झाडं लावणार्‍या माणसाची गोष्ट सांगणारं पुस्तक

    30-Sep-2023   
Total Views |
Book Review of Avagha Dehchi Vruksh Jhahla

‘अवघा देहची वृक्ष जाहला’ या वीणा गवाणकर यांच्या पुस्तकाला ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे’चे नुकतेच पारितोषिक मिळाले. १८९४ साली या संस्थेची स्थापना झाली आणि तिच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम पुस्तकांशी परिचय झाला. हे पुस्तक केवळ रिचर्ड बेकरचे चरित्र नाही, तर एका सशक्त वृक्ष चळवळी मागच्या तरुणाची गोष्ट आहे. या पुस्तकाविषयी...

प्रत्येक जीव आपल्या भोवतालच्या वातावरणात काही प्रमाणात दखल देत असतो, चांगले वाईट बदल घडवत असतो. जाणते अजाणतेपणी. माणूस हा असा एकमेव प्राणी आहे, ज्याच्या जाणिवा जागृत आहेत. सकारात्मक बदल घडवण्याची पात्रता त्याच्याकडे आहे, म्हणूनच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी त्याच्या माथी आपण बिनबोभाट मारू शकतो. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी फार वेळ न देता काही करू पाहणार्‍या प्रत्येकासाठी एक सोपा मार्ग म्हणजे वृक्ष लागवड. हे पुस्तक अशा एका व्यक्तीबद्दल आहे, ज्याने वृक्षसंवर्धनाची चळवळ जगभर रुजवली. त्यांचेच नाव रिचर्ड बेकर.

चरित्रात्मक लिखाण करणार्‍या लेखिका म्हणून वीणा गव्हाणकर आपल्या लक्षात राहतात. ‘एक होता कार्व्हर’, ‘डॉ. सलीम अली’, ‘गोल्डा’, ‘रॉबी डिसिल्वा’ अशा अनेक पुस्तकांतून त्या माणसांबद्दल लिहितात. माणसांना त्यांच्या स्वभाव गुणांसकट खुलवून मांडतात आणि अत्यंत सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवतात. माणसांचा विचार गाभा पकडण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे, ज्यामुळे त्या-त्या माणसांच्या कार्याबद्दल लिहिताना वीणाताईंची लेखणी प्रवाहित राहते. त्या मूळच्या वसईतील रहिवासी. मुंबईपासून अतिशय जवळ, पण तरीही मुंबईच्या कोलाहलापासून दूर... हिरव्या उन्हाच्या वसईत त्यांनी आपले आजवरचे आयुष्य जगले. पर्यावरणाप्रती अतिसंवेदनशील, हिरव्याकंच सौंदर्यवती वसईची हरिततृष्णा त्यांच्या लेखणीतून सदैव पाझरत असते.

एक विषय डोक्यात बसला की, त्यासाठी जीवाचं रान करणारी मेहनत त्या घेतात. हे पुस्तक संदर्भ पुस्तकं मिळत नसताना, घराबाहेर पडता येत नसताना आणि पोस्टाची प्रणाली नियमित चालू नसताना लिहिलेलं आहे. जुनाट पिवळट कागदावरच एक छोटासा लेख आणि त्यामागची काही नावं वाचून काही पुस्तकं परदेशातून मागवून तर काहींच्या चक्क पानांचे छायाचित्र मिळवून आणि बाईंडिंग करून त्यांनी बेकर यांचा अभ्यास केला. पुस्तकाला डॉ. अर्चना गोडबोले यांनी प्रस्तावना दिली आहे. त्या ‘अँप्लिड एन्वार्यन्मेंटल रिसर्च सेंटर’च्या संचालक आणि वनस्पतीतज्ज्ञ आहेत. प्रस्तावनेत त्यांनी रिचर्ड बेकर यांच्या पूर्वायुष्याबाबत, त्यांच्या कार्यकाळाबाबत तसेच त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दलही लिहिले आहे. प्रस्तावनेतून लेखिकेला वगळून कसं चालेल? लेखिकेच्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक करताना, त्यांना आलेल्या अडचणींविषयीही सांगून वाचकांना पुस्तकाचे मोल समजावून देण्यात, त्या यशस्वी झाल्या आहेत.

