शांतीप्रिय होण्याचा खटाटोप

    04-May-2023   
Total Views |
China ready to intervene for better Bangladesh-Myanmar relationship

एरव्ही शेजारील राष्ट्रांसाठी डोकेदुखी ठरणारा आणि विस्तारवादासाठी वाटेल त्या थराला जाणारा चीन सध्या बदलतोय. होय, चीन बदलतोय. आपल्या सीमा वाढविण्यासाठी कुरापती करण्यात चीन उतावीळच असतो. परंतु, वादाचे कारण ठरणारा आणि वाद निर्माण करणारा चीन चक्क वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेऊ लागला आहे. विश्वास बसणार नाही. परंतु, मागील काही महिन्यांपासून घडणार्‍या घटना पाहता, चीन आता दोन राष्ट्रांतील वाद वाढविण्याऐवजी तो मिटविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

सौदी अरेबिया आणि इराण यांच्यातील दुरावा कमी करण्यात चीनने विशेष पुढाकार घेतला होता. त्यानंतर या दोन्ही देशांनी सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. चीनच्या शिष्टाईमुळे दोन्ही देश पुन्हा एकत्र आले. त्यानंतर आता चीनने म्यानमार आणि बांगलादेश यांच्यातील तणाव दूर करण्याचे ठरवले आहे. आधी सौदी अरेबिया-इराण व आता बांगलादेश-म्यानमारमधील तणाव दूर करण्यासाठी चीन मध्यस्थाची भूमिका घेण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार. चीनचा फायदा असल्याशिवाय चीन इतका सोज्वळ बनण्याचा खटाटोप करणार नाही, हे खरे. परंतु, चीन मध्यस्थाची भूमिका पार पाडण्यासाठी इतका का उत्सुक आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

अमेरिकेला टक्कर देण्यासाठी चीन आपले जागतिक पातळीवरील स्थान मजबूत करत असून त्याचबरोबर स्वतःची प्रतिमा उजळवण्यासाठी प्रयत्न करतोय. नुकतेच चीनचे परराष्ट्रमंत्री किन गैंग यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांतील वाद शमवण्यासाठी चीन उत्सुक असल्याचे सांगितले. त्यानंतर चीन मध्यस्थाची भूमिका निभावणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर तेथील सत्ताधारी नेतृत्वासोबत चर्चा करणारे किन गैंग एकमेव होते. विशेष म्हणजे, चीनने म्यानमारमधील लष्करी सत्तापालटाला त्यांनी कधीही चुकीचे म्हटले नाही.

म्यानमारमधील ‘जुंटा’ सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर फार गांभीर्याने घेतले जात नाही. भारत वगळता अनेक बड्या देशांकडून म्यानमारला आणि तेथील ‘जुंटा’ सरकारला दुर्लक्षित केले जाते. याचाच फायदा प्रयत्न चीन करताना दिसतो. अन्य देशांकडून भलेही ‘जुंटा’ सरकारला दुर्लक्षित केले जात असले तरीही चाणाक्ष चीन मात्र तसे करत नाही. चीन ‘जुंटा’ सरकारशी जवळीक साधून आहे. म्यानमारदेखील आता हळूहळू शेजारील देशांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करू पाहत आहे. यासाठी चीन ‘जुंटा’ सरकारच्या मदतीला धावून आला आहे. किन गैंग यांनी म्यानमारचे सैन्य हुकुमशाह जनरल मिन ऑन्ग यांना सांगितले की, “चीन म्यानमारसोबत संबंध वाढविण्यासाठी उत्सुक आहे. चीन म्यानमार आणि बांगलादेशातील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांचे नेहमीच स्वागत करेल. चीन दोन्ही देशांसोबत काम करण्यास उत्सुक असून एकमेकांच्या सहकार्याने मैत्री आणखी वाढवू इच्छित आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारच्या संप्रभुतेचा सन्मान करून त्याठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे आले पाहिजे.” विशेष म्हणजे, याआधी चीनने रोहिंग्या घुसखोरांच्या प्रकरणातही हस्तक्षेप करण्याचा प्रस्ताव दिला होता. काही दिवसांपूर्वीच सौदी आणि इराणमधील मतभेद दूर करून दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध पुन्हा सुरू झाले. यात चीन मध्यस्थ झाला होता. त्यानंतर चीनने आपला मोर्चा म्यानमार आणि बांगलादेशकडे वळवला आहे.चीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी धडपडण्यामागे त्याच्या मनाचा मोठेपणा नाही, तर स्वार्थच दडलेला आहे. ‘इकोनॉमिक कॉरिडोर’ आणि दोन्ही देशांतील अनेक योजना हे त्यामागील मुख्य कारण आहे. २०२१ साली आंग सान सू की यांना हटवून म्यानमारमधील सैन्याने सत्ता हस्तगत केली.

सत्तापालटानंतर झालेल्या हिंसेत हजारो नागरिकांचा जीव गेला. त्यानंतर चीनचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडकून पडले आहेत. या प्रकल्पांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी चीन म्यानमारशी जवळीक साधत शांततेचे गोडवे गात आहेत. त्याचप्रमाणे रोहिंग्यांच्या मुद्द्यांवर बांगलादेश आणि म्यानमारमध्ये तणाव आहे. त्यामुळे या दोघांतील वाट मिटवून शांतीदूत बनण्याचे श्रेय चीनला आपल्या नावावर करायचे आहे. बांगलादेशातही चीनने अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहे. दोन्ही देशांतील तणावपूर्ण वातावरण चीनला फायदेशीर नाही. त्यामुळे दोन्ही देशांना जवळ आणण्यासाठी चीन प्रयत्न करतोय. यामुळे, शांतता भंग करण्याऐवजी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेणारा देश, अशी आपली प्रतिमा निर्माण करण्याची संधीही चीनला मिळणार आहे.


 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.