कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील एका शाळेत स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. बंगालमधील उत्तर २४ परगना येथील बशीरहाट उपविभागातील टाकी नगरपालिकेतील टाकी षष्ठीचरण नीलमाधव हायस्कूलमध्ये दि. १ ऑगस्ट रोजी हा स्फोट झाला आहे.
शाळेच्या प्रयोगशाळेत अमोनियाने भरलेली भांड्याचामुळे स्फोट झाल्याचे बोलले जात आहे.यामुळे विज्ञान शिक्षकासह किमान किमान १० विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर जखमी विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या स्फोटामुळे इतर विद्यार्थिनींमध्येही घबराट पसरली आहे.
अर्णब गुहा दास नावाचे विज्ञान शिक्षक १२ वीच्या काही विद्यार्थिनींसोबत बंद पडलेल्या शाळेच्या 'प्रयोगशाळेत' बराच काळ विज्ञानाचे प्रात्यक्षिक वर्ग घेत होते. त्याचवेळी हा स्फोट झाला. मात्र, प्राथमिक तपासाच्या आधारे अमोनिया वायूने भरलेल्या जारचा स्फोट झाल्याने हा अपघात झाल्याचा दावा केला जात आहे.
शाळेत ही घटना घडली तेव्हा विद्यार्थिनी वेगवेगळी रसायने घालून काही प्रयोग करत होत्या. अहवालानुसार, स्फोटाचा मोठा आवाज ऐकून शाळेतील इतर शिक्षक आणि विद्यार्थी प्रयोगशाळेच्या दिशेने धावत आले, तेव्हा त्यांना काय झाले आणि स्फोटाचा आवाज कुठून आला हे समजू शकले नाही. पण प्रयोगशाळेकडे पाहिलं तेव्हा शिक्षक आणि विद्यार्थिनी जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले.
जखमी शिक्षक आणि विद्यार्थिनींना त्यानंतर प्रयोगशाळेतून बाहेर काढण्यात आले. तसेच टाकी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
शाळेने सांगितले की ही विज्ञान प्रयोगशाळा बर्याच काळापासून बंद होती. मात्र, अमोनिया कंटेनरचा स्फोट कसा आणि का झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचवेळी शिक्षण विभागाच्या हस्तक्षेपानंतर शाळेच्या बाजूनेही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या शिक्षण विभागानेही या संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला आहे. जिल्हा उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला आहे.