भाईंदर : कलेच्या आस्वादाला वय, पैसा, प्रतिष्ठा यांचे बंधन नसते, कला केवळ जगणे समृद्ध करते. अशाच जगणे समृद्ध करणाऱ्या कलांची जोपासना करण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तर्फे ‘अभिरुची जोपासना कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथे ही कार्यशाळा होणार आहे. कलांची आवड असणारी कोणतीही व्यक्ती या कार्यशाळेत सहभागी होऊ शकते. या कार्यशाळेत अभिरुची संपन्नता कशासाठी, मैत्री पुस्तकांशी, शास्त्रीय संगीताचा ‘कान’ तयार करणे, सुगम आणि चित्रपट संगीत : अनुभव आणि आनंद, चित्रपट पाहण्याची दृष्टी, नाटक समजून घेताना, रसिक नजरेतून चित्रकला, शिल्पकला : निर्जीवातील जिवंतपणा या विषयांवर या कार्यशाळेत चर्चा होणार आहे. दिग्ग्ज मान्यवरांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत मिळणार आहे सोबतच सहभागी होणार प्रत्येक व्यक्तीला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क ४००० रुपये (निवास, भोजन व प्रशिक्षण साहित्यासह) आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी विनय मावळणकर (९०९६५४८२५०), अनिल पांचाळ (९९७५४१५९२२) यांच्याशी संपर्क साधावा.