देवतेसमोर शंख, घंटा आदी वाद्ये वाजविली जाण्याचा व आरत्या इत्यादी म्हणण्याचा परिपाठ केवळ वैदिक म्हणजे हिंदू समाजातच आहे. एका ख्रिश्चन मित्राने लेखकाला मोठ्या अविर्भावाने प्रश्न केला की, ‘तुमच्या मंदिरात देवासमोर घंटा का लावता व वाजविता?’ प्रश्न खरोखरीच मार्मिक होता, इतका मार्मिक की अधिकांश लोकांना त्याचे उत्तर देणे कठीण आहे. एकदम सरळ उत्तर न देता लेखकाने त्याला प्रश्न केला, ’आम्ही देवासमोर घंटाच नव्हे, तर झांज, मृदुंगादी सर्वच वाद्ये वाजवित असतो. तसे आम्ही का वाजवीत असतो, यामागे साधनामार्गात अनुभवाला येणार्या अनाहत नादांच्या साक्षात्काराचे शास्त्र आहे. पण, तुम्ही लोकांनी आमचे पाहूनच स्वतःच्या चर्चमध्ये घंटा लावणे सुरू केले आहे.
म्हणून तुम्हीच सांगा की तुम्ही चर्चमध्ये घंटा का लावता’? त्याला उत्तर सुचेना. या प्रश्नाच्या उत्तराचा संबंध साधना मार्गातून अनुभवाला येणार्या अनाहत नादाशी येतो. अनाहत नाद म्हणजे सगळा अनुभवाचाच भाग, ज्याला अनाहत नादाचा अनुभव नसेल तो शंख-घंटादी वाद्यात अनाहत नादाचा साक्षात्कार पाहूच शकणार नाही, मग उत्तर द्यायचेच झाल्यास, लोकांना नादरत करून भक्तिभावात नेण्याकरिता घंटा वाजवित असतात किंवा शंख वाजवून वातावरणातील सूक्ष्म जीवाणू मारण्याकरिता असल्या वाद्यांचा उपयोग देवालयात करतात, असली काहीतरी तर्कटे लढवून आम्ही आमच्या मेंदूला बुद्धीच्या दालनात नेऊन बसवितो. ज्याला साधना मार्गातील असल्या अनुभवांचा साक्षात्कार झालेला असतो, तो साधक किंवा सिद्ध असतो, केवळ पुस्तके वाचून प्रवचने करणारा कोरडा विद्वान नव्हे.
भारतीय संगीताची धाव समाधीकडे असल्यामुळे ज्या-ज्या मार्गाने मनाला शांती मिळून चित्त आपोआप समाधी अवस्थेत जाईल त्या-त्या मार्गातील अनुभवांना आपल्या ऐहिक जीवनात स्थान देऊन त्या समाधीसदृश्य आनंदाची अवस्था ऐहिक जीवनात आणण्याची धडपड वैदिक परंपरेत नेहमीच झाली आहे. खरा भक्त व योगी साधना कालात अनाहत नादाचा अनुभव घेत असतो. अनाहत नादानंतर देवतेचा साक्षात्कार फार दूर नसतो. साधक त्या उच्च अवस्थेतून ऐहिक जीवनात उतरल्यावर त्या उच्च अवस्थेचा आनंद ऐहिक जीवनात आणण्याकरिता सदा प्रयत्नशील असणारच.
साक्षात्कारातील देवतेची तो प्रतिमा तयार करून त्याचे पूजन करीत असतो व ते पूजन करीत असताना देवतेच्या साक्षात्कारातील अनाहत नादाच्या सदृश नाद प्रकार ऐहिकरित्या उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असतो. अनाहत नादासारखे नाद उत्पन्न करू शकणारी वाद्ये म्हणजे शंख, घंटा, झांज, मंजिर्या इत्यादी होत. देवर्षी नारदांची वीणा व भगवान श्रीकृष्णाची वेणू असल्याच अनाहत नादाची साधने होत. ऋषी, मुनी, सिद्ध यांनी तुरीय अवस्थेत ऐकलेल्या अनाहत नादाची बरोबरी करणारे नाद काढण्याकरिता तसले नाद उत्पन्न करू शकणारी वाद्ये उत्पन्न केली. वाद्ये संशोधन केली गेली म्हणून तसे नाद उत्पन्न झाले असे नाही, तर त्या उच्च अवस्थेतील नादांसारखे नाद उत्पन्न करण्याकरिता तसले नाद उत्पन्न करू शकणारी वाद्ये उत्पन्न करण्यात आली. वैदिक शास्त्रे निर्गत (Deductive) प्रकृतीची असल्याचा हा एक दाखला आहे. आज वाद्ये तयार करण्याचे एक शास्त्रच तयार होत आहे. कसा आवाज हवा ते अगोदर ठरवायचे मग तसला आवाज उत्पन्न करू शकणारे वाद्य त्या हिशोबाने तयार करायचे, इतके आज वाद्यशास्त्र उन्नत झाले आहे.
