भास्कर जाधवांकडून नाराजीबद्दल भूमिका स्पष्ट! 'ही' मोठी जबाबदारी स्विकारली
23-Jun-2025
Total Views |
रत्नागिरी : उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु असताना आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या नाराजीच्या बातम्या चुकीच्या असून मी नाराज नाही असे ते म्हणाले. सोमवार, २३ जून रोजी त्यांनी रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधला.
भास्कर जाधव म्हणाले की, "माझ्या नाराजीच्या बातम्या चुकीच्या आहेत. परवा दिलेल्या मुलाखतीत मी माझ्या सवयीप्रमाणे स्पष्ट आणि सत्य बोललो. उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकण्याची जबाबदारी मी घेतली आहे. त्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलणे आवश्यक आहे."
"परस्पर एखादी भूमिका जाहीर करण्याची माझी सवय नाही. तर सर्वांना विश्वासात घेऊन आपला निर्णय योग्य की, अयोग्य हे पडताळून मग निर्णयापर्यंत येण्याची माझी सवय आहे. त्यामुळे मी नाराज आहे या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. मी नाराज नाही. ज्या गोष्टी माझ्या मनात नाही त्याचा खुलासाही मी करत नाही," असे ते म्हणाले.
'ती' माझी वैयक्तिक भूमिका!
"आठ वेळा वेगवेगळ्या निवडणूका लढल्यानंतर आता थांबावेसे वाटते ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. माझ्यात लढण्याची आणि संघर्ष करण्याची धमक आहे. २०२२ पासून पक्षात ज्या घटना घडल्या त्यानंतर मी प्रत्येक मैदानात जाऊन लढण्याचे काम करतो. मी आहे त्या ठिकाणी ठाम पाय रोवून उभा आहे. नियतीच्या पोटात उद्या काय दडलंय हे कोणाला सांगता येत नाही. त्यामुळे आधी केले मग सांगितले.आज मी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणूकांची जबाबदारी स्वत:हून अंगावर घेतो आहे. माझ्या सहकाऱ्यांना ते मान्य असल्यास पक्षाला यश मिळवून देण्याकरिता मी त्यात उतरणार आहे. त्यामुळे माझ्या नाराजीचा काहीही संबंध नाही," असेही ते म्हणाले.