चांद्रयान ३ मोहीम ; सॉफ्ट लँडिंगपासून ते फोटो पाठविण्यापर्यंतचा टप्पा कसा असेल, जाणून घ्या
23-Aug-2023
Total Views | 55
नवी दिल्ली : इस्त्रोची महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान ३' मोहिम अंतिम टप्प्यात आली असून सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञ सज्ज झाले आहेत. चांद्रयान चंद्राच्या १५ मैल इतक्या कमी अंतरावर असून अवघ्या जगाचे लक्ष भारताच्या या अतुलनीय कामगिरीकडे लागले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणे अद्याप कुठल्याही देशाला शक्य झाले नाही आहे. त्यामुळे भारत दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा पहिला देश ठरणार आहे.
'सॉफ्ट लँडिंग'चे असे असेल वेळापत्रक
सायंकाळी ०५ वाजून ४४ मिनिटांनी सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरु होईल.
सायंकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करण्यात येईल.
सॉफ्ट लँडिंगमधला पहिला टप्पा लँडिंगनंतर विक्रम लँडर ३ ते ३.५ तास चंद्राच्या पृष्ठभागावरची धूळ खाली बसण्याची वाट पाहेल.
दुसऱ्या टप्प्यात प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर येईल.
तिसरा टप्प्यात विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर एकमेकांचे फोटो पाठवतील, हा क्षण भारतासाठी ऐतिहासिक असेल.
चांद्रयान ३ मोहिमेची उद्दिष्टे कोणती
इस्त्रोने २००८ साली चांद्रयान मोहिम आखली होती. त्यामाध्यमातून आतापर्यंत इस्त्रोने ३ मोहिमा केल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागाबाबत अनेक धागेदोरे हाती लागले आहेत. त्यातील प्रमुख भाग म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा अंश असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला आहे. ते पाणी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या स्वरुपात असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे भारताची ही अतिमहत्त्वाकांक्षी मोहिम पाण्याबरोबरच तेथील जमिनीत असणाऱ्या खनिजांच्या शोधाचा महत्त्वाचा भाग असणार आहे.