चेन्नई: आंध्रप्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत च्या किनाऱ्यावर 'मिचॉन्ग' चक्रीवादळ धडक देणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात त्याचा वेग ताशी ११० किलोमीटर असू शकतो. सध्या ते पश्चिम-मध्य आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनार्यावर आणि लगतच्या उत्तर तामिळनाडूवर घिरट्या घालत आहे.
या वादळामुळे चेन्नईत हाहाकार माजला आहे. १७ शहरे पाण्यात बुडाली आहेत. चेन्नईत रविवारपासून (३ नोव्हेंबर २०२३) ४००-५०० मिमी इतका पाऊस झाला आहे. घराघरांत पाणी शिरले असून कार, दुचाकी रस्त्यावर तरंगत असल्याची परिस्थिती आहे. पावसाची अशी स्थिती ७०-८० वर्षांत दिसली नव्हती, असे बोलले जात आहे. २०१५ मध्येही परिस्थिती बिघडली होती पण त्यानंतर केवळ ३३० मिमी पाऊस झाला. यावेळी परिस्थिती इतकी वाईट आहे की चेन्नईमध्ये ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
परिस्थिती हाताळण्यासाठी तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये २१ एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या होत्या. २०४ ट्रेन आणि ७० उड्डाणे रद्द करण्यात आली असून तटरक्षक दल, लष्कर आणि नौदलाची जहाजे आणि विमाने स्टँडबायवर ठेवण्यात आली आहेत.
वादळामुळे आंध्र प्रदेश हाय अलर्टवर आहे. राज्य सरकारने तिरुपती, नेल्लोर, प्रकाशम, बापटला, कृष्णा, पश्चिम गोदावरी, कोनासीमा आणि काकीनाडा येथे रेड अलर्ट जारी केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या प्रत्येकी ५ टीम येथे तैनात आहेत. वादळग्रस्त भागातील लोकांना मदत करण्यासाठी, त्यांना बाहेर काढण्यासाठी १८१ मदत शिबिरे उघडण्यात आली आहेत. गरोदर स्त्रिया आणि वृद्ध लोकांच्या सुरक्षित हस्तांतरणाकडे लक्ष द्यावे आणि संसर्गजन्य रोग पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत.
बंगालच्या उपसागरात १ डिसेंबर रोजी 'मिचॉन्ग' वादळ निर्माण झाले होते. हळूहळू ते भारताकडे सरकले आणि त्याचा प्रभाव आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये दिसू लागला आहे. मंगळवार, ५ डिसेंबरच्या सकाळपर्यंत तो आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकेल आणि त्याचा प्रभाव बुधवारपर्यंत राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.