बदलती व्यावसायिक स्थिती, विभिन्न प्रकारची आव्हाने यावर मात करून स्थायी व दूरगामी स्वरुपात यशस्वी होण्यासाठी ’ईएसजी’ हा एक सार्थ व समर्थ पर्याय ठरू शकतो. यावर अधिकांश प्रतिसाद देणार्यांचे एकमत झाले आहे. कुठलाही नवा व्यवस्थापन पर्याय हा खर्चिक असतोच. मात्र, या वाढीव खर्चावर प्रगत तंत्रज्ञान, सुधारित कार्यपद्धती, गुणात्मक दर्जावृद्धी व व्यावसायिक कार्यक्षमता यांद्वारे मात केली जाऊ शकते.
'आऊटलूक’ तर्फे करण्यात आलेल्या ’ईएसजी’ (‘एन्व्हायर्न्मेंटल, सोशल व गव्हर्नन्स’)म्हणजेच कॉर्पोरेट स्तरावरील त्यांच्या व्यवसायवाढीच्या जोडीलाच पर्यावरण संवर्धन, दीर्घकालीन उपाययोजना व व्यावसायिक कायद्यांची काटेकोर अंमलबजावणीची सद्यःस्थिती, या नव्या प्रगतिशील मापदंडांची प्रथमच अंमलबजावणीची सद्यःस्थिती याची प्रथमच मोजमाप करण्यात आली. एवढेचे नव्हे, तर जागतिक स्तरानुसार, पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय मुद्द्याचा व्यापक अभ्यासासह जो विचार मांडला गेला, या बाबी मुळातूनच तपासून पाहण्यासारख्या आहेत.
या प्रकरणाची पार्श्वभूमी म्हणजे, गेली काही वर्षं ’सेबी’ म्हणजेच ‘सिक्युरिटिज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांनी ’ईएसजी’ प्रणालीची अंमलबजावणी करण्याबद्दल आग्रही भूमिका घेतली होती. याचाच पुढचा टप्पा म्हणून २०२१-२२ या आर्थिक वर्षापासून ‘सेबी’अंतर्गत प्रमुख व निवडक अशा एक हजार कंपन्यांनी त्यांच्या वार्षिक व्यवसाय व आर्थिक अहवालाचाच आवश्यक भाग म्हणून या कंपन्यांद्वारा व्यावसायिक जबाबदारीअंतर्गत दीर्घकालीन उपाययोजना व त्याची अंमलबजावणी कशी आणि कितपत झाली, त्याचा तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्देशांची त्यानुसार अंमलबजावणी सुरू करण्यात आली, हे विशेष.याच नव्या आणि विशेष निर्देशांच्या अंमलबजावणीचा पडताळा पाहण्याच्या दृष्टीने पहिलाच प्रयत्न म्हणून ‘आऊटलूक’ने व्यवसाय व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करणार्या ’बीडीओ इंडिया’ या प्रस्थापित कंपनीच्या मार्गदर्शन व सहकार्याने ‘ईएसजी भारत सर्वेक्षण २०२३’ करण्यात आहे.
या नव्या सर्वेक्षणाद्वारे ‘ईएसजी’च्या संदर्भात व्यवसाय व व्यवस्थापन क्षेत्रातील व्यवस्थापन आणि व्यवस्थापक यांची तयारी, मानसिकता व मुख्य म्हणजे अंमलबजावणीच्या संदर्भातील सद्यःस्थितीची पडताळणी करण्याचे काम प्रामुख्याने करण्यात आले. त्यानुसार सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्यात ’ईएसजी’सह काम करणार्या निवडक १०० कंपन्यांचा प्रतिसाद जाणून घेण्यात आला. त्यामध्ये या कंपन्यांनी ’ईएसजी’ संकल्पना व कार्यपद्धतीचा केलेला अवलंब, तयारी, अंमलबजावणी, त्यासंदर्भातील सद्यःस्थिती अडचणी व भविष्यातील योजना इ. चा पडताळा घेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले गेले.
