केरळचे काळे सत्य...

    25-Feb-2023   
Total Views |
Growing Bigotry, Corruption, Terrorism in 'ISIS' in Kerala
 

केरळमध्ये ‘लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट’ (एलडीएफ) मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात सत्तेवर आहे. निधर्मीपणाचा आव आणत आणि स्वतःला गरिबांचा कैवारी मानत विजयन सत्तेवर आले खरे. पण, केरळमधील वाढती धर्मांधता, भ्रष्टाचार, ‘इसिस’मध्ये दहशतवादी कृत्ये करण्यास केरळमधून भरती होणारे मुस्लीम युवक, ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या हजारो मुली, याबाबत ते चकार शब्द उच्चारत नाहीत. आपल्यानंतर आपला जावई मोहम्मद रियाजच मुख्यमंत्री व्हावा, अशी खेळी करण्यात ते सध्या मग्न आहेत. यासंदर्भात पिनराई आणि केरळचे वास्तव मांडण्याचा या लेखात केलेला हा प्रयत्न...

केरळमध्ये कुणीही काळ्या रंगाचा झेंडा काय, अगदी काळ्या रंगाचा साधा मास्कही वापरु नये, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे मत. का तर म्हणे काळा रंग हा निषेधाचा! केरळच्या आर्थिक अंदाजपत्रकामध्ये पिनराई सरकारने पेट्रोल डिझेल आणि दारूवर उपकर लादला. या विरोधात केरळची जनता सध्या रस्त्यावर उतरली आहे. विरोधी पक्ष काँग्रेस आणि भाजपनेही पेट्रोल-डिझेलच्या करवाढीला विरोध केला. जिथे जातील तिथे पिनराई यांना काळे झेंडे दाखवले गेले. स्वतःची प्रतिमा ‘लुंगीमधील मोदी’ अशी ऐकून घेण्यात आत्ममग्न समाधान मानणार्‍या पिनराई यांना केरळी जनतेतून आपल्याला विरोध व्हावा, हेच मुळी खपण्यासारखे नव्हते. रा. स्व. संघ, भाजप आणि अर्थातच मोदी-शाह यांना पिनराई कट्टर विरोध दाखवत असतात. मात्र, देशात मोदी आणि केरळात पिनराई असेच केरळमधील लोकांनी म्हणावे, असे त्यांना वाटते. त्यामुळेच स्वतःची तुलना मोदींशी करण्याची ते एकही कसर सोडत नाहीत. पण, कुठे सूर्य आणि कुठे... असो, तर केरळमध्ये ’सीपीआय’ पक्षाचे नेते पिनराई मुख्यमंत्री आहेत. ‘सीपीआय’(एम), ‘सीपीआय’, केरळ काँग्रेस (एम), जनता दल, नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय जनता दल, केरळ काँग्रेस (बी), इंडियन नेशनल लीग, काँग्रेस (सेक्युलर), जनाधिपथ्य केरळ वगैरे पक्षाची युती होऊन केरळमध्ये ‘लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट ’ (एलडीएफ) तयार झाली.

त्याचे नेता म्हणून पिनराई केरळचे मुख्यमंत्री झाले. पण, सध्या तरी पिनराई यांनी काळ्या रंगाचा धसका घेतलेला दिसतो. पिनराई यांनी काळा रंग हा निषेध व्यक्त करतो म्हणून काळ्या रंगाविरोधात लिखित-अलिखित विरोध केला असेल? जरा खोलात विचार केला, तर जाणवते की, काळे झेंडे आणि काळे कपडे परिधान करून लोक त्यांना विरोध करतात म्हणून ते काळ्या रंगाच्या विरोधात आहेत, हे अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य आणखीनही आहे. केरळमध्ये प्रसिद्ध शबरीमला मंदिर आहे. भगवान अयप्पांचे हे मंदिर. जगभरात अयप्पा स्वामींचे करोडो भाविक आहेत. शबरीमला मंदिरासंदर्भातला वाद सगळ्यांना माहितीच आहे. अज्ञात आणि अगणित वर्षांपासून या मंदिर प्रवेशासंदर्भात काही नियम आहेत. या नियमासंदर्भात स्थानिक केरळी व्यक्तींच्या श्रद्धाभावना अतिशय कठोर आहेत. अर्थात, ज्याची-त्याची श्रद्धा. यावेळी कम्युनिस्ट आणि सगळेच डावे विचारसरणीचे विरूद्ध केरळचा अयप्पा, शबरीमला मंदिर भाविक हिंदू असा संघर्षच निर्माण झाला. केरळमध्ये ४५ टक्के मुस्लीम आणि ख्रिस्ती, इतर धर्मीय आहेत, तर ५५ टक्के हिंदू आहेत. हिंदूंचे राजकीय मन आणि मत विभाजितच. त्यामुळे इथे मुस्लीम आणि ख्रिस्ती जनतेच्या एकगठ्ठा मतांचा विचार करूनच निर्णय घेतला जातो.‘लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट’ सत्तेवर येण्याचे कारणही हेच. शबरीमला प्रकरणात पहिल्यांदा हिंदू बहुसंख्य जनता एकमनाने संघटित झाली.

