जे खेळाडू कधीही आपल्या शारीरिक वैगुण्याला यशाच्या आड येऊ देत नाहीत, ते दिव्यांग खेळाडू म्हणजेच ‘पॅरा’ खेळाडू. मनोबल, दृढ संकल्प याचे ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे ‘पॅरा’ खेळाडू. दरवर्षी ३ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक दिव्यांग दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अशाच काही भारतातील पॅरा खेळाडूंची ओळख करून देणारा हा लेख...
गुरुराया, आपण जर प्रेमाने एखाद्या मुक्याचा अंगीकार केलात, तर तो पैजेने बृहस्पतीशीदेखील स्पर्धा करू शकेल. ज्ञानेश्वर माऊलींचा सगळ्यांना सांगण्याचा अर्थ खचितच असा नव्हे की, माणसाने स्वतः काहीही न करता परमेश्वर कृपेच्या सामर्थ्याने त्याला एकदम पर्वतावर आरूढ करावे किंवा त्याला एकदम पंडित करावे. ज्याची स्वतःची प्रेरणा आणि प्रयत्न दुर्दम्य असतील आणि भगवंतावर अतूट श्रद्धा ठेवून कार्य हाती घेण्याची उमेद असेल तर असंख्य अडचणी, संकटे यांचे निवारण होऊन त्याचे कार्य पूर्णत्वास जातेच जाते. हे असे विचार ऐकल्यावर आपल्या समोर उभे ठाकतात-ते दिव्यांगजन. थोरामोठ्यांनी सगळ्यांसाठींचे जे विचार सांगून ठेवले आहेत, ते विचार आचरणात आणणार्यांत अग्रेसर असतात, ते आपले दिव्यांग क्रीडापटू. त्यांच्याकडून सकारात्मक आशावाद घ्यायचा असतो, नैराश्य नाही. या लेखात आपण दिव्यांग क्रीडापटूंबद्दल विचार मांडत आहोत.
शीतल तिरंदाज...
जम्मू-काश्मीरच्या लोही धार गावात वाढलेली आता जानेवारी २०२४ मध्ये १७व्या वर्षांत जाणारी शीतल देवी. तिची जिद्द बघता पालकांनी तिला जम्मू येथील ’माता वैष्णवदेवी तिरंदाजी प्रशिक्षण अकादमी’त दाखल केले होते. शीतलचा जन्म फोकोमेलिया या दुर्मीळ जन्मजात विकाराने झाला होता, ज्यामुळे अंग विकसित होत नाही. जन्मतःच दोन्ही हात नसलेल्या शीतलने एक शिक्षक होऊन, सामान्य जीवन जगण्याचे ठरवले होते. मात्र, बंगळुरू येथील ‘बीईंग यू’ नावाची एक स्वयंसेवी संस्था चालवणार्या प्रीती राय यांच्याशी भेट झाल्यानंतर तिचे आयुष्य बदलून गेले. आज जगातील एकमेव आर्मलेस आर्चर म्हणून ती जगप्रसिद्ध आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये ’आशियाई पॅरालिम्पिक समिती’ने रियाद (सौदी अरेबिया) येथे झालेल्या सोहळ्यात शीतल देवी हिला एक प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आहे. शीतलने तिरंग्याला लपेटून, तिची प्रशिक्षक अभिलाषा यांच्या समवेत तो पुरस्कार स्वीकारला. ’पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धे’त तिरंदाजीत शीतलने दोन सुवर्णपदक मिळवली होती. ती आता जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तिचा संघ सहकारी राकेश कुमार तिसर्या स्थानावर आहे. तसेच तिची सहकारी सरिता ही सहाव्या स्थानावर असलेली ही शीतल देवी अॅण्ड को. आज पंतप्रधान मोदी तसेच काही उद्योजक तिच्या नैपुण्याने भारावून गेले आहेत.
शिखरावरची अरुणिमा...
शीतलच्या हातांचे उदाहरण पाहून झाल्यावर, आपण बघणार आहोत, पाय गमावल्याने दिव्यांगत्व येऊनही जिद्द आणि प्रतिकूलतेसमोर हार न मानणार्या एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा फडकवत सुप्रसिद्ध झालेल्या डॉ. अरुणिमा सिन्हाचे उदाहरण. १९८८ मध्ये जन्मलेली व्हॉलिबॉलपटू अरुणिमा दि. ११ एप्रिल २०११ रोजी भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा भाग असलेल्या ’केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’त भरती होण्यासाठी लोहमार्गाने प्रवास करत होती. त्यावेळी काही गुंडांनी तिच्याकडील मोबाईल आणि गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. अरुणिमाने त्या बदमाशांचा विरोध केला, तेव्हा त्या नराधमांनी तिला धावत्या गाडीतून फेकून दिले आणि ती शेजारील समांतर रुळावर पडली. त्यातून ती उठायच्या परिस्थितीत नसतानाच, तेथून आलेल्या आगगाडीखाली तिचा पाय सापडल्याने तो गुडघ्यापासून तुटला. नंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. पाय गमावल्याने दिव्यांगत्व येऊनही, अरुणिमाने एव्हरेस्ट पर्वतावर तिरंगा फडकावला तर आहेच. पण, आयुष्यातील आणखीन एक ध्येय २०२२च्या नोव्हेंबरमध्येच गाठले आणि ते म्हणजे आई होण्याचे. त्यातही विशेष म्हणजे, प्रसूतीसाठी लखनौ, दिल्ली, गुरुग्राम अशा ठिकाणी प्रसिद्ध खासगी प्रसूतिगृह असताना तिने शासकीय रुग्णालयाला प्राधान्य दिले. इतरांचे म्हणणे तेव्हा असे होते की, या बाळंतपणात नैसर्गिकरित्या प्रसूती करू नये, तसे केल्यास सर्वाधिक जोखीम पत्करून जीव धोक्यात घालण्याचे भय असू शकते. मात्र, जिद्द आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची हिंमत बाळगणार्या डॉक्टर अरुणिमाने शासकीय रुग्णालयात नाव घालून, नैसर्गिकरित्या प्रसूतिद्वारे गोंडस बाळाला जन्म दिला. भारत सरकारने तिला ’पद्मश्री पुरस्कारा’ने गौरवले आहे.
