वारंगळमधील ख्रिश्चनकांड आणि हिंदूंची सतर्कता

    15-Apr-2023   
Total Views |
 
Christian
 
 
तेलंगणमध्ये एक पाद्री ख्रिश्चन धर्मीयांची प्रार्थना करत आहे. प्रार्थना केल्यानंतर त्याने उपस्थितांना मांसाहाराचे वाटप केले. असा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी ‘व्हायरल’ झाला. या व्हिडिओवरून तेलंगणमध्ये एकच वादळ उठले. कारण, तो पाद्री जिथे प्रार्थना करत होता आणि जिथे त्याने या मांसाहाराचे वितरण केले ते टक्क तेलंगणमधील एक प्राचीन मंदिर आहे. हिंदूंसाठी अत्यंत पवित्र असलेल्या देवस्थानामध्ये त्या पाद्रीने हिंदू देवतांची नव्हे, तर त्यांच्या श्रद्धेप्रमाणे येसूस्तवन केले. ‘हे कणकण मे भगवान’ मानणार्‍या आमच्या समृद्ध वैभवशाली हिंदुत्वासाठी मान्यही केले असते, तरीसुद्धा हिंदूंनी इतकी सहिष्णूता दाखवल्यानंतर त्यांच्या श्रद्धेशी खेळत त्या मंदिरामध्ये मांसाहार वितरण करण्याचा खोडसाळपणा त्या पाद्रीने का करावा? या घटनेमागचे वास्तव आणि दूरगामी परिणाम याची चर्चा करणारा हा लेख...
 
आंध्र प्रदेश म्हणजे आताचे तेलंगण राज्यही त्यात आले. तर आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात इसवी सनाच्या 1083 ते 1323च्या दरम्यान काकतीय राजवंशाचे अधिपत्य होते. शतकोत्तर सामर्थ्यशाली साम्राज्य असलेले काकतीय राजवंश. तर तेलंगणच्या वारंगळ जिल्ह्यामध्ये काकतीय राजवंशाने निर्माण केलेले एक ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांचे पदचिन्ह (पाद मुद्रा) आणि शंकु चक्र आकृतीही दिसते. शिवरात्रीला इथे खूप मोठ्या प्रमाणात भाविक जमतात आणि शिवरात्री पूजाउत्सव साजरी करतात. अनेक शतकांपासून हे हिंदूंसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे. मंदिर ऐतिहासिक असल्याने हे मंदिर पुरातत्व विभागाच्या संरक्षणामध्ये आहे. तेलंगण बंदोबस्त विभाया मंदिराची देखभाल करत आहे, तर काही दिवसांपूर्वी या मंदिरामध्ये एका पाद्रीने ख्रिस्ताची प्रार्थना केली. इतकेच नव्हे, तर उपस्थितांना मांसाहार वितरित केला.
 
‘नॉन प्रॉफिट एक्टिविस्ट ग्रुप लीगल राईट्स प्रोटेक्शन फोरम’ने ट्विटरवर हा संपूर्ण घटनाक्रम कथन केला. हिंदू मंदिरात ख्रिस्ती प्रार्थना करत मांसाहार वितरित करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल व्हावा, म्हणून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासोबत तेलंगणमधील अनेक हिंदुत्ववादी संघटना एकत्रित आल्या. त्यांनी डीसीपी श्रीकांत राव आणि एसीबी रामाला सुनीता यांच्याकडे याबाबत तक्रार केली. संघटनांनी प्रश्न विचारला होता की, दुसर्‍या पंथाचे लोक जे मंदिर आणि देवदेवतांना मानतच नाहीत, त्यांनी मंदिरामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम कसा आयेाजित केला? श्रद्धाळूंची श्रद्धा आहे की, या मंदिरामध्ये मांसाहार करून जायचे नाही. मग या पाश्वर्र्भूमीवर तिथे येशू प्रार्थना करणार्‍यांना मांस कसे वितरित केले गेले? सामाजिक सलोखा बिघडावा म्हणूनच हे कृत्य केले गेले आहे, असा या संघटनांनी दावा केला. जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली नाही, तर रस्त्यावर उतरू, असा इशाराही या संघटनांनी दिला. त्यानंतर पोलीस अधिकारी डी.सांबैयाच्या तक्रारीनंतर पाद्री अरुण कुमार आणि त्याच्या सहकार्‍यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी या पाद्रीने कोणाची परवानगी घेतली होती? हे करण्यामागे त्याचे उद्दिष्ट काय? याचाही यानिमित्ताने मागोवा घेणे तितकेच गरजेचे आहे.
 