‘सीपीआय’ राजकीय वर्चस्वाचा धनी असलेल्या केरळमध्ये हे सगळे अनेपक्षित आणि नवीनच होते. राज्यातील हिंदू एकवटला तर पुढे सत्ता मिळणार नाही, हे भविष्य त्यांना माहिती आहे. त्यामुळे हिंदू आणि त्यासंदर्भातले सर्व प्रतीक, आस्था यांना खोडून टाकण्यासाठी पिनराई आणि त्यांचे सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. काळ्या रंगाचा धसकाही यासाठीच! कारण, अयप्पा स्वामींचे व्रत ठेवणारे लाखो भाविक केरळमध्ये आहेत. ते व्रतादरम्यान काळे कपडे परिधान करतात. काळी लुंगी आणि काळा सदरा, शर्ट घातलेला व्यक्ती ही अयप्पांचा भक्तच असणार, ही देशभरात ओळख पक्की. शबरीमला प्रकरणानंतर अयप्पा स्वामींचे भक्त काळे कपडे परिधान करतात आणि तेही केरळमध्ये इतक्या संख्येने राहतात, हे पचवणे आणि पाहणे केरळच्या पिनराई सरकारला जड जाते. त्यामुळेच केरळ राज्याच्या प्रशासनाने काळ्या रंगावर प्रतिबंध स्वरूपात वातावरण तयार केले आहे. आता कुणाला अतिशयोक्ती वाटेल, पण हेच सत्य आहे.या सत्याला दुजोरा देणारी आणखीन एक घटना. केरळमध्ये भद्रकाली मातेचे मोठे मंदिर आहे. ७० दिवस देवीचा उत्सव असतो.

 या उत्सवामध्ये देवीचे मंदिर, मंदिराचा परिसर भगव्या रंगाने सजवला जातो. इतकेच नव्हे, तर देवीचे भक्तगण भगव्या रंगाचेच कपडे परिधान करतात. शेकडो वर्षांची परंपरा. पण, पिनराई सरकारने भद्रकाली देवस्थानाला कायदेशीररित्या सांगितले की, या उत्सवामध्ये भगवा रंग अजिबात दिसू नये. मंदिरामध्ये आणि परिसरात भगव्या रंगाचे जे काही असेल ते हटवावे. कारण, काही लोक भगव्या रंगाला विरोध करू शकतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एखादे राज्य सरकार राज्यातील देवस्थानाला असे आदेश कसे देऊ शकेल, असे म्हणत देवस्थानही न्यायालयात गेले. न्यायालयाने पिनराई सरकारचे कान उपटले की, कोणतेही प्रशासन सरकार देवस्थानालाकोणते रंग वापरावेत किंवा वापरू नये, याबद्दल आदेश देऊ शकत नाही,तर असे हे पिनराई प्रशासन. पिनराई विजयन यांच्या केरळमध्ये रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांची किंवा भाजप कार्यकर्त्यांची हत्या ही अजूनही तिथे सर्वसाधारण बाब. गेल्या काही वर्षांत इथे शेकडो संघ स्वयंसेवकांची निर्मम हत्या करण्यात आली. केरळच्या राज्य सरकारला त्यातही मुख्यमंत्री पिनराई यांना याचे अजिबात सोयरसुतक नाही. कारण, जे आडात असेल तेच पोहर्‍यात येणार!केरळच्या इतिहासात सर्वांत पहिली राजकीय कारणास्तव हत्या झालेली व्यक्ती होती वडिक्कल रामकृष्ण.

 १९६९ साली वडिक्कल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यावेळी अपराधी ठरवले गेलेल्यांचे नेता होते पिनराई विजयन. पुढे पिनराई त्यातून सुटले म्हणा. पण, त्यानंतर विरोधी विचारांच्या व्यक्तींची दिवसाढवळ्या हत्या करण्याबाबत केरळ नेहमीच चर्चेत राहिले. पिनराई यांची याबाबतची असंवेदनशीलता इतकी की २०२० साली त्यांची कन्या वीणा हिचा विवाह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या ‘डेमॉक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद रियाज यांच्यासोबत झाला. या विवाहाला वरवधूच्या अगदी निकट कोण उभे होते, तर मेाहम्मद हशिम ही व्यक्ती. मोहम्मद हशिम हा त्यावेळी तुरुंगातून पॅरोलवर सुटून आला होता. रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकाची हत्या केली म्हणून त्याला सजा झाली होती. हा हशिम मुख्यमंत्री आणि त्यातही गृहमंत्री असलेल्या पिनराई यांच्या मुलीच्या लग्नात मुख्यमंत्र्यांसोबत दिमाखात उभा होता.

