आपण आजही समाजात अनेक मुले रस्त्यावर, स्टेशनवर, वीटभट्टीवर, डम्पिंग ग्राऊंडवर भंगार वेचताना, कारखान्यात काम करताना, पुलांखाली भीक मागताना आणि कितीतरी ठिकाणी वाईट अवस्थेत बघत असतो. हे चित्र कधी बदलणार असा प्रश्न नेहमीचाच आहे. परंतु, आज इतक्या वर्षांनंतरही तेच चित्र आहे. वंचित, शोषित समाजगटातील मुलांच्या शिक्षणातील काटे दूर करणे गरजेचे आहे. ‘समतोल फाऊंडेशन’ हे कार्य निष्ठेने करत आहे. त्यासंदर्भात अनुभव इथे व्यक्त केला आहे.
शिक्षणामुळे विकास होतो, नक्कीच होतो, पण त्यासाठी शिक्षण घेतले, तर पाहिजे.. सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे म्हणून शिक्षणाचा अधिकार कायदाही आला, मुलांच्या नावांची सरकारी अंगणवाड्यांमध्ये नोंदही झाली. परंतु मुले कुठे आहेत? ‘समतोल’च्या उपक्रमांपैकी ‘स्कूल इन बस’ हा उपक्रम आम्ही वीटभट्टीवरील मुलांसाठी राबवित आहोत. चार भिंतींच्या आत शिकणार्या शाळेत मुलांची नावे दाखल तर आहेत, परंतु येत काहीच नाही, लिहिता, वाचता येणं हे विषय तर मुलांसाठी दूरचेच असतात. एकीकडे इंटरनॅशनल शाळांमध्ये लाखो रुपये भरून मुलांना प्रवेश दिला जातो, तर दुसरीकडे रोजगारासाठी बाहेर पडणारे कुटुंबासोबत आलेल्या मुलाला शाळा फक्त ऐकायला मिळते, शिकायला मिळतच नाही आणि याकडे कोणाचेही लक्ष नाही.
वीटभट्टी मालक पैशाच्या लालसेपोटी अनेक कुटुंबे घेऊन येतो, त्यांना लालूच दाखवतो. पण, मुलांच्या बाबतीत विचार करीत नाही. तसेच, सरकारी विभागही या मुलांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांना पौष्टिक आहारहीमिळत नाही. शाळा तर खूप दूरची गोष्ट आहे. अंगणवाडी सेविकांचे तर या मुलांकडे लक्षच नसते. मुरबाड, कल्याण, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर यामधील वीटभट्टी व तेथील मुलांच्या बाबतीत सर्वेक्षण केल्यानंतर ७००/८०० मुले सर्व सुविधांपासून वंचित आहेत, असे चित्र आहे. हे सर्व पाहून ही मुले आपली नाहीत का? असा प्रश्न पडतो. ‘समतोल’ने केलेल्या सर्वेक्षणांनुसार, शिक्षकांबरोबर संपर्क केला असता मुले स्थलांतरित जरी झाली तरी दुसर्या ठिकाणी शाळेत जाऊ शकतात. परंतु, वीटभट्टी गावापासूनदूर अंतरावर असल्यामुळे मुले शाळेपर्यंत पोहोचत नाहीत. जवळ जवळ वीटभट्ट्या असतील, तर आठवड्यातून एकदा नोंद होण्यासाठी पोषक आहार दिला जातो. पण वास्तव तर खूप वेगळे आहे. कागदी घोडे नाचवताना जे पगारी आहेत त्यांना त्यांचे काम करावे लागते.
खरतर सरकारी योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्या योग्य पद्धतीने राबविल्या तरच त्याचा फायदा होतो,अन्यथा ‘आंधळ दळते आणि कुत्रं पीठ खाते’ अशी अवस्था असते. आज देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे होत आली तरीही या समस्या जागेवरच आहेत. यामध्ये काही बदल, जनजागृती होत असते परंतु पुन्हा तेच. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने जर काम करायचे असेल समाज बालप्रेमी होणे खूप आवश्यक आहे. ‘समतोल’ ही खूप छोटी संस्था आहे. परंतु, संस्थेच्या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे, काम करण्यामागचा विचार मोठा आहे, दृष्टिकोन मोठा आहे. म्हणूनच पुरेसा निधी नसतानाही या समस्येला हात घालून बसमधील शाळा म्हणजेच चार भितींऐवजी चारचाकांच्या गाडीत या मुलांची शाळा सुरू केली. यालाच आम्ही ‘स्कूल इन बस’ असे नाव दिले आहे. सरकारी पद्धतीने नियमानुसार जी शाळा चालते त्याच शाळेतील लिखाण, वाचन आमच्या या शाळेत चालते, मुलांना शिकवले जाते. ज्यांच्या शिक्षणाचा प्रवाह तुटला आहे त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते.
जेव्हा जेव्हा मुलांच्या समस्या निर्माण होतात. तेव्हा तेव्हा समतोलने पुढाकार घेऊन नवी दिशा समाजाला दिली आहे. आज १००/१५० मुले पुन्हा शाळेच्या प्रवाहात आहेत, विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत.‘समतोल फाऊंडेशन’चे सध्याचे अध्यक्ष व ठाणे शहर आमदार संजय केळकर साहेब यांना याविषयाची जाण आहे. त्यामुळे असा एखादाच बालप्रेमी आमदार शांतपणे ही समस्या विधिमंडळाच्या पटलावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडतो. एखादी समस्या ही छोटी असतानाच जर त्याकडे लक्ष गेले, तर ती मोठी होणार नाही याची खात्री ‘समतोल’ला आहे. मुलांचे मनपरिवर्तन होण्यासाठी मनपरिवर्तन केंद्र तर आहेच. परंतु, शालेय शिक्षणासाठी अशी योजना फक्त ‘एक स्कूल इन बस’ तयार करून चालणार नाही, तर हजारो स्कूल इन बस शासनाने व समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करून तयार कराव्या लागतील. तेव्हा हा विषय एक मॉडेल ठरेल. बालकामगार ही समस्या भयानक व राक्षसी बनली आहे. वीटभट्टीचा विषय तर आहेच.
पण, ऊसतोड कामगार, बांधकाम करणारे मजूर, व्यापार करणार्या लहान लहान तांडे, फिरणार्या जमाती अशा अनेक भटक्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा हा विषय आहे. शिक्षण म्हणजे जणू काही वाटेवरती काटेच पसरले आहे की काय असे या मुलांना वाटते. कारण, प्रत्येक जाती जमाती, त्यांची मुले, त्यांच्या सवयी वेगवेगळ्या आहेत. आमच्या सरकारी शाळेत याची व्यवस्थाच नाही त्यामुळे मुलांशी संवाद हा मनापासून होत नाही. त्यामुळे मुले शाळेत बसत नाहीत, शिकत नाहीत. अंगणवाडी सेविका फक्त नोंद करून रेकॉर्ड करते. पण, मुलाला काही येतच नाही. शिवाय गावाच्या कानाकोपर्यात यांच्या वस्ती, तांडे, पालं, घर, झोपड्या असल्यामुळे तिथपर्यंत सरकारी कर्मचारी, अधिकारी, शाळा पोहोचत नाही म्हणूनच या मुलांसाठी ‘स्कूल इन बस’ हा विषय समतोलने हाती घेतला आहे. समतोलचा आता एकच वसा.... ’शिक्षणाने समृद्ध होऊया, समाजामध्ये समतोल राखूया’...