ममतादीदी, ई ना चोलबे!!

    06-Jan-2024   
Total Views |
Mamata Banerjee West Bengal Govt Scams
 
रेशन घोटाळा, चिटफंड घोटाळा आणि नगरपालिकांमधील नोकरी बदली घोटाळा यांमध्ये ममता बॅनर्जींचे पश्चिम बंगाल सरकार आकंठ रूतले आहे. आपले पितळ उघडे पडताना दिसताच, ममता यांचे सहकारी अधिकारी आणि संस्थांवरही हल्ले करत आहेत. या हल्ल्यामंध्ये घुसखोर रोहिंग्या सामील आहेत, असे दिसते. त्यानिमित्ताने तृणमूल काँग्रेस आणि घुसखोर रोहिंग्यांच्या संबंधाचा या लेखात घेतलेला हा आढावा...

नुकतेच प. बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचा नेता शेख जहा याच्या घरावर ’ईडी’ने धाड टाकली. शेख जहा हा प. बंगाल राज्याचा मत्स्यपालन व्यवसायाचा सम्राटच! तृणमूल काँग्रेसचा राज्य मंत्री ज्योतिप्रिय मलिक याच्याशी शेखजहाचा जवळचा संबंध. ज्योतिप्रिय मलिक याला रेशन घोटाळ्यासंदर्भात अटक झालेली आहे. ’ईडी’ने आरोपपत्रात म्हटले की, ”ज्योतिप्रिय मलिक यांनी निवडणुकीमध्ये एप्रिल २०१६ साली पत्नीचे उत्पन्न ४५ हजार नमूद केले होते. मात्र, २०१६च्या शेवटी पत्नीचे उत्पन्न काहीही अर्थार्जन न करता सहा कोटी रुपये झाले. त्यामुळे चौकशी करताना ज्योतिप्रिय मलिक यांचा घोटाळा बाहेर आला.” या ज्योतिप्रियांच्या घोटाळ्यासंदर्भात ’ईडी’ने शेखजहाच्या घरावर धाड टाकली. सोबत ‘सीएपीएफ’चेही कर्मचारी होते. मात्र, तेव्हा ३००च्या वर लोकांनी एकत्रित येत, ’ईडी’च्या अधिकार्‍यांवर आणि ‘सीएपीएफ’च्या कर्मचार्‍यांवर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. या सगळ्या घटनाक्रमाबद्दल पश्चिम बंगालचे विरोधी पक्ष नेता सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले की, ” ’ईडी’चे पथक आणि ’सीएपीएफ’वर हल्ला करणार्‍यांमध्ये रोहिंग्या मुसलमान होते.” या सगळ्यांचा विचार केला, तर वाटते की, प. बंगालमध्ये हिंसा, दडपशाहीसाठी रोहिंग्या मुसलमानांचा वापर केला जात आहे का? तर मागच्या काही वर्षांचा मागोवा घेऊ.

रोहिंग्या ’इसिस’ आणि अशाच प्रकारच्या दहशतवादी संघटनांशी संपर्कात आणि संबंधित आहेत, अशी माहिती काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारला मिळाली. त्यामुळे या घुसखोर रोहिंग्यांना शोधून, त्यांना देशाबाहेर काढण्याचे कायदेशीर काम केंद्रातील भाजप सरकारने हाती घेतले. घुसखोर रोहिंग्यांना अटक करण्याची मोहीमच सुरू झाली. ईशान्य भारतातील राज्ये तसेच जम्मू-काश्मीरमधूनही बेकायदेशीर राहणार्‍या, रोहिंग्यांना पकडण्याची शोधमोहीम राबवली गेली. त्यानंतर रोहिंग्यांनी त्यांना सुरक्षित वाटेल, असे ठिकाण शोधले, ते म्हणजे प. बंगाल. बंगालमध्ये रोहिंग्यांनी बरुईपूर येथे घुसखोरी केली. केंद्र सरकारने प. बंगालच्या सत्ताधारी तृणमूल सरकारसोबत याविषयी कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आश्चर्यकारकरित्या बरुईपूरमधून रोहिंग्या गायब झाले. केंद्र सरकारच्या कारवाईपूर्वीच ते तिथून पसार झाले आणि घोटियारी शरीफमध्ये राहायला गेले. तिथेही केंद्र सरकारने कारवाई करण्याची येाजना केली.