सध्या पिनराई यांचा जावई मोहम्मद रियाज केरळ सरकारमध्ये मंत्री आहेत. नुकतेच केरळमध्ये एका आघाडीच्या दैनिकाने सर्वेक्षण केले. त्यामध्ये पुढील मुख्यमंत्री कोण असा प्रश्न होता, तर म्हणे त्यात जनतेने मोहम्मद रियाजला सर्वाधिक पसंती दिली. यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, लेकीचा विवाह मुस्लीम युवकाशी करून देऊन पिनराई यांनी केरळमधली मुस्लीम व्होटबँक सुनिश्चित केली. त्यानंतर आता मुख्यमंत्रिपद घरातच राहावे, यासाठी सर्वेक्षणाद्वारे लोकांच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न केला की पुढील मुख्यमंत्री मोहम्मद रियाजच असेल. काहीही असो, पण पिनराई यांची मुख्यमंत्री म्हणून या वेळेची कारकिर्द वादविवादातच गुरफटलेली आहे. आपण किती मुस्लीमधार्जिणे आहोत,हे दाखवण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. नुकतेच ते म्हणाले की, “घटस्फोट तर सगळ्याच धर्मांत होतो, मग मुस्लिमांसाठीच ‘तिहेरी तलाक’ कायदा का? हे ठीक नाही. तसेच ‘सीएए’ कायद्याअंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील मुस्लीम व्यक्तींना का भारतात नागरिकत्व नाही, हे अतिशय चूक आहे, असे त्यांचे पक्के मत. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’ अस्तित्वात नाही, असेही त्यांचे म्हणणे. यावर आपल्या जावयाला आणि राज्यातील मुस्लिमांना खूश करण्यासाठीच ते असे म्हणतात की काय, असे त्यावर लोकांचे म्हणणे.

दुसरीकडे पिनराई विजयन यांच्याशी संबंधित अधिकारी शिवशंकर यांच्यावर पोलिसी कारवाई सुरू आहे. युएई वाणिज्य दुताच्या सामनाआडून ३० किलोग्रॅम सोन्याची तस्करी झाली. त्यात स्वप्ना सुरेश या महिलेचे नाव आले. या महिलेसोबत पिनराई यांचे माजी प्रधान सचिव शिवशंकर यांचेही नाव आले. पुढे स्वप्ना सुरेश यांनी सांगितले की, ”पिनराई विजयन यांचे सोन्याची तस्करीच काय, सगळ्याच अवैध धंद्यांना समर्थन आहे. ते त्यांच्या मुलीसाठी काहीही करू शकतात. मागे एक परदेशी नागरिक केरळमध्ये बंदी असलेली यंत्रणा घेऊन आला. चार दिवसांनी त्याला पकडण्यात आले. मात्र, सोडूनही देण्यात आले. यामागेही पिनराईच होते.” आपण दुबईला पिनराई यांना लाखो रुपयांनी भरलेली बॅग दिली आहे, असेही तिचे म्हणणे.या सगळ्यासाठी पिनराई आपल्याला त्रास देतात, असेसुद्धा तिने सांगितले. शिवशंकर हे पिनराई यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या अटकेने आणि स्वप्ना सुरेशच्या विधानाने पिनराई यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहतात.पिनराई यांच्या या एककल्ली वर्तनाला पुरून उरले ते केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान.

 केरळच्या नऊ विश्वविद्यालयांच्या कुलपतींना आणि ११ सचिवांना बडतर्फ करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले. विश्वविद्यालयांमधील नेमणुकींना डावलून या सगळ्या नेमणुका झाल्या आहेत, असे राज्यपालांचे म्हणणे. पिनराई यांनी ‘सीएए’ विरोधात आणि कृषी कायद्याविरोधात मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावण्याचा घाट घातला. त्यालाही राज्यपालांनी सहमती दिली नाही. या सगळ्यामुळे पिनराई खूपच अस्वस्थ आहेत. या सगळ्यामागे भाजप आणि रा. स्व. संघ आहे, असे त्यांना वाटते. त्यामुळे सध्या ते इतर गैरभाजपशासित राज्यातील नेत्यांना एकत्र येऊन भाजपला हरवा, असे सांगत असतात. नुकतेच केरळच्या महाविद्यालयामध्ये अंतर्गत निवडणुका झाल्या. त्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला चांगले यश मिळाले. रा. स्व. संघ विचारांच्या संघटनांना केरळमध्ये स्वीकार्हता वाढत आहे, हे पिनराई विजयन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सहन होत नाही. आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. केरळ बदलत आहे. ज्या केरळमध्ये रा. स्व. संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्याच व्हायच्या, तिथे आता पिनराई आणि संबंधितांच्या खोट्या निधर्मीपणाला जाब विचारला जात आहे. आपल्यानंतर आपला जावई मोहम्मद रियाज मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसावा, ही जरी विजयन यांची इच्छा असली तरी केरळच्या जनतेची ही इच्छा नाही, हे सत्य आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.