लोकशक्ती एक्सप्रेसला सफाळे येथे थांबा मंजूर ; खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

    03-Sep-2025
Total Views |

वाडा , सफाळे व पंचक्रोशीतील प्रवाशांना मोठा दिलासा देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून लोकशक्ती एक्सप्रेसला आता सफाळे येथे दोन्ही बाजूंनी थांबा मंजूर करण्यात आला आहे.

कोरोना काळात या गाडीचा सफाळे स्थानकावरील थांबा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे व्यवसाय, नोकरदार वर्ग तसेच शेतकरी व फुलबाग उत्पादकांना पहाटे मुंबईकडे जाण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. भाजीपाला, फुले, दूध व इतर वस्तू वेळेवर पोहोचविण्यास अडथळे येत होते.

या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून अखेर सफाळेकरांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय केवळ एका गाडीच्या थांब्यापुरता मर्यादित न राहता सफाळे, पालघर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि दैनंदिन प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि वेळेत होईल. परिसराच्या विकासाला गती मिळेल.

या संदर्भात खासदार डॉ. हेमंत सवरा म्हणाले, “जनतेच्या अडचणी दूर करणे, प्रवाशांना सोयी उपलब्ध करून देणे आणि भागाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य करणे ही माझी प्राथमिकता आहे. सफाळे स्थानकावर लोकशक्ती एक्सप्रेसचा थांबा हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा असून तो आपल्या सर्वांच्या सहकार्याने शक्य झाला आहे.”