ईशान्य भारत - काल आणि आज

चौफेर विकासामुळे अष्टलक्ष्मी ‘प्रसन्न’! (भाग ३)

    12-Apr-2023   
Total Views |
North-East-India- part-3


ईशान्य भारताची नेमकी समस्या ओळखून त्यासाठी आखण्यात आलेले विशेष धोरण, तेथील बंडखोर गटांशी चर्चा करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे यशस्वी प्रयत्न; यामुळे ईशान्य भारतामध्ये आता पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान आणि अंतराळ अशा विविध क्षेत्रांमध्ये चौफेर विकास होत आहे. त्यामुळे भारताची ही अष्टलक्ष्मी आता ‘प्रसन्न’ होत आहे, यात कोणतीही शंका नाही.

 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : केंद्र सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे ईशान्य भारत आपल्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षांत क्षेत्रीय परिषदांच्या बैठकांमध्ये ईशान्येच्या विकासासाठी एक हजाराहून अधिक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे आणि त्यापैकी ९३ टक्के समस्या सोडविण्यास यश आले आहे. त्यामुळे आता वादमुक्त ईशान्य भारत समृद्धी आणि चौफेर विकासाकडे वेगवान वाटचाल करत आहे.

विकासासाठी सर्वांत महत्त्वाचे असते ते दळणवळण. ईशान्य भारतामध्ये दळणवळणाच्या विकासाला गेल्या ९ वर्षात गती मिळाली आहे. ईशान्य भारतामध्ये २०१४-१५ ते २०२०-२१ या काळात रेल्वेमार्गांसाठी ३९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. त्याचप्रमाणे जिरीबाम-इम्फाळ असा नवा रेल्वेमार्ग, बांगलादेशशी रेल्वे दळणवळण सुनिश्चित करण्यासाठी आगरतळा-अखौरा रेल्वे लिंक प्रकल्पावर काम प्रगतीपथावर आहे. प्रदेशात २०१४-१५ पासून रस्ते व महामार्ग बांधणीसाठी ४८ हजार ५७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून ५ हजार ६९५ किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. उडान योजनेंतर्गत विमानतळांचाही विकास करण्यात येत असून सध्या एकूण ३४ हवाईमार्ग कार्यरत आहेत. राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रमांतर्गत ईशान्य भारतामध्ये ६० किमीचे ८ नवे रोपवे प्रकल्प साकारण्यात येणार आहेत.
 
ईशान्य भारतासाठी मोठी आर्थिक तरतूददेखील करण्यात येत आहे. त्याअंतर्गत, अर्थसंकल्पात ११०% वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विविध ५४ मंत्रालयांचा राखीव निधी २०१४-१५ सालच्या ३६ हजार १०८ कोटी रूपयांवरून ७६ हजार ०४० कोटींची वाढ करण्यात आली आहे. ईशान्येच्या पायाभूत विकासासाठी २०१४ ते मार्च २०२१ पर्यंत एकूण २ लाख ६५ हजार ५१३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ईशान्य भारत मंत्रालयाच्या आर्थिक तरतुदीमध्येही ६५ टक्के वाढ करण्यात आली आहे. नॉर्थ ईस्टर्न डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने १ जानेवारी २०२२ ते २१ डिसेंबर २०२२ पर्यंत, शिक्षण आणि प्रशिक्षण, अन्न प्रक्रिया, हातमाग आणि हस्तकला, आरोग्य सेवा, हॉटेल्स आणि पर्यटन, मायक्रोफायनान्स आदि क्षेत्रातील २९१७ प्रकल्पांना अनुक्रमे १०२३ कोटी आणि ६८३ कोटी रूपयांना मंजुरी देऊन त्याचे वितरण केले आहे.

अंतराळ क्षेत्रातही काम सुरू

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी शिलाँगमध्ये २००० साली अंतराळ विभागाच्या अंतर्गत ‘नॉर्थ ईस्टर्न स्पेस ऍप्लिकेशन सेंटर’ची (इनसॅक) स्थापना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली एनसॅकच्या कार्याचा विस्तार केला जात आहे. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे ‘इनसॅकचे’ अध्यक्ष आहेत. त्यांच्या निर्देशानुसार, अंतराळ तंत्रज्ञानाच्या योग्य वापरासाठी पूर्वोत्तर राज्यांसाठी एक विकास योजना तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये १२ विविध क्षेत्रांमध्ये एकूण ६१ कोटी रुपये खर्चाचे ११० प्रकल्प समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘इनसॅक’ने पूर्वोत्तर प्रदेशातील दुर्गम भागात ५० हून अधिक स्वयंचलित हवामान केंद्रे आणि १० लाइटनिंग डिटेक्टर स्थापित केले आहेत. त्याचप्रमाणे वारंवार येणार्‍या पुरांसह आपत्ती व्यवस्थापनातही ‘इनसॅक’ महत्वाची भूमिका पार पाडत आहे.

फरक आहे तो नेतृत्वाचा

माजी पंतप्रधान अटल बिहारी यांनी त्यांच्या कार्यकाळात ईशान्य भारताच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापन केली होती. त्याचप्रमाणे ईशान्य भारतामध्ये दौरा करून एक रात्र घालविणारे ते पहिले पंतप्रधान ठरले होते. त्यांच्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे तर आसाममधून राज्यसभेवर निवडून येत असत, मात्र त्यांनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात केवळ ८ ते ९ वेळाच ईशान्य भारताच्या दौर्‍यावर गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र गेल्या ९ वर्षांमध्ये ५० हून अधिक वेळा ईशान्य भारताचे दौरे केले आहेत. पंतप्रधानांच्या या कृतीमुळे ईशान्य भारतामध्ये आर्थिक विकासाला विशेष गती मिळाली आहे, हे नाकारता येणार नाही.






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.