मुद्रितशोधन आणि मराठी भाषा

    28-Feb-2023   
Total Views |
नुकताच मराठी भाषा गौरव दिन पार पडला. यानिमित्ताने काळाच्या ओघात मराठीच्या लेखन शुद्धलेखनाच्या झालेले बदल आणि एकूणच परिणाम अशा अनेक विषयांवर विचारमंथन झाले. भाषेचे नवनवीन आयामही नमूद केले गेले. यात लक्षात राहिलेली महत्वाची गोष्ट म्हणजे विस्मृतीत गेलेली मराठीची लिपी. आज आपण मराठी देवनागरी लिपीतच लिहितो. स्मार्ट फोन आणि व्हाट्सअप च्या या दुनियेत मराठीला रोमन लिपीशी जोडले गेले. याव्यतिरिक्त पुरातन काळापासून मोडी, शारदा, ब्राह्मी या लिपीतही मराठी लिहिली जायची. परंतु टंकलेखन करताना देवनागरी लिपी अधिक सोयीस्कर असल्याने काळाच्या ओघात अजूनही टिकून राहिली. नुकताच काही दिवसांपूर्वी बोलीभाषा दिवस पार पडला. प्रमाणभाषा आपले व्यवहारात वापरण्याचे साधन आहे, अर्थात बोलीभाषा त्याज्य आहेत असे मी म्हणत नाही. परंतु, यानिमित्तानेच प्रमाणभाषेचे महत्व अधोरेखित होते. प्रमाणभाषा अनेक बोलींना एकत्र जोडते. त्यासाठी तिला व्याकरणाच्या व लेखनाच्या नियमांची आवश्यकता भासते. लिहिताना या चुका होऊ नयेत म्हणून मुद्रितशोधनाची गरज असते. आजकाल अनेक ठिकाणी मुद्रितशोधकांच्या जागा रिक्त होत आहेत. तसेच या क्षेत्रातही प्रगती होत आहे. या विषयाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी वसुमती करंदीकर यांच्याशी केलेली खास बातचित.
vasumati karandikar 
 
वसुमती करंदीकर - अल्प परिचय 

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच केरळ येथे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या शिक्षण मंत्रालय, चिन्मय विश्वविद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या भारतीय ज्ञान संप्रेषण युवा परिषदेत भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा मराठी संगीत नाटकांवरील प्रभाव हा शोधनिबंध सादर केला आहे. मुद्रित शोधनाचा अनुभव.
 
मुद्रितशोधन म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
- प्रथमत: मुद्रितशोधन म्हणजे केवळ र्ह स्व-दीर्घ बदलणे नव्हे. मुद्रितशोधनामध्ये वाक्यरचना, वाक्यांचे अर्थ, शब्दार्थ, शब्दयोजन, पर्यायी शब्द, सत्यासत्यता, विरामचिन्हे असे अनेक पैलू येतात. मुद्रितशोधन करणे हे खरेतर अत्यंत जबाबदारीचे असते. कारण, एक चुकलेला र्हतस्व-दीर्घ वा अक्षर अर्थाचा अनर्थ करू शकतो. उदा. प्रसिद्ध वृत्तपत्राने ‘तेलदर महागणार’ या शीर्षकात ‘म’च वगळला होता. असे अनर्थ होऊ शकतात. म्हणून मुद्रितशोधक हा अत्यंत जागृत असला पाहिजे.
 
मुद्रितशोधनांतर्गत कोणत्या सुधारणा येतात?
- प्रत्येक वेळा लेखक लिहिताना भावनेच्या भरात, विचारांमध्ये लिहीत जातो आणि त्यात व्याकरणिक चुका राहण्याची शक्यता असते. या चुकांमुळे चांगल्या मजकुराला गालबोट लागू शकते. म्हणून मुद्रितशोधन करून मजकूर अधिकाधिक सुयोग्य करणे आवश्यक असते.
 
परोक्ष अपरोक्ष सारखे शब्द वापरताना मोठ्याप्रमाणावर चुका होतात, पण हे शब्द आता रुळले आहेत, त्यांना काही प्रमाणात मान्यताही मिळाली आहे. याविषयी तुझं काय मत आहे?
- आज मराठीत आपण सर्रास परोक्ष- अपरोक्ष, अद्यापिही, संयुक्तिक-सयुक्तिक, सुस्वागतम् हे शब्द चुकीच्या पद्धतीने वापरतो. खरंतर परोक्ष म्हणजे डोळ्यांच्या पाठीमागे घडलेली घटना.(पर:+ अक्ष) आणि अपरोक्ष म्हणजे डोळ्यांच्या समोर घडलेली घटना( अ+ पर:+ अक्ष). म्हणजेच अगदी उलट अर्थ आपण घेतो. अद्यापिही हाही चुकीचा शब्द आहे. अद्यापि म्हणजे आतापर्यंतसुद्धा; या शब्दाला पुन्हा ‘ही’ लावणे म्हणजे पुन्हा ‘सुद्धा’ या शब्दाचा प्रयोग करणे होय. 'तथापिही' हा अशा चुकीच्या पद्धतीने वापरला जातो. 'सयुक्तिक' म्हणजे प्रमाणबद्ध किंवा योग्य, प्रसंगानुरूप. परंतु, उच्चारण्यास सोपे म्हणून आपण संयुक्तिक वापरतो. संयुक्तिक म्हणजे जोडलेले. सुस्वागतम् हाही असाच चुकीचा शब्द आहे. स्वागतम् चा विग्रह सु + आगतम् असा होता. मग पुन्हा त्या ‘सु’ उपसर्ग लागतो, जो अनावश्यक आहे.
 
तुझा लेख वाचला. अक्षरा सॉफ्टवेअर विषयीचा. त्याबद्दल थोडं सांग, त्यात काही त्रुटी राहू शकतील का? किंवा सॉफवेअरच्या काही मर्यादा आहेत का?
- कोणतेही संशोधन गरजेतूनच, समस्येतून होत असते. आता मराठी मुद्रितशोधन करणार्यांाची आवश्यकता अधिक आणि संख्या कमी दिसते. त्यात वेळ, खर्च या सर्व गोष्टींचा विचार करता ‘ अक्षरा’ या सॉफ्टवेअरची निर्मिती झाली आहे. कारण, मुद्रितशोधन ही काळाची गरज आहे. आपण केलेले लेखन हे योग्य असणे सध्याच्या घडीला आवश्यक आहे. ‘ अक्षरा’ सॉफ्टवेअर हे लाखो शब्दभांडार असलेले आणि सतत अपडेट होणारे पहिले मराठीतील मुद्रितशोधन करणारे सॉफ्टवेअर आहे. अगदी 10 रुपयांच्या ट्रायल पॅक पासून पाच वर्षांपर्यंतची पॅकेज उपलब्ध आहे. सोशल मीडिया, टेक्ट मेसेज ते कोणत्याही वर्ड डॉक्युमेंटसाठी तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरू शकता. शासनाच्या मदतीने हे सॉफ्टवेअर निःशुल्क देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.