पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी यावेळी थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयांमध्ये १९५ क्रमांकाचे मतदान केंद्र 'सखी मतदान केंद्र' म्हणून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्या केंद्राची विशेष रचना तयार करण्यात आली आहे. रावेत येथील बबनराव भोंडवे शाळेमधील २३ क्रमांकाचे केंद्र तसेच वाकड येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील ३९५ आणि ४०५ क्रमांकाचे केंद्र आदर्श मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग स्टेशन) म्हणून तयार करण्यात आले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असून निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप केले.
थेरगाव येथील स्व.शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सकाळी मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा सुमारे ३ हजार प्रशिक्षणार्थींना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त विठ्ठल जोशी यांनी तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले. साहित्य वाटप करण्याकरीता १११ कर्मचारी तर स्वीकृतीसाठी १४८ कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे.
साहित्य वाटपासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून २६ टेबलद्वारे मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप कामकाजाला सुरुवात केली असून, मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये पीएमपीएमएलच्या १०२ बसेस, ८ मिनीबस आणि १२ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.