पाकिस्तानमधील वाढती अराजकता आणि ‘मेक इन इंडिया’ची दमदार वाटचाल

    25-Mar-2023   
Total Views |
Growing chaos in Pakistan and Make in India


गेल्या आठवड्यामध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या, ज्याचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. तसेच एकीकडे पाकिस्तान दिवसेंदिवस अराजकाकडे मार्गक्रमण करीत असताना, भारताने मात्र ‘मेक इन इंडिया’च्या अभियानाला गतिमान केले आहे. तेव्हा, मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचे थोडक्यात विश्लेषण करणारा हा लेख...

 
अरुणाचल प्रदेशमध्ये बोमडिलाजवळ नुकतेच लष्करी हवाई दलाचे ‘चित्ता हेलिकॉप्टर’ अपघातग्रस्त होऊन लेफ्टनंट कर्नल व्ही. व्ही. बी. रेड्डी आणि मेजर जयंत ए. या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. तसेच गेल्याच आठवड्यात नौदलाच्या आधुनिक हलक्या ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरला मुंबईच्या समुद्रात आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले.भारतातल्या एक लाख कोटींच्या ‘शत्रू मालमत्ते’ची विक्री - देशातील १२ हजार, ६११ शत्रू मालमत्तांचा लिलाव होणार असून, त्यापैकी ६ हजार, २५५ मालमत्ता एकट्या उत्तर प्रदेशात आहेत.राष्ट्रीय तपास संस्थेने नुकतेच दहशतवाद संबंधित एका प्रकरणात काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. विविध प्रतिबंधित संघटना आणि त्यांचे सहयोगी विविध नावाखाली दहशतवादी आणि विध्वंसक कारवाया घडवून आणण्याचा आणि गुन्हेगारी कट रचण्याचा प्रयत्न करत होते.
 
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पीएफआय) कारवाया आणि राजस्थानमधील हिंसक अतिरेकी अजेंडा या प्रकरणातील तपास पूर्ण झाल्यानंतर ‘एनआयए’ने आरोपपत्र दाखल केले आहे.‘डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ने ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट लिमिटेड सीरिज प्रोडक्शन’ (एलएसपी - ३) विमानांवर ‘पॉवर टेक ऑफ शाफ्ट’ची (पीटीओ शाफ्ट) पहिली उड्डाण-चाचणी यशस्वीपणे केली आहे. या ‘पॉवर शाफ्ट’ची निर्मिती चेन्नईस्थित ‘कॉम्बॅट व्हेईकल्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’द्वारे करण्यात आली आहे. हा ’आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने आणखी एक मोठा टप्पा आहे.भारतीय नौदल, समुद्रातील शक्ती वाढवण्यासाठी २००हून अधिक ’ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ’ क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. यासाठी नौदल २० हजार कोटी रुपयांचा करार करणार आहे. ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र समुद्रात शत्रूच्या जहाजांवर हल्ला करण्यासाठी वापरले जाते. क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त, ‘ब्रह्मोस एरोस्पेस’ पाणबुडी, जहाजे, विमाने आणि ‘लॅण्ड प्लॅटफॉर्म’देखील बनवते.‘बीएसएफ’ने ‘अग्निवीरां’साठी दहा टक्के आरक्षण देण्यानंतर आता ‘सीआयएसएफ’तर्फे ‘अग्निवीरां’ना आणखी दहा टक्के आरक्षण दिले जाणार आहे.

गेल्या वर्षी केंद्र सरकारने ’अग्निपथ’ योजना सुरू केली. केंद्र सरकारने कार्यकाळ पूर्ण केलेल्या ‘अग्निवीरां’ना संरक्षण दलात सहभागी करून घेण्याची तरतूद केली होती. ही तरतूद २५ टक्के इतकी होती. उर्वरित ७५ टक्के ‘अग्निवीरां’चा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, त्यानंतर केंद्रीय निमलष्करी दल आणि आसाम रायफल्समधील दहा टक्के रिक्त जागा ‘अग्निवीरां’साठी राखीव ठेवल्या जातील.“रशिया-युक्रेन युद्धाकडे भारतीय परिप्रेक्ष्यातून पाहणे गरजेचे आहे. लष्कर आणि सैनिकांचे आधुनिकीकरण करण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, ‘सायबर’ तंत्रज्ञान यांचा विकास भारत करत आहे. त्यामुळे चीनसह कोणत्याही देशाच्या ‘सायबर’ हल्ल्यांचा सामना करण्यास भारत सज्ज आहे,” असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले.भारतास पारंपरिक शस्त्रास्त्रे, सीमांची सुरक्षा, कमीत कमी कालावधीचे युद्ध याकडे विशेष प्राधान्य द्यावे लागणार आहे. पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करून शस्त्रे, रसद आणि तांत्रिक मदतीचा पुरवठा अविरत ठेवण्याकडे लक्ष पुरवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे ‘सायबर’, ‘एआय’सारख्या युद्धावरही लक्ष ठेवावे लागेल.