अर्थात, तेलंगणमधली ही घटना पाहून हिंदूंना वाटू शकते की, हे काय सुरू आहे? पण, जरा वस्तीपातळीवर लक्ष दिले तर जाणवते की, आपल्या आजूबाजूला हे असले प्रकार सर्रास चाललेले दिसतात. हिंदू देवदेवतांची वेशभूषा केलेल्या येशूचे चित्र, अगदी हनुमान चालीसाच्या धर्तीवर रचलेले येसू स्तवन, हिंदू सणांच्या पारंपरिक पद्धतीमध्ये हलकेच घुसवल्या गेलेल्या ख्रिस्ती आणि मुस्लीम पद्धती हे सगळे डोळे आणि बुद्धी उघडी ठेवली, तर दिसतेच दिसते. झारखंड, छत्तीसगढमध्ये तर चर्चच्या बाहेर रांगोळी आणि इतर विधी हिंदू पद्धतीने काढलेल्या आढळतात. या पार्श्वभूमीवर तेलंगणमधील या घटनीचे वैशिष्ट्ये काय? तर वारंगळमधील या देवस्थानावर हिंदूंची श्रद्धा आहे. पण, अशाप्रकारे या मंदिरामध्ये ख्रिस्ती पद्धतीने पूजा केली, तर त्याचे निश्चितच दूरगामी परिणाम उमटतील. जसे सहिष्णूता आणि धार्मिक उदारता हा हिंदू मनाचा गाभा आहे. त्यामुळे इथे येणार्‍या हिंदू बांधवांना फक्त एकदाच पटवून द्यायचे की, आम्ही या मंदिरामध्ये येतो, पूजा करतो, आम्ही काही वेगळे नाही. आम्ही काही वेगळी पूजा करत नाही. तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता.
 
एकदा का हे साध्य झाले की, मग धर्मांतराची पुढची वाट मोकळी! तर यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, ही घटना म्हणजे एक चाचणी होती. त्यांनी मंदिराचे पावित्र्य भ्रष्ट केले. या घटनेकडे हिंदूंनी कानाडोळा केला असता, तर मग त्यानंतर काही ना काही निमित्त काढून इथे सातत्याने येशूस्तवनाच्या निमित्ताने लोक जमले असते. मग हळूहळू इथे येणार्‍या लोकांची संख्या वाढवली गेली असती. जेव्हा हिंदू भाविकांना जाग आली असती, तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असती. तेव्हा हिंदूंनी हे मंदिर आमचे आहे, असे म्हटले असते. मग धार्मिक सलोखा कायम राहावा, असा आव आणत काही ठरावीक लोकांनी मग नेहमीप्रमाणे तडजोड करण्याचे मार्ग सूचविले असते. मंदिराच्या एका भागात हिंदूंनी पूजा करायची आणि मंदिराच्या दुसर्‍या भागात ख्रिस्ती धर्मीयांनी पूजा करावी, अशी मागणी तथाकथित पुरोगाम्यांनी केली असती. त्यांची मागणी पूर्ण होण्यासारखी नसती, मग त्यावेळी अल्पसंख्याकांच्या हक्कावर गदा आणली जाते. भारत असहिष्णू आहे, हे म्हणायला ‘ब्रेकिंग इंडिया’वाले मोकळे झाले असते.
 
दुसरीकडे मंदिरामध्ये ख्रिस्ती प्रार्थना आणि मांसाहार वितरण असेच सुखैनैव सुरू राहिले असते, तर काही दशकांतच हे मंदिर तर मंदिर नव्हतेच, यासंदर्भातल्या सुरस कथा निर्माण झाल्या असत्या. एका शतकानंतर तर या सुरस कथाच कसा सत्य इतिहास आहे, हेसुद्धा सिद्ध केले असते. अतिशय सूक्ष्म नियोजन.
 
