'हिट अॅण्ड रन'वर बोलण्याचा नैतिक अधिकार ठाकरे-राऊतांना नाही : नितेश राणे
03-Jan-2024
Total Views | 49
मुंबई : हिट अॅण्ड रनवर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राऊत आणि त्यांच्या मालकाला नाही, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. केंद्र सरकारने हिट अॅण्डरन कायद्यात बदल केल्याने राज्यभर आंदोलने करण्यात आली. यावरून विरोधकांकडून टीकाही करण्यात येत आहे. दरम्यान, आता राणेंनी त्यांना चांगलेच सुनावले आहे.
नितेश राणे म्हणाले की, "हिट अॅण्डरन कायद्यात काही बदल केल्याने काही लोकांचे आक्षेप असू शकतात पण केंद्र सरकार याबाबत निश्चितपणे विचार करेल. फक्त २०२२ या वर्षाचे आकडे बघितले तर ४७ हजार लोकांनी हिट अॅण्डरनमुळे आपला जीव गमावला. याबद्दल केंद्र सरकारकडून काहीतरी विचार होत असेल तर संजय राजाराम राऊतसारख्या लोकांनी यावर टीका करण्याचे काहीच कारण नाही. शेवटी लोकांचा जीव वाचवणं ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे. केंद्र सरकार नक्कीच आंदोलनांचीसुद्धा दखल घेईल."
"परंतू, यानिमित्ताने राज्य सरकारवर टीका करणाऱ्या संजय राऊतांनी थोडं तरी त्यांच्या मालकाच्या मुलाच्या कारनाम्यांकडे बघितलं असतं तर हिट अॅण्डरनबद्दल बोलण्याची त्यांची हिंमतही झाली नसती. तुमच्या मालकाचा मुलगा कुठे कुठे हिट झाला आहे आणि कुठून कुठून रन झाला याची यादी दाखवली तर तुम्ही महाराष्ट्रात फिरूही शकणार नाहीत. दिशा सालियान मर्डर प्रकरणात कोणी बॉडी कुठे टाकली आणि कसे तिथून पळून गेले हे आता चौकशीतून बाहेर येणारच आहे. त्यामुळे हिट अॅण्डरनवर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राऊत आणि त्यांच्या मालकाला नाहीच," असेही ते म्हणाले.