मुंबई : आदिवासी समुदायाच्या शाश्वत विकासासाठी ‘मॉयल लिमिटेड’ चे योगदान महत्त्वपूर्ण आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आदिवासी समुदायाचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या जीवनात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्राचा सहभाग आवश्यक आहे. कृषी आधारित वैविध्यपूर्ण योजना राबवल्या जात असून त्यांच्या शाश्वत विकासासाठी ‘मॉयल लिमिटेड’चे योगदान महत्त्वपूर्ण आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
"नीती आयोगाने देशातील निवडक आकांक्षी जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश केला आहे. स्वयंसेवी संस्थाचा सहभाग आणि 'मॉयल लिमिटेड’ च्या योगदानातून विविध जिल्ह्यातील आदिवासी समुदायासाठी शाश्वत परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येतील. यात सहभागी सामाजिक क्षेत्रातील जलसंवर्धन, कृषी आणि वन-आधारित उपजीविका या क्षेत्रात ‘बायफ’ संस्थेचे विकासात्मक दीर्घकालीन कार्यही चांगले आहे,” असे त्यांनी सांगितले.
गडचिरोली, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्पकेंद्र सरकारच्या अंगीकृत मिनीरत्न ‘मॉयल लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाच्यावतीने विविध जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढण्यासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 'मॉयल लिमिटेड’ने आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कामासाठी ‘बायफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लाइव्हवूड्स अँड डेव्हलपमेंट (बीआयएसएलडी)’ या स्वयंसेवी संस्थेची निवड करत निधी उपलब्ध करून दिला आहे. ही संस्था राबवत असलेल्या उपक्रमांतून गडचिरोली जिल्ह्यातील १८ हजार कुटुंबांना आधार देण्यासाठी उपजीविकेशी संबंधित विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांमुळे अनेक ग्रामीण कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविका आणि जीवनमानात सुधार होईल. तसेच ‘मॉयल लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाकडून मंजूर निधीतून मार्च २०२८ पर्यंत नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील चार हजार कुटुंबांच्या उत्पन्न वाढीसाठी तसेच जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवल्या जाणार आहेत.