रिचर्ड बेकर हा ब्रिटिश प्रांतातला माणूस. परंतु, वृक्षसंवर्धन चळवळ सुरू झाल्यानंतर संपूर्ण जग झाडांशी त्यांनी जोडलं. त्यासाठी जगप्रवासाला निघाले. खिशाची पर्वा न करता वृक्षांना भेटी घालत सुटले. त्यासाठी गरज पडेल, त्या व्यक्तींची भेट घ्यायची, लोकांची मने जिंकायची आणि आनंदयात्रीप्रमाणे पुढल्या प्रवासाला निघायचे. वृक्षवल्ली त्यांना सदैव फितूर, त्यांना पुढल्या वाटा अगदी पाठ! आफ्रिका खंडापासून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. वृक्ष माणसांना जगवतील आणि जंगलं वाढली तर माणसं सुखी होतील, असा रिचर्ड यांचा ठाम विचार. त्या विचारालाच त्यांनी आपल्या कृतीचं खतपाणी घातलं आणि उदंड वृक्ष चळवळ उफाळून जगभर मूळ धरू लागली.

हॅम्पशइयर त्या शहराचे नाव. सर्व ख्रिस्ती धर्मीयांची घरे होती. काहीसा डोंगराळ भाग आणि पाईन वृक्षांनी नटलेलं त्यातलं एक घर. घराच्या परसदारी एक रोपवाटिका आणि त्यात रंगीबेरंगी फुलांचे ताटवे. त्या घरातले एक आजोबा आपली काठी घेऊन संध्याकाळचे फिरायला जायचे. हातातल्या काठीने वाटेवरच्या मातीच्या रस्त्याकडेला खड्डा करावा आणि खिशातून एक बी काढून त्यात टाकावं, अशा आजोबांचा नातू म्हणजे रिचर्ड यांचे वडील. बेकर घराण्यात वृक्षप्रेमी हे असं खोलवर रुजलं होतं.

बहुतेकांना झाडांबद्दल प्रेम वाटतं. पण, वृक्षलागवड करायची म्हटली, तर प्रेमापेक्षाही अधिक काही असावं लागतं. वृक्षलागवडीची सवय लागण्यासाठी वृक्षसंस्कार घरातूनच व्हावे लागतात. रिचर्ड दोन वर्षांचे असताना सांभाळणार्‍या दाईकडून त्याने आपली लहानशी बाग बनवून घेतली होती. ती जागा केवळ त्याची! कालांतराने आपले नाव मातीत कोरून त्यात शुभ्र मोहरीची झाडं लावली होती. काहीच दिवसांत मोहोरी फुलारली आणि रिचर्डच्या आनंदाला पारावर उरला नाही. इथून सुरू झाली रिचर्डची त्या अबोल तरीही भरभरून बोलणार्‍या वृक्षांशी दोस्ती, जिला कधीच खळ लागला नाही!

लेखनशैली आणि विषयाचं कौतुक आहेच. पण, विशेष या पुस्तकाबाबत सांगायचे झाले, तर एक महत्त्वाची बाब म्हणजे, लेखकाचे काम मध्यस्थाचे असते. साहित्यनिर्मिती ही समाज घडवण्यासाठी मोलाचे योगदान देत असते. लेखक शब्दांच्या माध्यमातून समाजशिक्षण देत असतो. जगाच्या कुण्या एका कोपर्‍यापासून सुरू झालेली चळवळ मराठी वाचकांपर्यंत पोहोचावी आणि जगात काय सुरू आहे? काळाच्या कोनातून कोणते प्रवाह बदलत गेले? अशी सर्व माहिती मराठी वाचकांसाठी खुली करून देणारे हे पुस्तक.

मराठी माणूस बहुश्रुत आहे, त्याचे वाचन प्रगल्भ आहे, त्याने फार पाहिले आहे, मराठी रंगभूमी समृद्ध आहे, कलेचा वारसा जसा त्याला आपल्या पूर्वजांकडून मिळाला, तशी त्याने इतर प्रांतात जाऊन तिथली काही काही प्रमाणात उचलून आणली. आपल्याकडे रुजवली. तेच साहित्याचे. ही आपल्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण समृद्ध करणार्‍या काही निवडक लेखकांमध्ये वीणाताईंचे नाव घ्यावेच लागते. मराठी भाषेवर त्यांचे ऋण आहेत आणि त्या ऋणातच प्रेम आहे!
आवर्जून वाचावे असे...

पुस्तकाचे नाव : अवघा देहची वृक्ष जाहला...
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
लेखिका : वीणा गवाणकर
प्रथम आवृत्ती : फेब्रुवारी, २०२२
पृष्ठसंख्या : १८२
मूल्य : २५० रुपये

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.