धर्म, कर्म आणि करुणेच्या त्रिवेणी संगमावर विलसित झालेले विमल कमलपुष्प म्हणजे श्रीराम! दशरथपुत्र, अयोध्यापती श्रीराम हा भारतीय अवतार संकल्पनेनुसार भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानला जातो. सीता आदिशक्तीचा, तर लक्ष्मण शेषाचा अवतार मानले जातात. पृथ्वीवरील सज्जनांचे म्हणजे सामाजिक नीतीमूल्याचे रक्षण आणि अमंगल दुष्ट शक्ती नाश करून धर्माची पुनर्स्थापना हे अवतार संकल्पनेमागे मुख्य तत्त्व आहे.
न हि तद्भविता राष्ट्रं यत्र न रामो भूपतिः।
तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ॥
(वाल्मिकी रामायण २/३७/२९)
“श्रीराम राजा नसेल, तर ते राष्ट्र राष्ट्रच राहणार नाही आणि जेथे राम असेल तो उजाडमाळ वनवासी भागही राष्ट्र होईल,“ हे उद्गार कोण्या भाबड्या भक्तभाविकाचे नाहीत, तर खुद्द महातपस्वी, महामुनी, रघुकुल कुलगुरू वसिष्ठ ऋषींचे आहेत. श्रीरामांच्या रघुकुळातील राजा रघु, राजा दिलीप, राजा अज, राजा दशरथ आणि राजा रामचंद्र अशा सलग पाच पिढ्यांच्या दरबारांमध्ये कुलगुरू म्हणून वसिष्ठांनी मार्गदर्शन केलेले आहे. श्रीरामांच्या वनगमनप्रसंगी महाराणी कैकयीला उद्देशून वसिष्ठ ऋषींनी वरील उद्गार काढलेले आहेत. या उद्गारांमध्ये श्रीरामांची अवघी थोरवी व्यक्त होते. वसिष्ठांनी वरील उद्गारात व्यक्त केलेला, श्रीरामांच्या थोरवीविषयीचा दुर्दम्य द्रष्टा भाव आज हजारो वर्षे झाली, तरी भारतीय जनमानसाच्या हृदयमंदिरी अढळपणे-सतेजपणे विद्यमान आहे. राम हे आम्हा भारतीयांचे आराध्य दैवत आहेच. तद्वत आमच्या समस्त विजीगीषु पुरुषार्थाची उर्ज्वस्वल प्रेरणा आहे. शाश्वत दीपस्तंभ आहे. धर्म, कर्म आणि करुणेच्या त्रिवेणी संगमावर विलसित झालेले विमल कमलपुष्प आहे. सूर्यासारखे तेजस्वी स्वयंप्रकाशी, चंद्रासारखे शीतल, सागरासारखे धीर गंभीर आणि आकाशासारखे विश्वव्यापक श्रीराम म्हणजे साक्षात मूर्तिमंत धर्म आहे. रामचंद्रः विग्रहवान धर्मः।
ब्रह्मर्षी वसिष्ठांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, गुरुकुलातील शिक्षण पूर्ण करून, अयोध्येत परतलेल्या युवराज रामचंद्राच्या मनात उद्भवलेल्या अनाठायी, अकाली वैराग्य विकाराची वसिष्ठ मुनींनी भर दरबारात सर्वसाक्षीने युवराज रामाला उपदेश करून, सुफल निवृत्ती केली व कर्मयोगाचे महत्त्व सांगितले. वसिष्ठांनी रामाला केलेला हा पुरुषार्थाचा उपदेश म्हणजेच ’योगवासिष्ठ!’ वसिष्ठांच्या या पुरुषार्थप्रवण उपदेशानंतरच युवा श्रीराम-लक्ष्मण विश्वामित्रांसमवेत यज्ञ रक्षणार्थ जीवनातील पहिल्या-वहिल्या क्षात्रकार्यासाठी बाहेर पडलेले आहेत.
’प्रभू रामचंद्र’ आणि ’भगवान श्रीकृष्ण’ या दोन दिव्य महापुरुषांनी भारतीय संस्कृतीचे महावस्त्र विणलेले आहे. असे अनेक विद्वान, चिंतक, महाकवींनी म्हटलेले आहे. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर म्हणतात की, ”भारतवर्षाची साधना, भक्ती, ज्ञान आणि मनोरथ सारे या दोन महापुरुषांच्या महाकाव्याच्या प्रासादात शाश्वत काळाच्या सिंहासनावर विराजमान आहेत.” श्रीराम व श्रीकृष्ण हे दोन अवतारी सत्पुरुष भारतीय एकता, एकात्मता आणि समरसता यांची अधिष्ठानरूप परमनिधाने आहेत. त्यांचा विलक्षण प्रभाव भारतीय जनमानसावर गेली शेकडो वर्षे आहेच; पण या प्रभावाने भरतभूमीच्या सीमा पार करून, देशोदेशीची सांस्कृतिक जीवने भारून टाकलेली आहेत.
