निश्चित उत्पन्नांचे पर्याय

    11-May-2023   
Total Views |
fd

निश्चित उत्पन्नांच्या विविध पर्यायांमध्ये प्रामुख्याने बँकांमधील ठेवी, पोस्टातील ठेव योजना, खासगी कंपन्यांच्या ठेव योजना ‘एनसीडी’ (नॉन कर्न्व्हटेबल डिबेंचर्स - अपरिवर्तनीय कर्जरोखे) रिझर्व्ह बँकेचे बॉण्ड्स, काही डेट योजना आदींचा समावेश होतो. गुंतवणूक करताना किती काळासाठी गुंतवणूक करायची? जोखीम क्षमता, गरज पडल्यास पैसे परत मिळण्याबाबतचे नियम इत्यादी मुद्दे लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा. काही रक्कम ही चांगल्या बँकांच्या ‘एफडी’ (फिक्स डिपॉझिट - मुदत ठेवी)मध्ये नक्कीच ठेवावी. सार्वजनिक उद्योगातील स्टेट बँकेसह अन्य बँका, खासगी बँकांत ‘आयसीआयसीआय’ व ‘एचडीएफसी’, सहकारी बँकात, ‘सारस्वत’, ‘टीजेएसबी’, ‘एसव्हीसी’ व ‘एनकेजीएसबी’ यापैकी कोणत्याही एक किंवा जास्त बँकांत गुंतवणूक करण्यास हरकत नाही. बँका आता सात ते आठ टक्क्यादरम्यान कमाला व्याज देऊ लागल्या आहेत.
अल्प बचत योजना

केंद्र सरकारच्या ‘अल्प बचत योजनां’चे व्याजदरही सध्या चांगले आहेत. सध्याचे व्याजदर ३० जूनपर्यंत असून दि. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी ते व्याजदर जाहीर होणार आहेत. केंद्र सरकारतर्फे या योजनांचे व्याजदर दर तीन महिन्यांनी जाहीर होतात. ‘अल्प बचत योजनां’तील गुंतवणूक सुरक्षित असते. जोखीम नसते व परतावा निश्चित मिळतो.

ncd

या सर्व सरकारी योजनांचे व्याजदर सध्या आकर्षक आहेत.खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले पोस्टाचे जाळे आणि सरकारने नेमलेले अधिकृत अल्पबचत एजंट यांच्यामुळे या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत.

कंपन्यांच्या मुदतठेवी

बँकांप्रमाणेच काही बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी - नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज) भारतीय ‘रिझर्व्ह बँके’ने ठेवी स्वीकारण्याची परवानगी दिलेली आहे. यात ‘एचडीएफसी’ कंपनी अग्रणी आहे. याशिवाय ‘बजाज फायनान्स’, ‘महिन्द्रा फायनान्स’, ‘आयसीआयसीआय होम फायनान्स’, ‘एलआयसी हाऊसिंग फायनान्स’, ‘पीएनबी हाऊसिंग फायनान्स’, ‘श्रीराम फायनान्स’ या कंपन्याही ठेवी स्वीकारतात. या कंपन्या ठेवीदारांना बँकेपेक्षा अधिक दराने व्याज देतात. पण, बँकांत ठेवी ठेवण्यात कमी असलेली जोखीम या गुंतवणुकीत मात्र जास्त असते. कंपन्यांच्या मुदत ठेवीत गुंतवणूक करताना फक्त व्याजदर न पाहता, संबंधित कंपनीची आर्थिक स्थिती, पतमानांकन (रेटिंग) व्यवसायाची स्थिती - आव्हाने, ठेव व व्याज वेळेवर देण्याचा इतिहास, प्रर्वतक आदींची पूर्ण माहिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. या गुंतवणुकीवर बँकांच्या ठेवींसारखे विमा संरक्षण नाही.