सर्वेक्षणाला व्यापक व परिणामकारक स्वरूप देण्यासाठी त्यामध्ये विविध प्रकारच्या उद्योग- कंपन्यांचा आवर्जून समावेश करण्यात आला, हे विशेष. या उद्योगांचा थोडक्यात तपशील सांगायचा म्हणजे त्यामध्ये वित्तीय सेवा संस्था, ऊर्जा व उत्पादन क्षेत्र, ग्राहकोपयोगी वस्तू उद्योग, आरोग्यसेवा मूलभूत सुविधा क्षेत्र, माहिती-तंत्रज्ञान व संदेशवहन या प्रकारे निश्चित करण्यात आला.
सर्वेक्षण आणि प्रतिसादाला अधिक प्रभावी व परिणामकारक करण्यासाठी त्यामध्ये संबंधित कंपन्यांचे व्यावसायिक प्रमुख, संस्थापक, मुख्याधिकारी, संचालक, ‘ईएसजी’ विभागप्रमुख वा संबंधित व्यवस्थापकांचा आवर्जून समावेश करण्यात आला होता. यालाच जोड म्हणून या विषयातील विषयतज्ज्ञ, अभ्यासक व संबंधित मंडळींचा समावेश केल्याने त्याला अधिक संयत व समावेशक स्वरूप देण्यात आले.
सकृतदर्शनी पाहता, ’आउटलूक भारत सर्वेक्षण २०२३’द्वारे स्पष्ट झालेला तपशील खालीलप्रमाणे स्पष्ट झाला.यासंदर्भात महत्त्वाची बाब म्हणजे, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या केवळ ३३ टक्के मुख्याधिकारी वा सर्वोच्च व्यवस्थापकांनी त्यांची कंपनी वा उद्योग ’ईएसजी’ची कार्यपद्धती समजून त्याची अपेक्षित व परिणामकारक स्वरुपात अंमलबजावणी करण्यासाठी सिद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.सर्वेक्षणातील ८० टक्के प्रतिसाद देणार्यांनी त्यांच्या व्यवसायवाढीसाठी पर्यावरण संरक्षण-संवर्धन, ही बाब सर्वात मोठी व महत्त्वाची ठरू शकते, असे म्हटले आहे.
५० टक्के म्हणजेच निम्म्या व्यवस्थापनांच्यानुसार ’ईएसजी’ म्हणजेच ‘एन्व्हायर्न्मेंटल, सोशल व गव्हर्नन्स’ या व्यवसाय व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे त्यांच्यासाठी एक नवे व मोठे आव्हान ठरले आहे.९५ टक्के कंपन्यांमध्ये उद्योग-व्यवसायाशी संबंधित विविध कायदे व नियम आणि त्यातील तरतुदींचे पालन करणे, ही बाब पुढे अधिक महत्त्वाची व जिकिरीची ठरली आहे. त्याचबरोबर या कायदे व नियम पालनावरच या नव्या कार्यपद्धतीचे यश अवलंबून राहणार आहे.सुमारे ६ टक्के प्रतिसाद देणार्यांनी कोरोना काळानंतर अधिकांश व्यवसाय-उद्योग आता पुरतेपणी सावरले असून, त्यामुळे आता त्यांच्यासाठी ’ईएसजी’ची अंमलबजावणी करणे तुलनेने सोपे झाले आहे.
ढोबळमानाने सांगायचे म्हणजे ’ईएसजी’ या त्रिसुत्रीमधील पर्यावरण संरक्षण-संवर्धन ही बाब महत्त्वपूर्ण असली, तरी ती प्रामुख्याने व मुख्यतः उत्पादन क्षेत्र, ऊर्जा निर्मिती, वाहतूक व्यवसाय, मूलभूत सुविधा, खाणकाम, बांधकाम क्षेत्र या आणि यांसारख्या व्यवसाय क्षेत्रांशी अधिक निगडित आहे. एवढेच नव्हे, तर या नमूद केलेल्या निवडक व विशेष व्यवसाय क्षेत्रांमध्ये परिणामकारक अंमलबजावणी होण्यावरच पर्यावरण विषयक संकल्पनेचे यश प्रामुख्याने अवलंबून राहणार आहे.