राम : भगवान विष्णूंचा अवतार
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम व त्याची अगाध, अनंत थोरवी लक्षात येण्यासाठी सर्व प्रथम आपणास भारतीय विचारविश्वातील ’अवतार’ संकल्पनेची थोडी ओळख असणे महत्त्वाचे आहे. कारण, श्रीराम हे भगवान विष्णूंचे ’अवतार’ आहेत. एवढेच नव्हे तर रामायणातील सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान, सुग्रीव, नल, नील हे सारे जण वेगवेगळ्या देवदेवतांचे अवतार आहेत. रावण व कुंभकर्ण हेसुद्धा अवतार आहेत. त्यामुळे अवतार संकल्पना, तिचा उगम, विस्तार आणि रामायणातील कोण, कोणत्या देवदेवतेचे अवतार आहेत, याची माहिती रंजक, उद्बोधक आहे.
भगवान विष्णूंचे अनेक अवतार आहेत. त्यापैकी जे प्रमुख दहा अवतार मानले जातात, त्यात श्रीराम हा सातवा अवतार, तर श्रीकृष्ण हा आठवा अवतार मानला जातो. थोर तत्त्वज्ञ चिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांचे दशावतारावर सुरेख पुस्तक आहे, त्यात ते म्हणतात की, ”ज्या दिव्यात्म्याने (ईश्वराने) ही सृष्टी निर्माण केली, जो तिचे पालन पोषण करतो, तो आकाशातून खाली उडी घेऊन तिच्या (सृष्टीच्या) रक्षणार्थ धावून येतो, याच्यासारखी दुसरी मधुर कल्पनाच नाही! ही अतिशय मधुर भावना आहे. एक मधुर काव्य आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये चौथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनास अवतार संकल्पनेविषयी म्हणतात -
यदा यवा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ (भ. गीता. ४/७)
’हे अर्जुना! ज्या-ज्या वेळी धर्माला ग्लानी येऊन, अधर्माचा उच्छाद उद्भवतो, तेव्हा-तेव्हा मी अवतार येतो’ आणि अवतार घेऊन काय करतो? तर
परित्राणाय साधुनां विनाशायच दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे (भ. गी. ४/८)
अवतार घेऊन मी सज्जनांचे, (सामाजिक मूल्यांचे) रक्षण करतो. तसेच दुष्ट (समाजविघातक) कारवायांचे समूळ उच्चाटन करून, धर्मतत्त्वाची पुनर्स्थापना करतो व समाजजीवन सुरळीत करतो.
रामायणातील श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, अन्य वानरगण हे सारेच विविध देवदेवांचे अवतार आहेत. श्रीराम हा विष्णूचा अवतार आहे. सीतामाई आदिशक्तीचा अवतार आहे, लक्ष्मण शेषाचा अवतार आहे, (वाल्मिकी म्हणतात, सहससीसु अहीसु महिधरू) हनुमान रुद्राचा अवतार आहे, भरत पांचजन्य शंखाचा अवतार आहे. शत्रुघ्न सुदर्शन चक्राचा अवतार आहे. एवढेच नव्हे, तर रावण हा हिरण्याक्ष राक्षसाचा अवतार आहे, तर कुंभकर्ण हिरण्यकश्यपूचा अवतार मानला गेला आहे.
ईश्वराचा ’अवतार’ ही संकल्पना हिंदूंप्रमाणेच बौद्ध, जैन, इस्लाम, झरतुष्ट्र अशा अन्य धर्मांत पण काही वेगवेगळ्या रितीने दिसून येते. बौद्ध धर्मातील ’लामा’ कल्पना अवतार सदृश्यच आहे. इस्लाममधील ’इमाम’ ही कल्पनासुद्धा अवताराचाच एक वेगळा प्रकार आहे. इस्लाममध्ये किती इमाम मानतात, यावरून शिया-सुन्नी परंपरा निर्माण झाल्या आहेत. एक पंथ सात इमाम मानतो, तर दुसरा पंथ १२ इमाम मानतो. ’सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा।’ (’तराना- ए-हिन्द’) हे गीत लिहिणारे कवी सर महंमद इकबालांनी प्रभू रामचंद्राचे वर्णन ’इमामे हिंद’ अशा शब्दात केलेले आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. ख्रिश्चन-धर्मात येशूला ’प्रभू येशू’ म्हणून प्रार्थना करतात; पण त्याला ’देवाचा पुत्र’ मानले जाते. ’ग्रीक वाङ्मयात अवतार कल्पना आढळत नाही,’ असे पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात. राम व रामायणाचे यथार्थ दर्शन होण्यास, प्रथम ’अवतार संकल्पना’ समजली पाहिजे. त्यासाठी पुढील लेखात थोडा अधिक विचार करू.
विद्याधर ताठे
९८८१९०९७७५
vidyadhartathe@gmail.com