‘राष्ट्र सेविका समिती’च्या चतुर्थ प्रमुख संचालिका, वंदनीय प्रमिलताईजी मेढे यांचे दि. ३१ जुलै रोजी सकाळी ९.०५ वाजता नागपुरातील देवी अहिल्या मंदिरात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे ९७ वर्षांचे जीवन हे त्याग, कर्मठता, जागरूकता, तत्परता, आदर आणि राष्ट्रनिष्ठा यांचे एक अद्वितीय उदाहरण आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा आणि जीवनकार्याचा परिचय करुन देणारे हे दोन श्रद्धांजलीपर लेख...
३१ जुलै रोजी सकाळी सकाळी बातमी आली आणि मनात आलं, ‘राष्ट्र सेविका समिती’च्या पहिल्या फळीतील ही शेवटची कडी निखळली. वंदनीय मावशींसोबत काम करणार्या या सगळ्या सेविका आपापल्या परीने अद्वितीय अशाच होत्या. त्यांच्या अखंड प्रयत्नांमुळे ‘राष्ट्र सेविका समिती’ सर्वदूर पसरली, मोठी झाली. त्याची फळे आज दिसत आहेत. बेबीआत्या तर वं. मावशींची सावलीच होती जणू.
प्रमिलताई मेढे म्हणजेच आमची बेबीआत्या. मूळची नंदुरबारची. दि. ८ जून १९२९ रोजी जन्मलेल्या बेबीआत्याचे तळोदा येथे बालपण गेले. त्यानंतर शिक्षण पूर्ण करून नागपुरात भावंडांची जबाबदारी घेऊन नोकरीनिमित्ताने नागपुरातील तिची मावशी म्हणजे आमची आजी-अक्का महाशब्दे यांच्याकडे महालात राहायला आली. बेबीआत्याला दोन भाऊ आणि दोन बहिणी. मोठ्या बाबीआत्याचे लग्न झाले होते. धाकटी नलू आत्या, बाळ काका आणि भैय्या काका ही दोन भावंड. त्यांची शिक्षणं, संसार या सगळ्यात लक्ष घालत आणि आणि ‘डीएजीपीटी’तील नोकरी सांभाळत ती वं. मावशींच्या सोबत समितीचे काम करू लागली. पुढे समितीच्या कामाचा व्याप वाढल्याने आणि नागपुरात ‘अहिल्या मंदिर’ ही वास्तू समितीच्या कार्यालयासाठी उपलब्ध झाल्यामुळे आता तिकडेच राहावयास जावे, असे तिच्या मनात आले. तिने समितीच्या कामात स्वतःला अक्षरशः झोकून दिले. बापूंनी तिची कल्पना उचलून धरली. समितीच्या कामासाठी पूर्णवेळ उपलब्धता असावी, यासाठी हे योग्य आहे आणि आताच तिने अहिल्या मंदिरात राहण्यास जावे, हे आक्काला पटवून दिले. समितीच्या अनेकविध दायित्वाचे निर्वहन करून ती २००६ साली समितीची प्रमुख संचालिका झाली. २०१२ सालापर्यंत ही जबाबदारी पार पाडून पुढे वंदनीय शांताक्का यांना प्रमुख संचालिकापदाची जबाबदारी प्रदान करून ती थोडी मोकळी झाली. तरीही कामात खंड नव्हता. नागपुरातील अहिल्या मंदिरात अखंड व्यस्त असलेल्या तिला आपण सर्वांनी पाहिलेच आहे.
आम्ही लहान असताना आमची आई शाळेत नोकरी करायची, त्यामुळे सकाळची आमची वेणीफणी, खाणंपिणं हे सगळं बेबीआत्याच बघायची. माईवर तिचा अधिक जीव. मी तर फारच लहान होते. आईनंतर मावशी म्हणतात; आम्हाला मात्र आईच्या नंतर ही आत्या सर्वांत जवळची ठरली.
