मुंबई : बुधवारी उबाठा गटाची पहिली यादी जाहीर झाली. यात आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा वरळीतून संधी देण्यात आली आहे. मात्र, मागील वर्षी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यातून लढण्याचं आव्हान दिलं होतं. त्याचं आता काय झालं? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणूकांचे वारे वाहत आहेत. यावेळी ठाकरे कुटुंबातील दोन्ही सुपुत्र निवडणूकीच्या रिंगणात आहेत. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहिममध्ये तर आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतून लढणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.
परंतू, गेल्या वर्षी आदित्य ठाकरेंनी एका कार्यक्रमात मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार, असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं होतं. यावर एकनाथ शिंदेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. "जेव्हा त्यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शिवसेनेत काम करत आहे. त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांवर मी काय बोलणार?" असे ते म्हणाले होते. मात्र, आता आदित्य ठाकरेंना वरळीतून तिकीट मिळालं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे शिंदेंविरोधात लढणार होते त्याचं काय झालं? असा सवाल करण्यात येत आहे.