मात्र, त्यापूर्वीच घुसखोर रोहिंग्या तिथूनही पसार झाले आणि सुंदरबनच्या सुदूर परिसरात पांगले. केंद्र सरकारने कारवाई करण्यापूर्वीच रोहिंग्यांचा जत्था सुरक्षितपणे दुसरीकडे जात होता. सुंदरबन परिसरातून रोहिंग्या पुढे २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखालच्या सर्बेरियामध्ये बिनधास्त राहू लागले. केंद्र सरकारच्या कारवाईबाबत या रोहिंग्यांना कुणीतरी माहिती देत होते आणि त्यांच्या पलायनासाठी त्यांना सहकार्य करत होते. पुढे असे दिसून आले की, २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे तृणमूल नेता हुसैन गाजी याने रोहिंग्यांना तिथे वसवले. हुसैन गाजीने तिथे सुरुवातीला १६ कच्ची घर बांधली गेली. त्यात २९ रोहिंग्यांना वसवले. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या गेल्या. त्याने रोहिंग्यांना वसवण्यासाठी आणि सर्वतोपरी मदत करण्यासाठी ’देश बचाओ सामाजिक समिती’ नावाने एक संघटना उभी केली. परिसरात मुस्लीमबहुल गावे आहे. त्यांनी रोहिंग्यांना सर्व प्रकारची मदत केली.

हुसैन गाजी याने म्हटले की, ”आमच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे आणि त्या मानतात की, रोहिंग्या मुसलमान हे आपले भाई आहेत. त्यामुळे त्यांना घुसखोर न समजता, माणूस समजून त्यांना मदत करत आहे.” त्यानंतर तीन-चार वर्षांत तिथे चार हजार रोहिंग्या वसवले गेले. त्यानंतर प. बंगालमध्ये वसलेल्या रोहिग्ंयांवर कारवाई करण्यास पथक गेले. तेव्हा या रोहिंग्यांनी पथकाला संयुक्त राष्ट्र संघाचे शरणार्थी म्हणून कार्ड दाखवले. त्यानंतर प. बंगालच्या राज्य सरकारने या रोहिंग्यांची ’बिचारे संकटग्रस्त शरणार्थी’ म्हणत पाठराखण सुरू केली. याच दरम्यान प. बंगालच्या काही देशद्रोही लोकांनी हे रोहिंग्या आमचे भाऊ म्हणत, त्यांना पूर्णतः सहकार्य केले. ‘मुस्लीम बद्ररहुड’ म्हणत, रोहिंग्यांच्या घुसखोरीला समर्थन दिले. हे रोहिंग्या प. बंगालच्या संदेशखाली परिसरात एकवटले आहेत. याच परिसरात तृणमूलचा नेता शेख जहाच्या घरावर ’ईडी’ने धाड टाकली. धाड टाकल्यावरही रोहिंग्यांची भुतावळ ’ईडी’ अधिकारी आणि ’सीएपीएफ’च्या कर्मचार्‍यांवर तुटून पडली. कारण, या रोहिंग्यांना भारत देश, संविधान कायदा आणि संविधानात्मक संस्थांशी काही देणेघेणे नाही. भारतात त्यांना बेकायदेशीररित्या सर्व सुविधा देऊन, वसवणारे लोक त्यांचे सध्यातरी आका आहेत, मालक आहेत. या मालकांनी त्यांना ‘छू’ म्हटले की, हे रोहिंगे वाटेल ते करणार!

असो. तृणमूलचा आणि रोहिंग्यांचा संबंध लपलेला नाही. ममता बॅनर्जी यांनी नेहमीच रोहिंग्यांना समर्थन दिले होते. त्या म्हणाल्या होत्या की, ”सगळेच रोहिंग्ये काही दहशतवादी नाहीत. ’संयुक्त राष्ट्र संघटने’कडे रोहिंग्यांनी सहकार्य मागितले आहे. मी त्या रोहिंग्यांचे समर्थन करते.” पण, हे समर्थन कशासाठी असावे? कारण, घुसखोरांबाबत ममता यांची भूमिका नेहमीच बदलत आलेली आहे. १९९८ साली मुंबईतून अवैध बांगलादेशींना हाकलण्याची कारवाई झाली. त्यावेळी ममता यांनी त्या कारवाईचा निषेध केला. मात्र, २००५ साली प. बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्ष बांगलादेशी घुसखोरांना वसवत आहेत, असे म्हणत, त्यांनी या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. ती मागणी त्यांनी लावून धरली. मात्र, आज २०२४ साली त्यांची २००५ सालची भूमिका बदलली. २००५ साली त्या घुसखोरांविरोधात होत्या.