 Make in India


भारतात ‘डिफेन्स स्टार्टअप’ची ‘इकोसिस्टीम’ तयार होत आहे. भविष्यातील युद्धाची व्याख्या बदलत असून भारताचे लष्करही बदलत आहे. प्रशासकीय स्तरावही अनेक सकारात्मक बदल होत आहेत.“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शीख समुदायाविषयी विशेष स्नेह आहे. त्यांनी शीख धर्मासाठी खूप काही केले आहे.‘आयएसआय’च्या इशार्‍यावर काम करणार्‍या अमृतपालसारख्यांचा भारतीय शीखांशी कोणताही संबंध नाही,” असे प्रतिपादन ‘दल खालसा’चे संस्थापक आणि माजी खलिस्तान समर्थक जसवंत सिंग ठेकेदार यांनी केले आहे. खलिस्तानी असल्याचा दावा करणारा अमृतपाल सिंग हा पारंपरिक शीख नाही. अमृतपालसारखे लोक हे ‘आयएसआय’च्या हातचे प्यादे आहे. त्यामुळे अमृतपालच्या कथित चळवळीची भारतीय शीखांशी कोणताही संबंध नाही,” असे जसवंत सिंग ठेकेदार यांनी म्हटले आहे.कर्तारपूर कॉरिडोर सुरू करणे, छोटे साहिबजादे (गुरू गोविंद सिंग यांचा मुलगा) यांच्या स्मृती जागविण्यासाठी ‘वीर बाल दिवस’ घोषित करणे हे अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्याचेही (सीएए) जसवंत सिंग ठेकेदार यांनी समर्थन केले आहे. ‘सीएए’द्वारेच अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदूंना सुरक्षितपणे भारतात आणणे शक्य झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शीख शिष्टमंडळास आपल्या घरी बोलावून त्यांचा सन्मान केला होता .

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, त्यांचा पक्ष दहशतवादी ?(१५-२० मार्च) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’च्या (पीटीआय) डझनभर नेत्यांवर तोडफोड, सुरक्षा जवानांवर हल्ला, तसेच भ्रष्टाचारप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालय परिसराबाहेर गोंधळ घालण्यात सहभागी असल्याचा आरोप करीत पोलिसांनी दहशतवादविरोधी कायद्याच्या विविध कलमांतर्गत रविवारी गुन्हा दाखल केला. ‘पीटीआय’ कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान २५ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. इमरान खान यांच्या ‘पीटीआय’ला ‘प्रतिबंधित संघटना’ म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सरकार तज्ज्ञांशी सल्लामसलत करत आहे.पाकिस्तान आणि ‘आयएमएफ’ यांच्यात तब्बल सात अब्ज डॉलरचा करार होणार आहे. मात्र, चर्चा अंतिम टप्प्यावर आली तरीही पाकिस्तानला अद्याप पहिला हप्ता जाहीर झालेला नाही.
 
 
‘आयएमएफ’, कराराचे पालन व्हावे यासाठी अंमलबजावणीसाठी पाकिस्तानकडून आश्वासन घेत आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांनी अशी हमी द्यावी,” असे ‘आयएमएफ’चे म्हणणे आहे. त्यावेळी इमरान यांचे सहकार्य लागणार आहे. शहबाज शरीफ इमरान खान यांना पटवून देऊ शकतील, अशी शक्यता नाही. इमरान खान यांना निवडणुका घ्यायच्या आहेत. देशाशी कोणताही व्यवहार ‘आयएमएफ’ने करू नये, सर्व काही निवडणुकांनंतरच करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.इमरान खान आणि शहबाज शरीफ यांच्यातील लढाईमुळे देशवासीय नरकयातना भोगत आहेत.अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग - अमेरिकी सिनेटमध्ये ठरावअमेरिकी सिनेटमध्ये अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून मॅकमोहन रेषा हीच भारत-चीन दरम्यानची सीमा असल्याचा ठराव सिनेटर जेफ मर्क्ले , सिनेटर बिल हॅगर्टी यांनी सिनेटमध्ये ठराव मांडला. यावेळी ते म्हणाले, “चीनने भारत-प्रशांत महासागर क्षेत्राला गंभीर धोका निर्माण केला आहे. अशा वेळी अमेरिकेने या क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे महत्त्वाचे आहे.

त्यामध्ये भारताचा सर्वांत प्रमुख सहभाग आहे. हा द्विपक्षीय ठराव अरुणाचल प्रदेश राज्याला भारताचा अविभाज्य भाग म्हणून मान्यता देण्यासाठी सिनेटचा पाठिंबा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे वास्तविक नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्यासाठी चीनच्या लष्करी आक्रमणाचाही निषेध त्यामध्ये करण्यात आला आहे. अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी वाढविण्यासही या ठरावामध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या प्रस्तावात ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चीन’च्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणांचा दावाही फेटाळण्यात आला आहे.अमेरिकेच्या संसदेने भारतविषयी प्रथमच ठराव केला आहे. भारत हा अमेरिकेचा अतिशय महत्त्वाचा सहकारी असून संपूर्ण आशिया-प्रशांत क्षेत्रात भारताची अमेरिकेस गरज आहे.२०२३ मध्ये पाकिस्तान आणि चीन भारताच्या विरूद्ध वेगवेगळ्या प्रकारे, ‘मल्टिडोमेन युद्ध’ लढेल आणि त्याचा एक महत्त्वाचा आयाम असेल माहितीयुद्ध, जे प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून लढले जाईल. अपप्रचार युद्ध, मानसिक युद्ध करून भारतीय जनतेचे मत परिवर्तन करणे, त्याचा मुख्य उद्देश असेल. त्यामुळे या विरोधात भारताने वेळीच सर्तक राहून ठोस पावले उचलायला हवी.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.