचे मूळ लेखन विष्णू वासुदेव आठल्ये यांनी केले असून, प्रथम आवृत्ती 1947 साली प्रकाशित झाली होती. डॉ. प्रभुदेसाई यांनी ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.’ या कंपनीची स्थापना करून 11 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणली आहेत.
डॉ. प्रभुदेसाई यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार, उद्योग श्री, कोकण आयडॉल, इंडियाज ग्रेटेस्ट ब्रॅण्ड्स, ‘कर्हाडे भूषण पुरस्कार’ आदी 35 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ते ‘अखिल भारतीय ब्राह्मण संघ’, ‘विश्व हिंदू परिषद’, ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’, ‘सॅटर्डे क्लब’ यांसारख्या दहापेक्षा अधिक संस्थांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. कार्यक्रमात कर्हाडे समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर आणि उपाध्यक्ष मानस देसाई यांनी केले आहे.