चोरून सिनेमा पाहण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास सध्या ‘केंद्रीय सेन्सॉर बोर्डा’चे सदस्य झाल्यानंतरही निरंतर सुरू आहे. लेखक-दिग्दर्शक विजय बाळासाहेब पवार यांच्याविषयी...
विजय बाळासाहेब पवार यांचा जन्म मालेगाव तालुक्यातील निमगावचा. त्यांचे दुसरीपर्यंतचे शिक्षण जातेगाव मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. सायखेडा येथील शाळेत चौथीपर्यंत, तर इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण नांदगावला न्यू इंग्लिश स्कूलमधून त्यांनी पूर्ण केले. वडील मविप्र संस्थेत माध्यमिक शिक्षक, तर आई गृहिणी असली तरी शेतीतही लक्ष देत असे. शाळेत वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली. सिनेमा पाहण्याची प्रचंड आवड असल्याने, अनेकदा ते चोरून सिनेमा पाहायला जात. इयत्ता दहावीत ते नांदगाव केंद्रातून प्रथम आले. १९८८ मध्ये केटीएचएम महाविद्यालयामधून त्यांनी विज्ञान शाखेतून बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. पुढे छत्रपती संभाजीनगर एमआयटीत प्रवेश घेतला.
आवड असली, तरी सिनेमा आणि नाटकाकडे वळणे त्यावेळी काही शक्य नव्हते. त्यामुळे विजय यांनी आर्किटेक्ट विश्वाात पाऊल टाकले. यावेळी भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी असल्याने, आर्किटेक्ट क्षेत्रातील अर्धवेळ स्वरूपाची कामेही विजय यांनी केली. द्वितीय क्रमांक पटकावल्यानंतर एमआयटीमध्येच प्राध्यापक म्हणून विजय यांना नोकरी मिळाली. त्यानंतर हाती पुरेसा वेळ असल्याने, विजय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातच नाट्यशास्त्र शाखेमध्ये प्रवेश घेतला. सकाळी नोकरी, दुपारी आर्किटेक्ट संबंधित कामे आणि सायंकाळी नाट्यशास्त्र असा त्यांचा नित्यक्रम असे.
नाट्यशास्त्राचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रा. कुमार देशमुख यांच्या संस्थेकडून १९९९ साली, राज्य नाट्यस्पर्धांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. प्रथमतः प्रशांत दळवी यांच्या ‘ध्यानी मनी’ या नाटकात दिग्दर्शनासह अभिनयही केला. प्राथमिक स्तरावर सलग सात वर्षे सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून त्यांना गौरविण्यात आले. अंतिम फेरीत २००३ मध्ये ‘तर्पण’ नाटकासाठी, २००७ साली ‘पुस्तकांच्या पानातून’ नाटकासाठी विजय यांना पारितोषिक मिळाले. ‘अचानक’ हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत २००४ साली पहिले आले. आर्किटेक्ट असल्याने नेपथ्याचे काम हमखास विजय यांच्याकडेच असे. तत्पूर्वी विजय २००० मध्ये नाशिक इथे स्थायिक झाले. या दरम्यान ‘के. के. वाघ, संजीवन इन्स्टिट्यूट’ आणि ‘मविप्र संस्थे’तही त्यांनी काम केले. विशेष म्हणजे, नाटकांसाठी ते नाशिक ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास अनेकदा करत. २००७ मध्ये त्यांना दुबईमध्ये नोकरी मिळाली. वैद्यकीय शाळा, ६५ मजली हॉटेल्स अशी अनेक कामे त्यांनी पाच वर्षांमध्ये केली. भारतात परतल्यानंतर त्यांनी मुंबईमध्येही काही काळ नोकरी केली. त्यानंतर २०१८ मध्ये पुण्यातील डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्टमध्ये ते उपप्राचार्य म्हणून रुजू झाले. यादरम्यान विजय यांनी राजन खान यांच्या ’अक्षरमानव संस्थे’ने बारामतीमध्ये आयोजित केलेल्या चित्रपट कार्यशाळेत सहभाग घेतला. जेव्हा ते नाशिकमध्ये परतले तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. सर्वप्रथम विजय यांनी महात्मा गांधींवर आधारित ‘सर्चलाईट’ लघुपट तयार केला. यानंतर ‘शून्य’ आणि ‘झिरो’ हे लघुपट तयार केले. दहापेक्षा अधिक नाटकेही विजय यांनी केली आहेत. विजय यांच्या नावावर ३० पेक्षा अधिक पुरस्कारांची नोंद आहे. कोरोनात सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणावर त्यांनी ‘अॅम आय ऑडिबल’ नावाचा लघुपटाची निर्मिती केली. हा लघुपट ३०हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. २०२२ साली विजय यांनी बुलेटवरून लडाखचा प्रवास केला. यावर त्यांनी प्रा. शंकर बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लडाख डायरी’ हे प्रवासवर्णन लिहिले आहे. या पुस्तकालाही ‘मराठा मंदिर संस्थे’चा पुरस्कार मिळाला आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान त्यांचा रशियात असलेल्या त्यांच्या भाचीसोबत संवाद झाला. या संवादावरून त्यांनी ‘ऑपरेशन गंगा’ हे दोन अंकी नाटक पुस्तकरूपात प्रकाशित केले. अमरनाथ यात्रेनंतर त्यांनी ‘अमरनाथ बोलावणं आल्याशिवाय नाही’ हे पुस्तक लिहिले. फेसबुकवरील लिखाणावर आधारित ‘मी मनस्वी’ हे त्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
२०२३ पासून विजय पवार हे ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ’ म्हणजेच ‘सेन्सॉर बोर्डा’चे सदस्य म्हणून जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. आजवर भोजपुरी, गुजराती, तामिळ, तेलुगू, इंग्लिश, मराठी आणि हिंदी भाषेतील २५ पेक्षा जास्त चित्रपट त्यांनी सेन्सॉर केले. या चित्रपटात योग्य त्या दुरुस्त्या सूचवल्या, करून घेतल्या आणि ते चित्रपट प्रमाणितही केले. पुढे त्यांनी ‘संस्कार भारती’च्या चित्रपट-नाट्यविधाचेही काम सक्रीयपणे सुरू केले. सध्या ते ‘लघु उद्योग भारती’मध्ये ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. भविष्यात चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे.
विजय पवार यांना लक्ष्मणराव देशपांडे, कुमार देशमुख, पद्मनाभ पाठक, लक्ष्मण सावजी, रवी, बेडेकर, विवेक कुलकर्णी, विवेक गरुड, अतुल देशमुख, दादा खालकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नांदगावमधील पहिले आर्किटेक्ट म्हणून विजय प्रसिद्ध आहेत. सध्या ते ‘मविप्र संस्थे’त वरिष्ठ प्राध्यापक म्हणूनही काम करत आहे. "स्वप्नांचा पाठपुरावा केल्याशिवाय ती पूर्ण होत नाहीत,” असे विजय सांगतात. चोरून सिनेमा पाहण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, सध्या थेट ‘केंद्रीय सेन्सॉर बोर्डा’चे सदस्य झाल्यानंतरही निरंतर सुरू आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून विजय पवार यांना आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.