"काहीजण कशा-कशासाठी पावसात भिजतात, आपण...;" जरांगेंची शरद पवारांचे नाव न घेता टीका
12-Oct-2024
Total Views | 235
बीड : काहीजण कशाकशासाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी भिजू, अशी टीका मनोज जरांगेंनी शरद पवारांचे नाव न घेता केली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने मनोज जरांगे यांचा पहिल्यांदाच बीडमधील नारायण गडावर दसरा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
मनोज जरांगेंच्या भाषणादरम्यान, अचानक पाऊस सुरु झाला. यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, "काहीजण कशाकशासाठी भिजतात, आपण जातीसाठी भिजूया. याला शुभसंकेत म्हणतात. आपल्यापुढे पर्याय नाही. आचारसंहिता लागल्यानंतर मी मुख्य भूमिका सांगणार आहे. आचारसंहिता लागेपर्यंत आपण विश्वास ठेवायचा."
"आचारसंहिता लागायच्या आत राज्यातील जनतेच्या प्रश्नांची अंमलबजावणी करायची. जर केली नाही तर आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला जे सांगेल ते सगळं करायचं. तुमची ईच्छा पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे. तुमची शान मी वाढवणारच. फक्त वेळप्रसंगी जे सांगेल ते ताकदीने पूर्ण करायचं. एकानेही मागे हटायचं नाही," असे आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवांना केलं.