सैन्यदलांचे मनोबल कमकुवत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न – भाजपची टिका

    05-May-2025
Total Views |
सैन्यदलांचे मनोबल कमकुवत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न – भाजपची टिका

नवी दिल्ली, उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेलवर दिलेल्या विधानावरून भाजपने काँग्रेसवर टिका केली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेपलीकडून गोळीबार करत आहे, तर सीमेच्या या बाजूने इंडी आघाडीचे नेते सैन्याला लक्ष्य करत आहेत, अशी टिका भाजपने केली आहे.

भाजपचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सोमवारी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस आणि इंडी अलायन्सच्या नेत्यांची विधाने भारतीय सैन्याचे मनोबल कमकुवत करण्याच्या उद्देशाने केली जातात. ते म्हणाले की, विरोधी इंडी अलायन्सचे नेतेही मुखवटा घालून म्हणतात की ते सरकारसोबत आहेत. मात्र, अशी विधाने करून ज्यामुळे सैन्याचे मनोबल कमकुवत करण्याचे काम करण्यात येते.

सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी आणि उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांच्या विधानांचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या दहशतवादी घटनांनंतरही, मनमोहन सिंग यांच्या सरकारने पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय चर्चा पुढे ढकलल्या नाहीत असे एकही वर्ष गेले नाही. तर नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या ११ वर्षात, असे एकही वर्ष गेले नाही जेव्हा सरकारने पाकिस्तानशी औपचारिक चर्चा केली आहे. ते म्हणाले की, यावरून भाजप आणि काँग्रेसच्या विचारसरणीतील फरक दिसून येतो.