'चांद्रयान ३' ने चंद्राचे पहिले छायाचित्र पाठवले… ISRO ने व्हिडिओ केला प्रसारित!
07-Aug-2023
Total Views | 337
नवी दिल्ली : 'चांद्रयान ३' आपल्या कक्षेत बसवण्यात इस्रोला यश आले आहे. एवढेच नाही तर भारताच्या स्पेस एजन्सीने दि. ६ ऑगस्ट रोजी एक व्हिडिओही प्रदर्शित केला. ज्यामध्ये 'चांद्रयान ३' मधून चंद्र कसा दिसतो हे पाहिले जाऊ शकते. चंद्राचा हा व्हिडिओ 'लुनर ऑर्बिट इन्सर्शन (LOI)' दरम्यान अवकाशयानाने घेतला आहे. हा व्हिडिओ दि. ५ ऑगस्ट रोजी काढण्यात आला होता. दरम्यान दि. ६ ऑगस्ट रोजी 'चांद्रयान ३' ला मोठ्या प्रक्रियेतून जावे लागले.
दुसरीकडे, 'चांद्रयान ३' ने दि. ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास LOI प्रक्रिया पूर्ण केली. यासह आता हे यान चंद्राच्या स्थिर कक्षेत पोहोचले आहे. हे १४ जुलै २०२३ रोजी 'सतीश धवन स्पेस सेंटर' वरून प्रक्षेपित करण्यात आले. यासाठी LVM-३ रॉकेटचा वापर करण्यात आला. 'चांद्रयान ३' ने पृथ्वी आणि चंद्रादरम्यान ३ लाख किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. याने पृथ्वीची कक्षा पूर्ण करून चंद्राच्या दिशेने ट्रान्स-लूनर प्रवास सुरू केला.
'चांद्रयान ३' ने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये चंद्राच्या पृष्ठभागाचे चित्र पाहिले जाऊ शकते, जे निळ्या आणि हिरव्या रंगात आहे. सोबतच त्यावर अनेक छोटे खड्डेही दिसून येत आहेत. ९ ऑगस्ट रोजी होणारे पुढील मोठे ऑपरेशन चंद्रापासूनचे अंतर आणखी कमी करेल. सध्या ते १७० किमी x ४,३१३ किमी अंतरावर आहे. ही मोठी प्रक्रिया ९ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते २ या वेळेत पूर्ण होणार आहे.
या मोहिमेचा सर्वात मोठा दिवस २३ ऑगस्ट रोजी येईल, जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर स्वदेशी इंजिनवर आधारित 'चांद्रयान ३' उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल. 'चांद्रयान ३' सध्या चांगल्या स्थितीत असून सॉफ्ट लँडिंगच्या मार्गात कोणतीही अडचण येऊ नये. लँडिंग यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया (तत्कालीन सोव्हिएत युनियन) आणि चीननंतर भारत हा पहिला देश असेल.