ठाणे : काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांना ठाणे न्यायालयाने दणका दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) परमपुज्य गोळवलकर गुरुजीं बाबत सोशल मिडियात (एवस) अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी १ रुपया आणि स्वाक्षरी सहीत लेखी माफीनामा सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती सुर्यवंशी यांनी दिले. ठाण्यातील आरएसएसचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी,ठाणे न्यायालयात दिग्वीजय सिंग विरोधात केवळ एक रुपयाचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २९ जाने. रोजी होणार आहे.अशी माहिती चंपानेरकर यांचे वकील अँड.आदित्य मिश्रा यांनी दिली.
काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपुज्य गोळवलकर गुरुजी यांच्याविषयी ०८ जुलै २०२३ रोजी एक्स या सोशल मिडिया साईटवर अवमानकारक टीप्पण्णी केली होती. या विरोधात विवेक चंपानेरकर यांनी आक्षेप घेत ठाणे न्यायालयात धाव घेत दिग्विजय सिंह यांच्याविरोधात एक रुपयाचा मानहानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी ठाणे न्यायालयात पार पडली. यावेळी दिग्विजय यांच्या वकिलांनी दिलगिरी व्यक्त करीत संबधित टीपण्णी एक्सवरून हटवल्याचे सांगितले.
तसेच आता टीपण्णीच नसल्याने हा खटला रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली. यावर चंपानेरकर यांचे वकील अॅड . आदित्य मिश्रा आणि अॅड.सुरभी पांडे यांनी या विनंतीला आक्षेप घेत दिग्विजय यांचे हे कृत्य कपटपुर्ण असुन भादवि ४९९ आणि ५०० दवारे दंडनीय आहे.तेव्हा, दिग्विजय सिंह यांनी एक रुपया दंडासह आपल्या लेटरहेडवर लेखी माफीनामा द्यावा.असा प्रतिवाद केला. त्यानुसार न्या. सुर्यवंशी यांनी दिग्विजय सिंह यांना यासंदर्भात निर्देश देऊन २९ जाने. पर्यत पुढील सुनावणीत या निर्देशांचे पालन करण्याचे बजावले.
माफीनामा करणार तसबीरबंद...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महनीय व्यक्तींवर नाहक आरोप करून संघाची बदनामी करणाऱ्यांना ही एकप्रकार चपराक आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असुन अखेर सत्याचा विजय झाला आहे. किंबहुना, काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांचा माफीनामा तसबीरबंद करणार आहोत.
- विवेक चंपानेरकर ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, याचिकाकर्ते)