मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मल्लखांबाचे प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना वर्षभर निशुल्क प्रशिक्षण मिळणार

    22-Apr-2023
Total Views | 68
bmc

मुंबई
: विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी नेहमीच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य विविध विषयांच्या अनुषंगाने अभिनव उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण मिळावे आणि त्यातून उत्तम नागरिक घडावा, हा यामागील उद्देश असतो. ही कार्यवाही महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, सहआयुक्त अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात करण्यात येते. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा आणि मल्लखांब क्षेत्रात त्यांना रुची निर्माण व्हावी, या उद्देशाने महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे (रोप मल्लखांब) प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व शिक्षण अधिकारी राजू तडवी यांच्या नेतृत्वात हाती घेण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. धारावी भागातील महानगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये यासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला असून दि. १८ ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान दोरीवरील मल्लखांब शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रीशिवछत्रपती पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार तसेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ क्रीडापटू आणि प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी क्रीडा उपविभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे, प्रशासकीय अधिकारी (शाळा) स्नेहलता डुमरे, क्रीडा पर्यवेक्षक दत्तू लवटे, कनिष्ठ पर्यवेक्षक कुनील सोनवणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील क्रीडा उपविभागाकडून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दादर येथील समर्थ व्यायाम मंदिराचे सहकार्य लाभले आहे. धारावी भागातील टीसी मनपा शाळा आणि संत कंकय्या मार्ग या दोन्ही शाळांमध्ये दोरीवरील मल्लखांब प्रशिक्षणाचा पथदर्शी प्रकल्प राबवला जात असून त्या अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी दोन्ही शाळांमधील इंग्रजी, हिंदी, उर्दू, मराठी तसेच तमिळ माध्यमाच्या तिसरी आणि चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या १४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांतून ८० विद्यार्थ्यांची पुढील प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.

त्यानंतर दर आठवड्यात सोमवार ते गुरुवारी सकाळी १० ते ११.३० वाजेदरम्यान वर्षभराच्या कालावधीसाठी समर्थ व्यायाम मंदिराचे प्रशिक्षक या विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे मोफत प्रशिक्षण देतील. उर्वरित काळात शाळेतील शारीरिक शिक्षक या विद्यार्थ्यांचा सराव करून घेतील. दोरीवरील मल्लखांबसाठी लागणारे सर्व साहित्य महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती क्रीडा उपविभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी दिली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121