नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. पण ते देत असताना ओबीसी किंवा अन्य कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करणार नाही. शिवरायांची शपथ घेऊन मी सांगितले आहे. त्यामुळे चिंता करू नका. सगळी प्रक्रिया मॅरेथॉन पद्धतीने सुरू आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे, टिकणारे आरक्षण देणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे दिली.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवार, दि. ६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी 'रामटेक' या निवासस्थानी सर्वपक्षीय चहापानाचे आयोजन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, अतुल सावे, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घालत सत्ताधाऱ्यांना उद्देशून पत्र पाठवले. त्याचा मुख्यमंत्र्यांनी खरपूस समाचार घेतला.
शिंदे म्हणाले, विरोधकांनी पाठवलेल्या पत्रात २३ जणांची नावे आहेत, पण सह्या केवळ ७ जणांच्या. पत्रकार परिषदेत त्यातील तिघेजण झोपले होते. अवसान गळलेला विरोधीपक्ष कसा असतो, हे आजच्या पत्रकार परिषदेत दिसून आले, असा टोलाही त्यांनी लगावला. सगळे बिनबुडाचे मुद्दे त्यांनी पत्रात मांडले आहेत. चार राज्यांतील निकालानंतर त्यांची ही स्थिती झाली आहे. मोदींचा करिष्मा संपला, अशी टीका ते सातत्याने करत होते; पण जनतेने त्यांना धडा शिकवला आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, यावर शिक्कामोर्तबही केले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
खिचडी, बॉडीबॅग, ऑक्सिजन प्लांटमध्ये घोटाळा करून सामान्य जनतेच्या पैशांची लूट यांनी केली. आमचा गृहविभाग त्या संदर्भात तपास करीत आहे. सूडबुद्धीने कोणतीही कारवाई होणार नाही. पण दोषींना आम्ही सोडणार नाही. आमच्यात स्वाभिमान उरला नसल्याचे ते म्हणाले. मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची परवानगी नाही, त्यांनी आम्हाला स्वाभिमानाची भाषा करायची, हे हास्यास्पद असल्याचे शिंदे म्हणाले. आम्ही लोकांसाठी काम करतोय. त्यामुळे आमच्या दोऱ्या लोकशाही म्हणजेच लोकांच्या हातात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
धारावीच्या टेंडरमध्ये बदल ठाकरेंनीच केले
धारावीच्या टेंडरवरून ठाकरे गट अदानींच्या घरावर मोर्चा काढणार आहे. पण या टेंडरमध्ये जे काही बदल झाले, ते सगळे उद्धव ठाकरे सरकारने केले आहेत. त्यामुळे त्यांचा मोर्चा निरर्थक आहे. याउलट आम्ही धारावीच्या टेंडरप्रक्रियेत पारदर्शक आणली. टीडीआरचा सेल बुकवर व करता, तो ओपन डिजिटल प्लॅटफॉर्मवर करता येईल, असा निर्णय आम्ही घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
- विरोधकांचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेपासून सुपारी पान असा कार्यक्रम ठेवावा लागेल.
- विरोधकांच्या पत्रकार परिषदेत काही लोक झोपी गेले होते. तशाच झोपेत त्यांनी सरकारला पत्र लिहिले आहे. मला आश्चर्य वाटते, नागपूरचे अधिवेशन विदर्भ, मराठवाड्यातील प्रश्नांची चर्चा करण्यासाठी असते; पण यांच्या पत्रात विदर्भ, मराठवाड्याचा साधा उल्लेखही नाही. कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतला. त्याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी दीड महिन्यांपूर्वी रद्द केला आहे.
- राज्याची अर्थव्यवस्था २०१३-१४ साली १६ लाख कोटी होती. आज ती ३५ लाख कोटींवर पोहोचली आहे. याचा अर्थ गेल्या १० वर्षांत अडीच पटींनी त्यात वाढ झाली. इतर राज्याच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था भक्कम आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्रत्येक घटकाला न्याय देऊ - अजित पवार
चहापान हे निमित्त असते, सत्ताधारी आणि विरोधकांनी चर्चा करून कोणते मुद्दे प्राधान्याने घ्यायचे हे ठरवले जाते. यांच्या पत्रात २३ लोकांची नावे आणि केवळ ७ लोकांच्या सह्या आहेत. यावरून त्यांना जनतेच्या प्रश्नांचे गांभीर्य आहे, ते कळते. आम्ही पुरवणी मागण्यांवर योग्य चर्चा करून राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास प्राधान्य असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.