मुंबई महापालिका अर्थसंकल्प यंदा ३ फेब्रुवारीला?

    30-Jan-2024
Total Views | 26
BMC Annual Budget Will 3 February

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी मांडण्यात येईल, अशी चर्चा मुंबई महापालिकेत रंगू लागली आहे. प्रशासकीय राजवटीतील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. एकीकडे पालिकेच्या निवडणुकीबाबत असणारी अनभिज्ञता आणि लवकरच होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाजही या अर्थसंकल्पात उलगडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पाबाबत सामान्य नागरिकांकडून मते/सूचना मागवण्यात आल्या होत्या, परंतु, त्याबाबत पालिका प्रशासनाने काहीही उलगडा केलेला नाही.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचा सन २०२४-२५ चा अंदाजित अर्थसंकल्प पालिका आयुक्त व प्रशासक इकबालसिंह चहल हे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी सुट्टीच्या दिवशी सादर करण्याची शक्यता आहे. शुक्रवार, दि. २ फेब्रुवारीलासुध्दा अर्थसंकल्प सादर करता येऊ शकतो का, याचीही चाचपणी पालिका प्रशासन करत आहे. दि. १ फेब्रुवारी केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने दुसऱ्याच दिवशी पालिकेचा अर्थसंकल्प सादर करणे शक्य होईल का? त्यामुळेच दि. २ किंवा ३ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पालिकेचा गेल्या वर्षीचा अंदाजित अर्थसंकल्प ५२,६१९.०७ कोटी रुपयांचा होता व ६५.३३ कोटी रुपये शिल्लकीचा होता. तसेच २०२२-२३ या वर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा ६,६६९.८६ कोटींनी वाढवला होता. व दरवर्षीप्रमाणे गेल्यावर्षी ही अंतर्गत निधीतून ५,९७० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले होते. यावर्षीही सरकारच्या निर्देशाने विकासकामे वाढणार असल्याने या वेळचा अर्थसंकल्प वाढलेला व अंतर्गत निधीतून कर्ज काढण्याची वेळ येणारा असणार आहे, अशी शंका वर्तवली जात आहे. तरीही हे वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे करवाढ करण्याचा धोका यंदा पत्करणार नसून नवनव्या घोषणा करण्यात येण्याची शक्यता संबंधितांनी दिली आहे.

बेस्टसाठी अधिकची मदत?

बेस्ट उपक्रम दिवसेंदिवस तुटित जात आहे. जुलै २०१९ मध्ये प्रवासी संख्या वाढवण्यासाठी भाडे कमी केल्यामुळे बेस्टचे उत्पन्न कमी झाले आहे. भाडे वाढविण्याचा निर्णय धोरणात्मक असल्यामुळे जोपर्यंत लोकनियुक्त प्रतिनिधी पालिकेत येत नाही तोपर्यंत बेस्टला भाडेवाढ करणे शक्य नाही. त्यामुळे पालिकेला दरवर्षी बेस्टला आर्थिक मदत करावी लागते ती यावेळीही करावी लागणार आहे. पण सप्टेंबर २०२२ पासून हजारो कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची देय रक्कम अद्याप दिली गेली नाही. त्यामुळे यंदा पालिकेला दरवर्षीपेक्षा अधिक आर्थिक मदत बेस्टला द्यावी लागणार आहे. त्याबद्दल तरतूद केली असण्याची शक्यता आहे. पण ती किती असेल, ते शुक्रवारी किंवा शनिवारी समजेल.

पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत घटल्याने अर्थसंकल्पात वाढीची शक्यता!

जकात बंद झाल्यानंतर महसुलाचे नवे मोठे स्त्रोत उभे करण्यात पालिकेस अपयश मिळत आहे. मालमत्ता कराच्या बिलांच्या वादामुळे मालमत्ता कर वसूली ठप्प आहे, पालिकेकडील मुदतठेवीतही मोठ्या प्रमाणात घट झाली असून विकासकामांसाठी असणारा निधी इतरत्र फिरवण्याची वेळ दिसून आली आहे. त्यातच पालिकेने राखीव निधीचा वापर विकासकामांसाठी करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती संबंधित पालिका सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाजही या अर्थसंकल्पातून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून खालावली जात असल्याची चर्चाही पालिकेत रंगताना दिसत आहे.

- राज्यातील सत्तांतरामुळे धोरणातील बदल अर्थसंकल्पात दिसण्याची शक्यता

- रस्ते, पूल, विविध रखडलेले प्रकल्प याकरिता भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता

- घनकचरा विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी आर्थिक तरतूदीची शक्यता

- मुंबई सुशोभीकरण प्रकल्प व पर्यावरण विभाग, सागरी किनारा मार्ग दुसरा टप्पा, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता या प्रकल्पासाठी मोठी तरतूदीची शक्यता
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121