‘शॉर्ट्स’च्या जनकाला ‘युट्यूब’चा सलाम

    22-Feb-2023
Total Views | 67
Neal Mohan
अमेरिकेच्या एका धनाढ्य उद्योगपतीला एका पत्रकाराने एकदा सहज विचारले की, “तुमच्या देशात स्वत:चे असे काय आहे,” तर त्याने अत्यंत मार्मिक उत्तर दिले, “आमच्याकडे देशहित आणि पैसा या दोन जमेच्या बाजू आहेत. त्याद्वारे आम्ही ‘व्हिस्की’पासून वाहनांपर्यंतच्या विविध वस्तू अनेक देशांकडून आयात करतो.” भारताकडून तुम्ही काय घेता, असा पुढचा प्रश्न त्या पत्रकाराने विचारला असता, त्या उद्योजकाने सांगितले की, “आम्ही भारताकडून बुद्धिजीवी लोकांची आयात करतो. ज्यामुळे आमच्या देशाचा कारभार अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे.” त्या धनाढ्य व्यक्तीचे बोल अत्यंत खरे ठरले आहेत. आजघडीला ‘गुगल’पासून सर्वच क्षेत्रात भारतीयांनी आपल्या कर्तृत्वाने अमेरिकेत झेंडा फडकवला आहे. या यादीत भारतीय वंशाचे नील मोहन यांचे नाव जोडले गेले आहे. ‘शॉर्ट्स’चे जनक अशी नील मोहन यांची ओळख सर्वश्रुत. अमेरिकेत राहणारे नील मोहन यांनी १९९६ साली स्टॅनफर्ड विद्यापीठातून ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ची पदवी घेतली. २००५ मध्ये त्यांनी याच विद्यापीठातून ‘एम.बीए’ केले. यानंतर १९९६ साली त्यांनी ‘टेक्नोलॉजी’ कंपनी ‘एक्सेन्चर’मध्ये ‘सीनियर अ‍ॅनालिस्ट’ म्हणून काम पाहिले. यानंतर त्यांनी काही काळ ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि मग पाच वर्षं ‘डबलक्लिक’मध्ये काम केले. २००८ मध्ये नील मोहन यांनी ‘गुगल जॉईन’ केले. यानंतर त्यांनी ‘गुगल डिस्प्ले’ आणि व्हिडिओ अ‍ॅड्सचे सीनियर व्हाईस प्रेसिडंट बनले. २०१५ पासून ते ‘युट्यूब’चे ‘चीफ प्रोडक्ट ऑफिसर’ म्हणून काम करत होते.नील मोहन यांनी ‘युट्यूब’चे ‘चीफ प्रोडक्ट ऑफिसर’ या पदावर असताना २०२१ मध्ये छोट्या ‘व्हर्टिकल व्हिडिओज’ची सुरुवात केली होती. यांना ‘शॉर्ट्स’ असे नाव दिले. ‘शॉर्ट्स’ प्रसिद्ध व्हिडिओ प्लॅटफॉर्म ‘टिकटॉक’शी स्पर्धा करायला काढले होते. जे अल्पावधीतच लोकप्रिय ठरले आहे. एकीकडे ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ आणि दुसरीकडे अन्य स्पर्धक कंपन्या यांच्या भाऊगर्दीत नील मोहन यांनी ‘युट्यूब’ची सूत्रे स्वीकारली आहेत. अमेरिकेत असलेले उच्चपदस्थ भारतीय विविध क्षेत्रात यशवंत झाले आहेत, त्याचप्रमाणे नील मोहनही या स्पर्धेच्या युगात ‘युट्यूब’ला योग्य न्याय देतील यासाठी त्यांना शुभेच्छा!
‘चांद्रयाना’ची गवसणी
एखादी मोहीम अपयशी ठरली किंवा अपेक्षित यश न मिळाल्याने माघार घेणे भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात ‘इस्रो’ला मान्यच नाही. ‘चांद्रयान-२’ ही मोहीम अपेक्षित यश देऊ शकली नाही. मात्र, ज्या दिवशी ही मोहीम थांबली, त्याच दिवसापासून ’इस्रो’ने ‘चांद्रयान-३’ ही मोहीम हाती घेतली. युद्धपातळीवर त्यावर काम करत येत्या वर्षी म्हणजेच जून-जुलैमध्ये ‘चांद्रयान-३’चेप्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रात आजघडीला भारत पहिल्या पाच देशांच्या पंक्तीत आहे. ‘चांद्रयान-२’ या मोहिमेचे प्रत्यक्ष साक्षीदार राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’ला चालना देण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यातूनच ‘चांद्रयान-३’ची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यंदा १०० टक्के यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. ‘चांद्रयान-३’ प्रक्षेपणासाठी जवळपास सज्ज झाले असल्याचे ‘इस्रो’च्या अधिकार्‍यांनी नुकतेच जाहीर केले असून, प्रक्षेपणासाठी आवश्यक सर्व गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ योग्य वेळेची वाट पाहत असून त्याप्रमाणे अनुकूल वातावरण आणि तांत्रिक सिद्धता होताच ‘चांद्रयान-३’चे प्रक्षेपण केले जाणार आहे. ‘चांद्रयान-२’ आणि ‘चांद्रयान-३’ चा उद्देश सारखाच आहे. यावेळी मात्र सुरक्षित ‘लँडिग’साठी आवश्यक घटनांचा अधिक सक्षमतेने विचार करण्यात आला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणे हा ‘चांद्रयान-२’चाउद्देश होता. ‘चांद्रयान-२’ मोहिमेदरम्यान सप्टेंबर २०१९ मध्ये लँडर ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले होते. त्यानंतर ‘चांद्रयान-३’ ही मोहीम हाती घेण्यात आली. ‘चांद्रयान-२’मध्ये झालेल्या त्रुटी दूर करून यंदाची मोहीम अधिक परिपूर्ण करण्यात आली आहे. त्याचबरोबर जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी भारत सरकारने अंतराळ संशोधनासाठी नवे धोरणही हाती घेतले आहे. नवीन धोरणात ‘इस्रो’ विकास आणि क्षमता विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. ज्यामुळे भारताला येत्या काळात ‘चांद्रयाना’सारख्या इतर मोहिमांसाठी कुशल मनुष्यबळ आणि निधी सहज उपलब्ध होणार आहे. त्यातूनच ‘चांद्रयाना’सारख्या मोहिमेत चंद्राला गवसणी घालणे भारताला सहज शक्य होणार आहे.
-मदन बडगुजर


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121