व्यवसाय-उद्योगनिहाय कंपनी व्यवस्थापनाद्वारे आपापल्या व्यवसायानुरूप व त्याला पूरक स्वरुपात ’ईएसीजी’ सूत्रांंचा प्राधान्यक्रमासह अवलंब करण्यात येत असल्याचे या सर्वेेक्षणाद्वारेे स्पष्ट झाले आहे. प्रतिसाद देणार्यांच्या मते, अधिक प्रगत आणि स्थायी स्वरूपात प्रगतिशील व्यवसाय साधण्यासाठी वरील त्रिसुत्रीचे पालन करणे आवश्यकच नसून, पूरकसुद्धा ठरते. मात्र, संबंधित कंपनीच्या व्यवसायानुसार अंमलबजावणीवर भर दिला, तर त्याचा व्यवसायातील मूल्यवृद्धीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, ही बाब स्पष्ट झाली आहे.
सर्वेक्षण-अभ्यासाद्वारे स्पष्ट झालेली अन्य मुख्य बाब म्हणजे, बदलती व्यावसायिक स्थिती, विभिन्न प्रकारची आव्हाने यावर मात करून स्थायी व दूरगामी स्वरुपात यशस्वी होण्यासाठी ’ईएसजी’ हा एक सार्थ व समर्थ पर्याय ठरू शकतो. यावर अधिकांश प्रतिसाद देणार्यांचे एकमत झाले आहे. कुठलाही नवा व्यवस्थापन पर्याय हा खर्चिक असतोच. मात्र, या वाढीव खर्चावर प्रगत तंत्रज्ञान, सुधारित कार्यपद्धती, गुणात्मक दर्जावृद्धी व व्यावसायिक कार्यक्षमता यांद्वारे मात केली जाऊ शकते. आज ‘ईएसजी’चा अवलंबन करणार्या कंपन्या नेमक्या या मुद्द्यावर आशादायी स्वरूपात भर देत आहेत, हे विशेष.
यालाच पूरक बाब म्हणून अभ्यास सर्वेक्षणात सहभागी झालेल्या व्यवस्थापन प्रमुखांनी व्यवस्थापन पद्धतीचा एक भाग म्हणून ’ईएसजी’ पद्धतीवर आधारित विशेष प्रशिक्षणाचे आयोजन-नियोजन सुरू केले आहे. नव्या पद्धतीला हे विशेष प्रशिक्षण पूरक ठरेल, असा या मंडळींना विश्वास आहे. अर्थात, या नव्या व्यवसाय शैलीसाठी मानवीय पैलूंसह बदलाचे व्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांचा समावेश प्रशिक्षणामध्ये करणे अर्थातच महत्त्वाचे ठरणार आहे.
’आऊटलूक’तर्फे ‘ईएसजी’ भारत सर्वेक्षणाचा हा तसा पहिलाच प्रयोग ठरला आहे. ’ईएसजी’वर आधारित व्यवसायशैली व पद्धतीला मिळणारी वाढती व्यावसायिक मान्यता व उपयुक्तता आता वाढत्या प्रमाणावर दिसून येते. त्याचमुळे या नव्या पद्धतीमुळे स्थायी व व्यापक स्वरुपात व्यावसायिक फायदे होऊ शकतात. यावर अधिकांश जणांचे आता एकमत झाल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.
सर्वेक्षणाशी संबंधित अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, पर्यावरणाला पसंतीसह प्राधान्य देण्याकडे व्यवस्थापन आणि व्यवस्थापक यांचा कल असला, तरी व्यवसायाशी निगडित सर्वच समाजघटक आणि संस्था यांचा सामाजिक संदर्भात विचार करणे व तसेच उद्योग- व्यवसायाला लागू होणार्या सर्वच कायदे-नियमांचे पालन व्यावसायिक गरज नव्हे, तर व्यवस्थापनाची व्यावसायिक जबाबदारी स्वरुपात पार पाडणे, तेवढेच महत्त्वाचे व आवश्यक आहे. यावर सर्वेक्षणात एकमत दिसून येते. व्यवसाय-व्यवस्थापनाच्या संदर्भात ’आऊटलूक’ सर्वेक्षणाच्या या पहिल्याच प्रयत्नाचे हे मोठे फलित ठरले आहे.
-दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक
आणि सल्लागार आहेत.)