‘एनसीडी’

काही कंपन्या ‘नान-कन्व्हर्टिबल डिबेंचर’ (एनसीडी)च्या माध्यमातून पैसे उभे करतात. भांडवली बाजारात जसे शेअर विक्रीस काढले जातात, तसेच ‘एनसीडी’ही विक्रीस काढले जातात. अलीकडच्या काळात विक्रीस आलेल्या चोला मंडल्स इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड फायनान्स, ‘इंडिया बुल्स’, ‘मुथूट फायनान्स’ या ‘एनसीडी’ इश्यूंचे व्याजदर आठ ते नऊ टक्क्यांच्या दरम्यान असतात. ही गुंतवणूतक सुरक्षित मानली जाते, तरी यात जोखीम असतेच. यात गुंतवणूक करताना संबंधित कंपनीची आर्थिक स्थिती, रेटिंग, व्यवसायाची स्थिती-आव्हाने, प्रवर्तक आदींची पूर्ण माहिती लक्षात घेतलीच पाहिजे. ‘डीएचएफएल’ व ‘डिएमके डेव्हलपर्स’ या कंपन्यांच्या ‘एनसीडी’मध्ये गुंतवणूक करणारे अडचणीत आले होते, हेही इथे नमूद करायला हवे.

रिझव्हर्र् बँक फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉण्ड्स

केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेमार्फत २०२० मध्ये फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉण्ड्स बाजारात आणले. सात वर्षे मुदतीचे हे सरकारी बॉण्ड अत्यंत सुरक्षित मानले जातात. यातील गुंतवणुकीवर दर सहा महिन्यांनी (१ जानेवारी व १ जुलै) व्याज दिले जाते. मात्र, ते सरत्या किंवा बदलत्या स्वरुपाचे असते. सध्या दि. ३० जूनपर्यंत याचा व्याजदर ७.३५ टक्के आहे.
निश्चित उत्पन्नाच्या योजनांचा पर्याय निवडताना भराव्या लागणार्‍या प्राप्तिकराचाही विचार व्हायला हवा. ‘पीपीएफ’मधली गुंतवणूक वगळता बाकी सर्व गुंतवणूक योजनांवर मिळणारे व्याज व परतावा करपात्र असतो. गुंतवणुकीतून येणारे उत्पन्न करदात्याच्या एकूण उत्पन्नात समाविष्ट होते व एकूण उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागतो.

आरबीआय रिटेल

सर्वसामान्य गुंतवणूकदारांस ‘आरबीआय रिटेल डायरेक्ट’ योजनेत खाते उघडता येते. हे खाते ऑनलाईन पोर्टलवर उघडता येते. https://rbiretaildirect.org.in ‘केवायसी’ कागदपत्रे, ईमेल आयडी, आधारकार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर हे खाते उघडताना लागतात. हे खाते निवासी तसेच अनिवासी भारतीय असे दोघांनाही उघडता येते. हे खाते एकट्याच्या किंवा संयुक्त नावाने उघडता येते. ऑनलाईन पोर्टलवर लॉग-इन करून खाते उघडण्यासाठीचा अर्ज भरावा लागतो. त्यानंतर आपल्या मोबाईलवर तसेच आपल्या ई-मेलवर ‘ओटीपी’ पाठविला जातो. हे दोन्ही ‘ओटीपी’ ‘सबमिट’ केल्यावर आपले खाते उघडले जाते. या खात्यास आपले बँक खाते जोडावे लागते. ते चेकची फोटो कॉपी अपलोड करून किंवा खात्याचे सर्व तपशील भरून लिंक करावे लागते. खात्याला ‘नॉमिनेशन’ देणे बंधनकारक आहे.

जास्तीत जास्त दोन नॉमिनी देता येतात. ‘आरबीआय रिटेल डायरेक्ट’ ही सुविधा वापरण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. गरज पडल्यास खात्यामधील सिक्युरिटिज प्लेज करून कर्ज घेता येते व असे बँकांकडून सहज मिळते. आपण अगदी सहजगत्या घरबसल्या ‘आरबीआय रिटेल डायरेक्ट’ खाते उघडू शकतो व आपल्या दीर्घकालीन गरजांसाठी सुरक्षित व किफायतशीर गुंतवणूक करू शकतो.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.