पोपचे म्हणणे, पण तरीही!

    16-Mar-2023   
Total Views |
More than 4,800 cases of sexual abuse within the Catholic Church uncovered in Portugal


११व्या शतकामध्ये पाद्रींनी ब्रह्मचारी असावे, असा एक नियम होता. पण, तो नियम आता कालबाह्य झाला आहे. पूर्वी तो नियम होता, कारण संसार नसलेला, मुलाबाळांची कौटुंबिक जबाबदारी नसलेला माणूस पाद्री म्हणून निष्ठेने काम करू शकतो, असा एक समज होता. मात्र, आता तसा नियम अबाधित ठेवणे गरजेचे नाही. त्यामुळे पाद्री विवाह करू शकतात, असे विधान नुकतेच रोमन कॅथलिक चर्चचे पोप यांनी केले. त्यांच्या विधानाला संदर्भ काय असावा? तर अभ्यासकांचे म्हणणे आहे की, चर्चमधील पाद्री आणि बाललैंगिक शोषण यांच्या घटना जागतिक पटलावर बाहेर आल्या. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार पोर्तुगाल येथील कॅथलिक चर्चमध्ये काही दशकांमध्ये ४ हजार, ८०० बालकांचे लैंगिक शोषण झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


फ्रान्समध्येही अशा घटना घडल्या आहेत. या सगळ्या घटनांवर संशोधन-सर्वेक्षणहीकरण्यात आले. तेव्हा बाहेर आलेले वास्तव फारच भयाण होते. पाद्री आणि चर्चव्यवस्थेवर विश्वास ठेवणार्‍या अनेक निष्पापांवर लैंगिक अत्याचार झाले होते. संख्या अगदी हजारोंच्या वर होती. अर्थात, उडदामाजी काळेगोरे असतेच. सगळेच पादरी किंवा सगळ्याच चर्चमध्ये हे असले प्रकार घडले नव्हते. मुलांचे-महिलांचे लैंगिक शोषण झाले नव्हते. तरीसुद्धा घटनांची तीव्रता खूप होती. पीडितांवर झालेल्या दुष्परिणामाची व्याप्ती शब्दातीत होती. हे सगळे का झाले असावे? चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येणार्‍यांसोबत हे का झाले असावे? तर पाद्री नियमाप्रमाणे अविवाहित होते आणि कदाचित लैंगिक इच्छा उद्रेक होऊन त्यांनी हे कुकृत्य केले असावे, असा कयास आहे. त्यामुळे कुणाच्याही कोणत्याही इच्छा दबून त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत, म्हणून तर पोप यांनी हा पाद्रींसंदर्भातला ब्रह्मचर्याचा नियम शिथिल केला का? असे काही लोकांचे म्हणणे आहे.

 
दुसरीकडे एका गटाचे म्हणणे आहे की, जे अनीतिमान आहेत आणि ज्यांची प्रवृत्तीच गुन्हेगारीची आहे, ते कुठेही असले आणि कोणत्याही परिस्थितीत असले तरीसुद्धा गुन्हा करू शकतात. तसे नसते तर बलात्काराच्या गुन्ह्यात केवळ अविवाहित पुरुषच गुन्हेगार म्हणून दिसले असते. पण तसे होत नाही. बलात्कार, लैंगिक शोषण आणि विवाहित- अविवाहित याचा काही संबंध नाही. अनेक घटना पाहिल्या तर हे म्हणणे खरे आहे असे म्हणू शकतो. कारण, कोणत्याही शारीरिक गुन्ह्याची पार्श्वभूमी आधी मनात घडत असते. मन जर संस्कारी, नीतिमान आणि मानवताशील असेल, तर गुन्हा घडण्याची शक्यता थोडी कमी असू शकते.या सगळ्या पाश्वर्र्भूमीवर चर्च, पाद्री आणि एकंदर व्यवस्था या संदर्भातल्या अनेक घटना आठवल्या. काही वर्षांपूर्वी झारखंडचा कॅथलिक फादर इमॅन्युएल वाखाला ७ कोटी, २५ लाख रुपये वैयक्तिक म्युच्युअल फंडात गुंतवले. ही रक्कम कॅथलिक संस्थेला मिळालेल्या सरकारी मदतीच्या पैशातील होती. त्यानेच ‘छोटा नागपूर कॅथलिक मिशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या अकाऊंटमधून स्वतःच्या ‘पंजाब नॅशनल बँके’च्या खात्यात एक कोटींची ‘एफ.डी’ केली. तसेच, त्याने ‘छोटा नागपूर कॅथलिक मिशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या अकाऊंटमधून त्याचा बॉस असलेल्या आर्चबिशप टोप्पो याच्या वैयक्तिक बँक खात्यात दोन कोटी वळते केले.

झारखंड हे अनुसूचित जातींचे (ट्रायबल) मोठी लोकसंख्या असलेले राज्य. वनवासी बांधवांच्या जमिनीचे हस्तांतरण अन्य कुणाकडे होऊ नये म्हणून इथे दोन कायदे आहेत. ‘छोटा नागपूर टेनन्सी अ‍ॅक्ट’ आणि ‘संथाल परगना टेनेन्सी अ‍ॅक्ट.’ पण, तरीही येथील कॅथलिक चर्चने २५ हजार एकर जमीन घेतली होती. यासाठी लागणारा पैसा राज्य आणि केंद्र सरकारचे समाज कल्याण निधीतून बेकायदेशीरित्या वळवला होता. मदर तेरेसाच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’च्या दोन नन्सनी त्यांच्या अनाथाश्रमातील काही बाळे विकली होती. झारखंड, छत्तीसगढ या नक्षलप्रवण भागात इतर राज्यातील सामान्य लोक सामान्यपणे फिरू शकतील का, तर याला मर्यादा आहेत. मात्र, चर्चसंस्थेला या राज्यांमध्ये अंगण खुले आहे. नक्षली यांना विरोध करत नाहीत का? तसेच प्रार्थना सभेत येशूच्या मर्सीने दुर्धर असाध्य रोग बरे करतो, असे म्हणून फसवणूक करणारे तर गल्लीबोळात सापडतात. पोप यांनी पाद्री यांना विवाह करण्याची अनुमती दिली खरी. मात्र, त्यामुळे या सगळ्या गोष्टी थांबतील का?

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.