महाराष्ट्रातील ऐतिहासिक मलंगगडाचे तरी यापेक्षा दुसरे काय झाले? काही शतकांपूर्वी नाथपंथींच्या या देवस्थानामध्ये सफाई आणि पडेल ते काम करण्यासाठी एक मुस्लीम व्यक्ती राहू लागली. मलंगगडावर होणार्‍या पूजेअर्चेवर पोट आणि जीवन सुरू असतानाही, या व्यक्तीने त्याचे मुस्लीम धार्मिक रितीरिवाज सोडले नाहीत. एकएक करून मलंगगडावर काही दशकातच 80 टक्के मुस्लीम समाज वस्तीला आला. हिंदूंना जाग आल्यानंतर कोर्टकचेर्‍या सुरु झाल्या. पण, मलंगगडचे ‘हाजीमलंग’ झालेच आणि हिंदूंचे हे देवस्थान ‘वक्फ बोर्ड’ची जागा आहे, असा दावाही ठोकण्यात आला. देशातील अनेक छोट्यामोठ्या पडिक जागांवर हक्क सांगण्याचा सपाटा याच प्रकारे चालवला गेला आहे. या पार्श्वभूमीवर वारगंळमधील मंदिराच्या घटनेला गांभीर्याने घ्यायला हवेच.
 
तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणतात की, ते मोदी आणि इतर कुणापेक्षाही कट्टर हिंदू आहेत, तर या मुख्यमंत्र्याच्या काळात पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असलेल्या मंदिरामध्ये हिंदूंच्या श्रद्धेचे तीनतेरा कसे वाजवले गेले? त्यावर हे राव काय बोलले, तर काहीच नाही. उलट त्यांच्याच राज्यात धर्मांतराच्या आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. धर्मांतराविरोधात आवाज उठवणार्‍यांविरोधात तत्काळ गुन्हे दाखल होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या याच अपयशामुळे अपक्ष आमदार राजाभैय्या यांचे म्हणणे की, मुख्यमंत्री निजामांचे आठवे वंशज आहेत. असो. लोकसभा खासदार रघु राजूने यापूर्वी म्हटले होते की, ”आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा या तेलुगु भाषिक राज्यांमध्ये 25 टक्के लोकसंख्या ख्रिस्ती धर्मांतरीत झाली आहे. अनुसूचित जातीजमातीच्या लोकांना फसूवन त्यांचे धर्मांतर करण्याचा धंदा इथे जोरात सुरू आहे. पण, जनगणनेत नवधर्मांतरीत लोक त्यांचा नवा धर्म लपवतात. जेणेकरून नवधर्मांतरीत लोकांना त्यांच्या पूर्वीच्या म्हणजे हिंदू धर्मातील जातीला मिळणारा सरकारी फायदा घेता येईल. धर्मांतरण झाले तरी जुन्या जातीच्या आधारे सरकारी क्षेत्रात मोक्याच्या जागी वर्णी लावून इतर नवधर्मांतरीत व्यक्तींना सहभागी करण्याचे तंत्र धर्मांतरण करणारे लोक अवलंबत आहेत. धर्मांतरण करण्याचा कुटील डाव रचणारे लोक नवधर्मांतरीत लोकांना प्रशिक्षण देत आहेत.”
 
आता यावर काही लोक म्हणतील की, काहीही काय, इतका कुणाला वेळ असतो का कुणाकडे? तर असतो, वेळ नक्कीच असतो. उगीच काही दशकांत ईशान्य भारत ख्रिस्तीबहुल झाला नाही आणि उगाच मोठ्या शहरामंध्ये मोक्याच्या जागीच दुमजली- तीनमजली चर्च आणि मशीद उभारल्या गेल्या नाहीत. आपल्याला प्रश्न पडतो की, इथे तर एकदोनच ख्रिस्ती किंवा मुस्लीम राहतात. मग इथे त्यांची टोलेजंग प्रार्थनास्थळे का बरं? अर्थात, पूजाप्रार्थना करण्याचा सगळ्यांना हक्क आहे. पण, दुसर्‍यांना फसवण्याचा आणि त्यांच्या श्रद्धेचा असा विकृत फायदा घेण्याचा हक्क कुणालाही नाही. त्यामुळेच वारंगळची घटना वाटते तितकी सोपी नाही. मात्र, यामध्ये समाधान एकच आहे की, सुरुवात होतानाच हिंदू शक्ती एकवटली. शेवटी हिंदू जागा झाला तो सुदिनच म्हणावा!!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.