पिंगुळी गावातील ‘चित्रकथी’ महोत्सव

    22-Oct-2024
Total Views | 38
pinguli village chitrakathi mahotsav


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी या गावात दि. 17 आणि दि. 18 ऑक्टोबर रोजी ‘चित्रकथी रामायण महोत्सव 2024’ संपन्न झाला. ‘चित्रकथी’ या लोककला प्रकारावर आधारित हा अशा प्रकारचा हा पहिलाच महोत्सव लक्षवेधी ठरला. या महोत्सवाच्या निमित्ताने पिंगुळीतील ‘चित्रकथी’ या लोककला परंपरेचा हा थोडक्यात घेतलेला आढावा...

‘चित्रकथी’ या पारंपरिक लोककला प्रकाराला प्रोत्साहन मिळावे, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि ही लोककला तरुण पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहयोगाने, ‘दायती लोककला संवर्धन अकादमी, पिंगुळी’तर्फे ‘चित्रकथी रामायण महोत्सव 2024’ दि. 17 आणि दि. 18 ऑक्टोबर रोजी पिंगुळी गावातील ‘ठाकरवाडी संग्रहालय’ येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन भारत सरकारचे माजी सांस्कृतिक अधिकारी ओमप्रकाश भारती यांच्या हस्ते झाले.

या महोत्सवाला ‘दायती लोककला संवर्धन अकादमी’चे संस्थापक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते लोककलाकार गणपत मसगे, पिंगुळीचे सरपंच अजय आकेरकर, उपसरपंच सागर रणसिंग, सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज अध्यक्ष शशांक आटक, पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भगवान रणसिंग, ‘ठाकर आदिवासी लोककला संवर्धन पर्यटन संस्थे’चे अध्यक्ष भास्कर गंगावणे उपस्थित होते. ‘लवकुश’, ‘सीता स्वयंवर’, ‘पंचवटी’, ‘सुंदरकांड’, ‘युद्धकांड’, ‘बालकांड’ आणि ‘ताटिका बंध’ या रामायणावर आधारित ‘चित्रकथी’ या महोत्सवात सादर झाल्या. सोबतच, ‘रामायण व चित्रकथी परंपरा’ या विषयावर आधारित चर्चासत्रसुद्धा चांगलेच रंगले. एकूणच या महोत्सवाला चित्रकथी कलाकारांचा आणि प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘चित्रकथी’ म्हणजे चित्र दाखवून कथाकथन करण्याची अनोखी कला. चित्र आणि आदिवासी समाज यांचे एक घट्ट नाते. निसर्गाच्या सान्निध्यात अधिकाधिक राहिल्यामुळे निसर्गातील विविध रंगछटा आदिवासी बांधवांच्या मनात अगदी खोलवर रुजलेल्या असतात आणि त्यातूनच ‘वारली’सारखे अनेक समृद्ध चित्रकलाप्रकार नावारुपाला आले. ‘चित्रकथी’ हीसुद्धा चित्रांच्या साहाय्याने सादर केली जाणारी अशीच एक समृद्ध कला. ठाकर समाजात ही कला अस्तित्वात आली आणि त्यांनीच ती वाढवली आणि जीवंतही ठेवली. रामायण किंवा महाभारतातील एखादे आख्यान निवडून 12 ते 15 इंचांच्या कागदावर त्याची चित्रे रेखाटली जातात. त्या चित्रांमध्ये नैसर्गिक रंगांचा प्रामुख्याने वापर केला जातो. ती चित्रे समोर ठेवून तंबोरा, टाळ आणि हुडुक या वाद्यांच्या तालावर त्या चित्रातील कथेचे कथन करून ‘चित्रकथी’ सादर केली जाते. ‘चित्रकथी’ ही कला फक्त चित्र काढण्यापुरती मर्यादित नाही, तर चित्र काढणे, त्यात रंग भरणे, त्या चित्रातील कथेचे कथन करणे, सूत्रसंचालन करणे, वाद्ये वाजवणे आणि जोडीला गाणी म्हणणे अशा अनेक कलांचा संगम या एका प्रकारात असतो. त्यामुळे लेखन, कथन, वादन, निवेदन आणि चित्रकला अशी अनेक कौशल्ये या ‘चित्रकथी’ कलाकारांना अवगत असावी लागतात.