संध्याकाळी सगळ्या मुलांना रामरक्षा, भगवद्गीता शिकवणे हे तिने आवडीने केले. ती संस्कृत ‘एमए’ होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत अहिल्या मंदिरात राहायला जाणे, हे मुळी कर्तव्यच असायचे. उन्हाळी वर्ग, वं. मावशींचा प्रवास अशा सगळ्या गदारोळातही ‘अहिल्या मंदिरा’त आम्ही निवांतपणे राहायचो. आमच्या आठवणीतला पहिला फ्रिज तिच्याकडे आला. कारण, तिला थंड गोष्टी खायला सांगितल्या होत्या. ‘अहिल्या मंदिरा’त राहून नोकरी करून समितीचे पूर्ण कार्यालय ती सांभाळत असे. पुढे भावंडांचे संसार मार्गी लागल्यावर तिने नोकरीतूनही निवृत्ती घेतली आणि पूर्ण वेळ समितीसाठी उपलब्ध होण्याची इच्छा व्यक्त केली. आता तिचा देशभर प्रवास सुरू झाला. पुढे समितीची अखिल भारतीय कार्यवाहिका असताना तिने समितीविषयी प्रदर्शनी घेऊन जगभराचा प्रवास केला. सर्वदूर सेविकांना जोडण्यासाठी तिचा प्रवास खूप उपयोगी ठरला. नऊवार साडीतील तिची सडपातळ मूर्ती सगळीकडे सेविकांना आकर्षित करीत होती. तिचे विचार, तिचं वक्तृत्व, तिची बोलण्याची पद्धत आणि मातृत्वाने भरलेले काळीज या सर्वांचा प्रभाव सर्वदूर सेविकांवर पडत असे. तिला भेटण्याची ओढ प्रत्येकीमध्ये असायची. पुढे समितीची चौथी प्रमुख संचालिका हे पद तिच्याकडे आले आणि फक्त पदाचे नाव बदलले, परंतु काम तसेच चालू होते. देशभराचा प्रवास, वर्ग, शिबिरे, त्यातील वेगवेगळे विषय आणि ‘अहिल्या मंदिरा’त असल्यावर अखंड फोनवरून समितीच्या सेविकांशी संपर्क हा तिचा दिनक्रम. शिस्तबद्ध वर्तन, वेळच्यावेळी स्वतःचे काम स्वतः पूर्ण करणे आणि दिवसाचा जास्तीत जास्त वेळ समितीच्या कामासाठी देणे हे तिने आयुष्यभर जपले.
‘अहिल्या मंदिरा’तील वसतिगृहातील मुलींनादेखील तिचा लळा खूप होता. तिच्या या सगळ्या कार्यकर्तृत्वातून प्रेरणा घेऊन जेव्हा मी विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करण्याचे निश्चित केले, तेव्हा तिला भेटण्यासाठी ‘अहिल्या मंदिरा’त गेले होते. एक बराच मोठा प्रवास उरकून ती सकाळीच नागपुरात पोहोचली होती. परंतु, प्रवासाचा शीण बाजूला ठेवून तिनं माझं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतले. बापूंचे काय म्हणणे आहे, तेही विचारले. काही सूचना केल्या. परंतु, अतिशय आनंदाने मला तिच्याकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला. विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करीत असतानादेखील ती नागपुरात आलेली कळल्यावर एकदा जाऊन भेटून यायचे, हे ठरलेले होते. मुळातून सर्वांची चौकशी, स्मरणशक्ती अफाट. त्यामुळे ठीक ठिकाणच्या सर्वांची ती आठवण ठेवून विचारपूस करीत असे. पूजनीय आचार्य जितेंद्रनाथ स्वामींनी "हे ‘अहिल्या मंदिर’ म्हणजे मातृतीर्थ आहे,” असे भावोद्गार काढले होते.
लग्न झाल्यावर नागपुरातील प्रत्येक भेटीमध्ये ‘अहिल्या मंदिरा’त जाऊन येणे आणि तिची भेट घेणे हे ठरलेलेच होते. प्रत्येकाची चौकशी ती अगत्याने करीत असे. कोणाचे काय चालले आहे, याचे स्मरणही तिचे शेवटपर्यंत होते. आताच जून महिन्यात एका धावत्या भेटीत ‘अहिल्या मंदिरा’त भेटायला गेलो, तेव्हा तिची अवस्था बघून अतिशय मनाला वेदना झाल्या. तरीही कुठेही निराशेचा सूर न लावता तिने सर्वांचे स्वागत, चौकशी केलीच. आई गेली की माहेर पोरके होते म्हणतात, तशी एक भावना आज मनात भरून राहिली आहे. तिच्या संबंधित फेसबुकवर आलेले लेख वाचत असताना अनेक आठवणींचा कोलाज मनात दाटून राहिला. आधीच्या पिढीतील हा शेवटचा दुवा निखळला. आता आपणच मोठे व्हायला हवे नाही का? चित्राताई आणि अन्य सेविकांनी तिची अखेरपर्यंत खूप सेवा केली. तिचे शरीर क्षीण झाले असले, तरी स्मृती जागृत होती. अखेरपर्यंत आठवण ठेवून सर्वांना ती प्रेरणाच देत होती. समितीच्याच प्रार्थनेत म्हटल्याप्रमाणे,
समुत्पादयास्मासु शक्तिं सुदिव्याम्
दुराचार दुर्वृत्ति विध्वंसिनीम्
पिता-पुत्र भातृष्च भर्तारमेवम्
सुमार्गम् प्रति प्रेरयन्तीमिह॥ ‘अहिल्या मंदिर’ या मातृतीर्थाची आधारवड आणि मातेसमान वंदनीय बेबीआत्याला हा अखेरचा दंडवत...
अलका करमरकर