तद्वत वैदिक काळातही जशा आवाजाची आवश्यकता असेल, तसा आवाज काढू शकणारी वाद्ये उत्पन्न करण्याची किमया माहीत होती. त्या काळात भगवतभक्ती व योगसाधना यांना अतिशय महत्त्व असल्याने त्या अवस्थेतील अनाहत नादासारखा नाद उत्पन्न करू शकणारी वाद्ये मुद्दाम तयार करण्यात आली. वैदिक काल किती उन्नत अवस्थेतील काल होता हे यावरून लक्षात येईल. मनुष्याच्या अंतःकरणात ज्याप्रकारच्या भावना उत्पन्न होतात, त्यांचे उन्नयन करून त्यांना सह्य पराकोटीला घेऊन गेल्यास त्या शांत होतात व त्या शांत अवस्थेपासून त्याला आनंदच होतो, असा भारतीय मानसशास्त्राचा सिद्धांत आहे. हर्ष म्हणजे आनंद नव्हे. हर्ष हा विकार आहे, तर आनंद एक चैतन्यमय अवस्था आहे अन् म्हणजे श्वासोच्छवास करणे, स्पंदन करणे, स्पंदन होणे. ’आनीदवातम् स्वधया तदेकम्’ असे ऋग्वेदात वर्णन आहे.
हिरण्यगर्भात चैतन्य स्फुरल्यावर सृष्टीचा पसारा व्यापत गेला म्हणूनच त्या मूल अवस्थेला ’ब्रह्म’ म्हणजे फुगणारे असे म्हटले आहे. अखिल ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेल्या चैतन्यशक्तिची पिंडागणिक अवस्था म्हणजे ’चित’ असल्याने मूल चैतन्याकडे प्रत्येक चित्ताची धाव असल्यास प्रत्येक चित्ताला आनंदच होईल, यात शंका नाही. जड व्यवहारातील उदाहरण घ्यायचे झाल्यास, एखाद्या नवविवाहितेला बर्याच दिवसांनंतर प्रथमच माहेरी जाताना जसा आनंद होतो, तसाच आनंद पिंडागणिक अडकून पडलेल्या चित्ताला चैतन्यात जाताना होतो. चित्ताला भिन्न भिन्न अवस्थाभावांतून तृप्त करून त्याचे उन्नयन करणे व अशा उन्नयनित चित्ताला समाधीच्या दारावर नेऊन सोडणे हेच भारतीय संगीताचे कार्य होय. भारतीय संगीताची धाव व प्रकृती अशी असल्याने केवळ उद्दीपकतेला किंवा शुष्क वैचित्र्याला भारतीय संगीतात वाव नाही. भारतीय संगीत शास्त्र विधायक आहे.
संगीत व समवेदना
नदीवर किंवा विहिरीवर पाणी भरायला जाणार्या सुना एकमेकीस वाटेत भेटतात, क्षणभर थांबतात. त्यांच्या आपसात गोष्टी होतात. दोघीही घरच्या जाचामुळे त्रस्त झाल्या असल्याकारणाने एकमेकींना आपल्या दुःख जाचाचे निवेदन करतात. दोघीही समदुःखीअसल्याने परस्परांची दुःखे ऐकून एकमेकीत जिव्हाळा उत्पन्न होतो व त्या सहानुभूत अवस्थेतून त्यांच्या दुःखाचा भार कमी होतो. एक प्रकारची शांत अवस्था प्राप्त होते. त्या भाररहीत शांत अवस्थेमुळे त्यांच्या चित्ताला आनंदाची अनुभूती होते. आर्द्र घनातून वर्षाव सुरू होतो. आपले पाणावलेले डोळे पुसून चित्ताचा भार कमी झाल्यामुळे भराभर पावले टाकीत बिचार्या आपल्या घरी जातात व भविष्यातील वाढून ठेवलेल्या दु:खांना सहन करण्याकरिता पुन्हा तयार होतात. दुःखी माणूस सुखांत घटना, नाटक किंवा चित्रपट पाहण्याची इच्छा करणार नाही. कारण, तसल्या घटनांमध्ये त्याला सहानुभूतीचा ओलावा अनुभवता न आल्यामुळे, त्याचे चित्त त्या घटनेशी समरस होऊ शकत नाही. नापास झालेला विद्यार्थी प्रथम कोण कोण नापास झाले, हेच पाहतो. पास झालेल्या विद्यार्थ्यांकडे त्याचे लक्षच नसते. उलट उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे वाचून त्याला चीड़ उत्पन्न होते आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांतील यादीत बर्यापैकी समजल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची नावे पाहून त्याला एक प्रकारचे समाधान प्राप्त होते.
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७