इर्शाळवाडीला काही लोक व्हॅनिटी व्हॅनने आले, आम्ही चिखल तुडवला: मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र
28-Jul-2023
Total Views |
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतून उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. इर्शाळवाडीला काही लोक व्हॅनिटी व्हॅनने आले, आणि आम्ही चिखल तुडवला. असं म्हणत त्यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर ठाकरेंनी इर्शाळवाडीला भेट दिली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, "इर्शाळवाडीची दुर्घटना झाली. सरकार त्यांच्या पाठी राहिलं. ज्या ज्या ठिकाणी पूर आला, अतिवृष्टी झाली त्यांच्या पाठी सरकार राहिलं आहे. सरकार सर्वांच्या पाठी राहत असतं. माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी एवढ्या पुरतं हे सरकार मर्यादित नाही. हे सरकार सामान्य जनतेचं सरकार आहे. म्हणून आम्ही तातडीने नुकसानग्रस्तांना पैसे दिले. त्यांना तिष्ठत ठेवले नाही." असं शिंदे यांनी सांगितलं.
"इर्शाळवाडीतील लोकांची आम्ही कंटेनरमध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्या संडास, बाथरूमची व्यवस्था केली. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही भूखंड पाहिला. या भूखंडावर सिडकोला तातडीने घरे बांधून देण्यास सांगितले. आम्ही बोलून थांबत नाही. आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत. वर्क फ्रॉम होम नाहीये हे."
पुढे ते म्हणाले, "शेतकरी जेव्हा अडचणीत येतो, सामान्य माणूस अडचणीत येतो, तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठी आपण उभे राहतो. आपण दुर्घटनास्थळी गेल्यावर लोक खडबडून जागी होतात. मी ही तिथे गेलो. फार कठिण परिस्थिती होती. पण काही लोक व्हॅनिटी व्हॅनमधून आले होते. माझ्यासह काही लोक चिखल तुडवत गेले. मी गेलो म्हणून मोठेपणा सांगत नाही. या दुर्घटनेच्या दिवशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मी संपर्कात होतो. कंट्रोल रुमशी संपर्कात होतो. मोठी यंत्रणा तिकडे होती. त्यामुळे मदत झाली. आम्ही केवळ देखावा केला नाही." असा निशाणा शिंदेंनी यावेळी साधला.