मात्र, आज त्या रोहिंग्यांना निर्वासित करू नका, हाच राग आलापत आहेत. ममता बॅनर्जींना खरंच मानवतावादी भूमिकेतून रोहिंग्यांची काळजी वाटत असेल का? तर साफ चूक. देशात हिंदू समाज जागृत झाला आहे. पश्चिम बंगालमध्येही रामनामाने जादू केली आहे. जागृत हिंदूंची ममता यांना भीती न वाटली तर नवलच! त्यामुळेच प. बंगालमधील ३४ टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लिमांची एकगठ्ठा मत मिळवण्यासाठी ममता आपाजान, खालाजान बनून मुस्लिमांचे तुष्टीकरण करत असतात. रोहिंग्यांना शरणार्थी म्हणून निवारा द्या, अशी मागणी करणारे लाखोंचे मोर्चे प. बंगालमधीला मुस्लिमांनी काढले होते. तसेच नागरी सुधारणा कायद्यामध्ये मुसलमानांनाही समाविष्ट करा, अशीही मागणी घेऊन प. बंगालचा मुस्लीम रस्त्यावर उतरला होता. अर्थात, हा लाखोंचा समुदाय केंद्रातील भाजपचा कट्टर विरोधकच होता आणि आहे. त्यामुळे या समुदायाचा वापर मतांसाठी करून घ्यावा, या उद्देशाने ममता यांनी रोहिंग्यांना समर्थन दिले होते आणि आहे.

या सगळ्या परिक्षेपात ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या भ्रष्ट सरकारचे दररोज वाभाडे निघत आहेत. मात्र, राजाला कोण सांगणार की, पोपट मेला, तशी स्थिती सध्या तृणमूलच्या नेत्यांची आहे. ते ममता यांना कसे सांगणार की, तृणमूल काँग्रेसच्या भ्रष्ट आणि मुस्लीम तुष्टीकरणामुळे प. बंगालमध्येही तृणमूल आणि ममतांविरोधात वातावरण आहे. देशभरात ममता बॅनर्जींच्या मुस्लीम तुष्टीकरणाविरोधात संतापाची लाट उसळत असताना, ममता बॅनर्जींचे सहकारी त्यांची स्तुतीपाठ करण्यात व्यस्त आहेत. तृणमूलचे मंत्री फिरहाद हकीम यांनी नुकतेच म्हटले की, ”आम्ही लहान होतो, तेव्हा सांताक्लॉजची वाट बघायचो. पण, आता आम्हाला खरा सँटा भेटला आहे. आमचा सँटा आहे-पश्चिम बंगालच्या आमच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी.” अर्थात, फिरहाद हकीमच नव्हे, तर प. बंगालमध्ये बेकायेदशीर वसलेल्या रोहिंग्या मुसलमानांनाही ममता सांताक्लॉजच वाटत असतील. याचे कारण ममता बॅनर्जींचे रोहिंग्यावरंचे प्रेम.

तसेच ममतांच्या सहकारी नेत्यांनी रोहिंग्यांची केलेली सर्वतोपरी पाठराखण. ती पाठराखण तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना माहिती नसेल का? नुकतेच ममता बॅनर्जी यांनी प. बंगालमधील मुस्लिमांना आवाहन केले आहे की, तुम्ही विभागला तर त्याचा फायदा भाजपला होईल, तुम्ही एकजूट राहण्याची शपथ घ्या.” मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा हा संदेश तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक प्रकोष्ठने प. बंगालमधील मुस्लिमांकडे पोहोचवण्याची व्यवस्थाही केली आहे. “भाजप हिंदू धर्म हिंदू धर्म करतो, भारत काही हिंदू राष्ट्र नाही,” असे म्हणत-म्हणत ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले आहे की, त्यांची भिस्त केवळ प. बंगालच्या मुस्लिमांवर आहे. मग ते रोहिंग्या मुसलमान असतील तरी चालेल. अर्थात, सत्तेसाठी असे तृष्टीकरण करणार्‍या, ममता बॅनर्जी गेल्या निवडणुकीतही तरल्या. मात्र, रामनामाने अस्वस्थ होणार्‍या, मममा बॅनर्जींविरोधात प. बंगालच नव्हे, तर सगळा देश आता म्हणत आहे की, ”जो नाही रामाचा तो काय कामाचा. ममतादीदी अब की बार ई ना चोलबे....”

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.