‘चित्रकथी’च्या कलेचा उल्लेख 12व्या शतकात सोमेश्वर लिखित ‘मानसोल्लास’ या प्रसिद्ध ग्रंथात आढळतो. यावरुन या कलेला अनेक शतकांची समृद्ध परंपरा आहे, हे लक्षात येते. देशात अन्यत्र ही कला फारशी अस्तित्वात नसली, तरी ज्या गावात हा महोत्सव झाला, त्या पिंगुळी गावात मात्र आजही ही कला जीवंत आहे. ‘चित्रकथीचे गाव’ म्हणूनही या गावाला ओळखले जाते. या गावाला ही ओळख मिळण्यामागे कारण ठरली, या गावातील ठाकरवाडी आणि ठाकर समाज. ठाकर लोक हे जन्मतःच कलाकार असतात असे म्हटले, तरी ते वावगे ठरणार नाही. इतक्या नानाविध कला या समाजातील बांधवांनी आत्मसात केलेल्या दिसतात. शिवकाळात हा समाज गुप्तहेराचे काम कारायचा. पण, शिवकाळानंतर या समाजावर गावोगावी फिरण्याची वेळ आली. त्यावेळी सावंतवाडीच्या तत्कालीन राजाने त्यांना राजाश्रय दिला. तेव्हा ठाकर समाज पिंगुळीमध्ये पोहोचला आणि त्यांच्यासोबत त्यांची ‘चित्रकथी’सुद्धा होती. काळ बदलत गेला, तसतसे नवनवीन कलाप्रकारही अस्तित्वात आले; जुने कलाप्रकार नामशेष होत गेले; पण पिंगुळी गावातल्या ठाकरवाडीने त्यांच्या ‘चित्रकथी’ला अंतर दिले नाही. उलट त्यांनी ही कला अधिक प्राणपणाने जोपासली.
 
याच ठाकरवाडीत राष्ट्रपती पुरस्काराला गवसणी घालणारे कलाकार गणपत मसगे यांचा जन्म झाला. ‘संस्कार भारती’चा ‘भरतमुनी पुरस्कार’ आणि कलाक्षेत्रातील अन्य मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आपण लोककलेचे देणे लागतो, याच भावनेतून गणपत मसगे यांनी ज्या संस्थेतर्फे हा रामायण महोत्सव आयोजित केला होता, त्या ‘दायती लोककला संवर्धन अकादमी’ची स्थापना केली. ‘चित्रकथी’सोबतच ठाकर समाजातील इतर कलांचे संवर्धन करण्याचे महत्त्वाचे कार्य ही संस्था करते.
 
महाराष्ट्रात इतरही काही ठिकाणी ‘चित्रकथी’ सादर होते. पण, पिंगुळीतल्या ‘चित्रकथी’चे कलाप्रेमींना अधिक कौतुक आणि आकर्षण वाटते. खास ही कला पाहण्यासाठी अनेक कलाप्रेमी पिंगुळी गाव गाठतात. ही कला फक्त मनोरंजनाचेच साधन नाही, तर रामायण-महाभारत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे, बोलीभाषा जगवण्याचे, पारंपरिक वाद्ये टिकवण्याचे आणि गरजू कलावतांचे पोट भरण्याचे पवित्र काम या कलेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळेच पिंगुळीमध्ये पार पडलेला रंगलेला हा ‘चित्रकथी रामायण महोत्सव’ खूप महोत्साही होता.

असे महोत्सव जर होत राहिले, तर लोककलांना आणि लोककलावंतांना बळ मिळेल आणि या कालातीत होत जाणार्‍या कला पुन्हा जीवंत होतील. पिंगुळीसारखी अनेक लोककलांची गावे आणि गणपत मसगे यांसारखे अनेक लोककलाकार अशा महोत्सवांमुळे भविष्यात तयार होतील, अशी आशा...

 
दिपाली कानसे
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121