मुंबई : लंडनमध्ये असलेली महाराष्ट्र मंडळ ही इमारत राज्य सरकार लिलावात ताब्यात घेणार असून तिथे लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती मराठी भाषा तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. बुधवार, ३ सप्टेंबर रोजी मंत्रालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, "लंडनमध्ये महात्मा गांधी दुसऱ्यांदा स्वातंत्र्याच्या वाटाघाटीसाठी गेले असताना त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहायक डॉ. एन. सी. केळकर व्यक्ती होते. त्यांनी पुढाकार घेऊन लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळ स्थापन केले. त्याठिकाणी महाराष्ट्र मंडळ वापरत असलेल्या इमारतीचा लिलाव झाला असून महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाने त्या मंडळाला ५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. लंडनमध्ये मराठी भवनासाठी तो लिलाव घेतला. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग आणि तिथले बृहन्मराठी मंडळा असा एक सामंजस्य करार करणार आहोत. त्या माध्यमातून लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एक-दोन महिन्यात लंडन येथे ती जागा ताब्यात घेण्याचा कार्यक्रम करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र हे जगाचे मराठी भाषेचे केंद्रस्थान लंडनमध्ये तयार करणार आहे. त्या केंद्राशी जगाचा संपर्क कसा होईल यासाठी यंत्रणा तयार करणार असून अशा प्रकारे एखाद्या भाषेचे वैश्विक केंद्र तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे."
ऑनलाईन क्लासेसद्वारे मराठी भाषा शिकवणार"या परिसरात १ लाख मराठी बांधव आहे. त्यांच्या मुलांना मराठी चांगले शिकता यावे यासाठी एक अभ्यासक्रम तयार करत असून त्या इमारतीमध्ये त्याचे एक ट्रेनिंग सेंटर तयार करणार आहोत. लंडनप्रमाणेच महाराष्ट्रातही एक अॅप तयार करून किंवा ऑनलाईन क्लासेस घेऊन मराठी भाषा शिकवण्याचा उपक्रम हाती घेणार आहोत. या वर्षात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. यासोबतच केंब्रिज विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठाशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घेऊन हे युनिट आणखी मजबूत बनवणे ही आमची जबाबदारी आहे. तसेच भविष्यात या परिसरात विश्व मराठी संमेलन घेण्याचाही विचार करणार आहोत. राजकारणाच्या पलीकडे मराठी भाषा आणि मराठीपण आहे हे महायूती सरकारने दाखवून दिले आहे. मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी शिष्यवृत्ती देणार आहोत. तसेच उद्योग विभागाच्या माध्यमातून अन्य काही उपक्रम सुरु करण्याचाही प्रयत्न करणार आहोत," असेही त्यांनी सांगितले.
एमआयडीसीचे मिलाप अॅप लॉन्च"एमआयडीसीच्या जागेचे वाटप कसे झाले, त्यासाठी कुणाची शिफारस होती, यासाठी अनेक पत्रकार परिषदा झाल्यात. त्या बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या जागेच्या वाटपासाठी ऑनलाईन एका अॅपच्या माध्यमातून व्हावी, तिथे माणसाचा संपर्क राहू नये, यासाठी एमआयडीसीने मिलाप (MALLAP) नावाचे अॅप लॉन्च केले आहे. यामुळे एमआयडीसीमध्ये पारदर्शकता येणार असून कुणालाही बोट ठेवायला जागा उरणार नाही. ज्याला जमीन हवी आहे, त्याने घरीच मोबाईल उघडून तिथे माहिती भरावी. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो पात्र असल्यास सातव्या दिवशी त्याला जमीन मिळणार आहे," अशी माहितीही मंत्री उदय सामंत यांनी दिली.