पुन्हा युद्धाची ठिणगी...

    16-Apr-2023   
Total Views |
Iran-Azerbaijan conflict

कोणताही देश संकटात असेल तर त्याला प्रथम शेजारी देशाकडून मदतीची अपेक्षा असते. शेजारी देशासोबत चांगले संबंध असल्यास मदत मिळण्यात फार अडचणी येत नाही. परंतु, ज्या देशांचे शेजारील राष्ट्राशी संबंध चांगले नसतील तर त्यांच्यात कायम तणावाचे वातावरण पाहायला मिळते. असेच काहीसे झाले आहे, पश्चिम आशियातील अझरबैजान आणि इराण या दोन देशांचे.

युरोपच्या पूर्व भागात लागलेली आग अजून विझलेली नसताना आता कॅस्पियन समुद्रातही ठिणगी पडण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या मुद्द्यावर जगभरातून रशियाला सबुरीचे सल्ले दिले जात असताना इकडे इराण शेजारी देश अझरबैजानवर डोळे वटारू लागला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील तणाव युद्धाचे संकेत देऊ लागला आहे. परंतु, इराण अझरबैजानवर का भडकला आहे आणि दोन्ही देशांतील तणावाचे नेमके कारण काय, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

काही महिन्यांपासून दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. जानेवारी महिन्यात इराणमध्ये अझरबैजानच्या दुतावासावर झालेल्या हल्ल्यात सुरक्षा प्रमुखाची हत्या झाली, तर यात अनेकजण जखमी झाले. यासाठी अझरबैजानने इराणला दोषी ठरवले होते. त्यावर इराणने हा हल्ला व्यक्तिगत उद्देशाने केला असून त्याचा इराणशी काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलियेव यांनी हा हल्ला दहशतवादी असल्याचे सांगत इराणमधील दुतावास बंद केले. काही दिवसांपूर्वी अझरबैजानने स्वतःच्याच सहा नागरिकांना अटक करत त्यांच्यावर इराणी गुप्तचर संघटनांशी संबंध असल्याचा आणि सत्तापालट करण्याच्या कारस्थानाचा आरोप ठेवला. सोबतच, इराणी राजदूतांना समज देत इराणी दूतावासातील चार अधिकार्‍यांना त्यांच्या संशयास्पद कृत्यांमुळे प्रतिबंधित केले. अझरबैजान सरकारने हे १९६१च्या व्हिएन्ना कराराचे उल्लंघन असल्याचे सांगितले.

तिकडे इराणनेही अझरबैजानवर उत्तर-पश्चिमी सीमेच्या आत अलगाववादी भावना भडकविण्याचे आरोप लावले. या दोन्ही देशांतील तणावापेक्षाही इराणला अझरबैजानची इस्रायलशी वाढती जवळीक जास्त खटकत आहे. मागील महिन्यात अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्ते इस्रायलमधील अझरबैजानच्या दूतावासाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दोन्ही देशांच्या राजदूतांनी इराणविरूद्ध एक संयुक्त मोर्चा तयार करण्यावर चर्चा केली. ज्यावर इराणने आक्षेप घेत अझरबैजानला इशारा दिला. इराण आणि इस्रायल एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जातात. १९७९ साली इराणच्या क्रांतीने कट्टरपंथीयांना सत्तेत येण्याची संधी मिळाली. तेव्हापासून इराणी नेते इस्राइलला संपविण्याच्या गोष्टी करत असतात.

दरम्यान, अझरबैजान आणि तुर्की यांच्यात मैत्री असली तरीही तुर्की आणि इराणचे एकमेकांशी पटत नाही. तसेच, इराणला अझेरी अल्पसंख्याक सीमेपलीकडच्या संघर्षाने प्रभावित होण्याचीही भीती सतावत असते. इराणचे रशियासोबत चांगले संबंध असून रशिया आणि इराणचे तुर्कीसोबत चांगले संबंध आहे. तुर्की अझरबैजानचा सहकारी आहे, तर तुर्की आणि अझरबैजानचे अर्मेनियासोबत कटू संबंध आहे. मात्र, इराण अर्मेनियाचा सहकारी आहे. त्याचप्रमाणे, अझरबैजानची वाढती संपत्ती, शक्ती आणि प्रभावामुळे इराण कायम चिंतेत राहिला आहे.

अझरबैजानमध्ये नागार्नो काराबाख क्षेत्र असून तेथील नागरिकांनी या क्षेत्राला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे. या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नसली तरीही अझरबैजान या क्षेत्राला आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानतो. या क्षेत्रात सर्वाधिक लोकसंख्या अर्मेनियन नागरिकांची असल्याने अर्मेनिया याठिकाणी मदत पोहोचवते. ज्यामुळे अर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये तणाव आहे. २०२० साली दोन्ही देशांत घनघोर युद्ध झाले असून त्यात मोठे आर्थिक आणि मानवी नुकसान झाले. यात इराण मात्र अर्मेनियाची बाजू घेतो. इराणच्या उत्तर-पश्चिमी क्षेत्रात अझेरी लोक जास्त असून ते भावनिकरित्या अझरबैजानशी जोडले असून त्यांना भडकविण्यासाठी अझरबैजान प्रयत्न करत असतो. त्यामुळे इराणही चिंतेत असतो.

सध्या दोन्ही देशांतील तणाव कमी होण्याऐवजी वाढत आहे. इराणने अझरबैजानच्या सीमेलगत उच्चस्तरीय युद्धाभ्यास आयोजित केले होते. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये इराणने अरास नदीवर पुलाची निर्मिती केली. अशा अनेक कारणांमुळे पुढील काळात इराण-अझरबैजान या दोन्ही देशांतील संघर्ष वाढण्याची शक्यता असून त्याचे रूपांतर युद्धातही होऊ शकते.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.