उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत पवार-ठाकरे यांची भूमिका राष्ट्रहितविरोधी; केशव उपाध्ये यांची टीका

    23-Aug-2025   
Total Views |

मुंबई : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका ही केवळ विरोधाभासी नाही, तर थेट राष्ट्रहिताविरोधी आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. त्यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत शरद पवार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

केशव उपाध्ये म्हणाले की, "प्रखर राष्ट्रवाद, संविधानावर श्रद्धा आणि सर्वसमावेशक राजकारण असा इतिहास असलेली व्यक्ती आमच्या विचाराची नाही असे शरद पवार उघडपणे सांगतात, मग त्यांची नेमकी विचारसरणी कोणती? असा सवाल महाराष्ट्राने त्यांना विचारला पाहिजे. पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि राष्ट्रवादी विचारास विरोध हा त्यांच्या कथनी आणि करणीतून उघड झाला आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका ही केवळ विरोधाभासी नाही, तर थेट राष्ट्रहिताविरोधी आहे,"





ही फक्त राजकीय स्वार्थाची नौटंकी

"संविधाननिष्ठ, स्पष्टवक्ते आणि राष्ट्रभक्तीचा विचार जोपासणारे राधाकृष्णन यांना आमच्या विचारांचे नाहीत म्हणून नाकारणे हा विचारांचा संकुचितपणा आणि राजकीय द्वेषाचा कळस आहे. नक्षलवाद्यांप्रती सौम्य भूमिका ठेवणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणे, हे तर थेट देशाच्या सुरक्षेशी खेळणे आहे. नक्षलवाद हा भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर धोका असून अशा विचारसरणीला पाठबळ देणाऱ्या व्यक्तीला उपराष्ट्रपतीपदासाठी योग्य मानणे म्हणजे जनतेशी विश्वासघातच आहे. ज्या आंध्र प्रदेशातून इंडिया आघाडीचा उमेदवार उभा आहे, त्याच राज्यातील प्रमुख नेत्यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला आहे. यावरून एकच स्पष्ट होते की, पवार-ठाकरे यांच्या भूमिकेला वैचारिक बैठकच नाही. ही तर फक्त राजकीय स्वार्थाची नौटंकी आहे," असेही केशव उपाध्ये म्हणाले.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....