खेळा बहरा...
दिव्यांगांच्या क्रीडा प्रकारांत खेळाडूंच्या शरीरातील अपंगत्वानुसार शारीरिक अपंगत्व, दृष्टिदोषाने आलेले अपंगत्व आणि बौद्धिक क्षमतेनुसार आलेले अपंगत्व आलेले क्रीडापटू विविध खेळांमध्ये सहभाग घेताना आपण बघत असतो. काही खेळ सर्व प्रकारच्या अपंगत्व असलेल्या खेळाडूंना खेळता येतात. मात्र, काही खेळ विशिष्ट अपंगत्व असलेल्या खेळाडूंसाठी राखीव असतात.
अनेकांच्या मनातील न्यूनगंडामुळे दिव्यांग क्रीडा क्षेत्रापासून वंचित राहू शकतात. अनेक दिव्यांगांना क्रीडा क्षेत्रात, अनेक खेळांत निपुण होण्याचे, राष्ट्राकडून खेळायचे स्वप्न असते, तेदेखील आपल्या निवडीच्या क्रीडा प्रकारात आपल्या स्वप्नांची पूर्तता करू शकतात. याच उद्देशाने केंद्रीय क्रीडा मंत्री ’खेलो इंडिया पॅरा गेम्स’च्या माध्यमातून यांना आता नवीन मंच उपलब्ध करून देत आहेत. त्यांची स्वप्ने दिवास्वप्नच न राहता, ती प्रत्यक्षात उतरवू शकणार आहेत. गेली काही वर्षे ’खेलो इंडिया’मध्ये दिव्यांगांचा समावेश असावा, अशी कल्पना कोणाला सूचली नसावी. पण, आता ते प्रत्यक्षात येत आहे. २०१८ पासून आजपर्यंत आपल्याकडे ११ ‘खेलो इंडिया स्पर्धा’ झाल्या आहेत, या वर्षी ‘पॅरा गेम्स’चा समावेश त्यात होत आहे.
क्रीडोत्सवाने वर्षाखेर
दिव्यांग क्रीडापटूंना २०२३च्या डिसेंबरमध्ये क्रीडोत्सवाने वर्षाखेर साजरी करण्याची संधी उपलब्ध होत आहे. ‘क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन इंडिया’ यांनी आयोजित केलेल्या महिला क्रिकेटच्या भारत-नेपाळ यांच्यात टी-२०च्या पाच सामन्यांच्या स्पर्धा दि. ११ ते १५ डिसेंबरदरम्यान होत आहेत. या ’आयसीसी’च्या घोषणे पाठोपाठ नरेंद्र मोदी सरकारकडून ’पॅरा खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धा घोषित झाल्या आहेत.
’खेलो इंडिया’सारखा स्तुत्य उपक्रम गेले काही वर्षं देशात चालू असून, त्यातून अनेक क्रीडापटू आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सर्वसामान्य प्रतिस्पर्धात्मक क्रीडापटू घडवण्यात, सगळ्यांनी ज्याप्रमाणे कंबर कसली आहे. तद्वतच दिव्यांगांकडेही सगळे लक्ष देऊ लागले आहेत. पॅरा खेळाडूंमधून उत्कृष्ट क्रीडापटू शोधता यावेत, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळावा, त्यांचे करिअर घडवण्यात खेळाचाही वाटा असावा, त्यांचे क्रीडा नैपुण्य वृद्धिंगत व्हावे, हा हेतू ध्यानी ठेवत पहिल्या ’पॅरा खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धा म्हणजेच दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धांची घोषणा दि. २४ नोव्हेंबर २०२३च्या शुक्रवारी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केली आहे. राजधानीत दि. १० ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान होणार्या या स्पर्धेत सात क्रीडाप्रकार, ३२ राज्ये व केंद्रशासित प्रदेश, ’सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड’सहित १ हजार, ३५०हून अधिक स्पर्धक सहभागी असतील. ‘पॅरा आशियाई’, ’पॅरा राष्ट्रमंडल’, ’पॅरालिम्पिक’ अशा मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये अनेक आव्हानांना सामना करता यावा, त्यांना जास्तीत जास्त पदके कमवता यावीत, क्रीडा क्षेत्रातील बलाढ्य देशांच्या तुलनेत आपल्या दिव्यांग क्रीडापटूंचाही अनुभव तोकडा पडू नये, हे ध्येय ठेवत सरकारने उचललेल एक अभिनंदनीय पाऊल होय. देशवासीयांकडून दिव्यांग क्रीडापटूंकडे तसेच दिव्यांग क्रीडापटूंना सरकार आणि देशवासीयांकडे ज्या अपेक्षा आहेत, त्याची पूर्तता व्हावी, यासाठी ’खेलो इंडिया’चा उपयोग होणार आहे.
उज्ज्वला काय सांगते!
उज्ज्वला नावाची चिमणी आपल्या बरोबर दिल्लीत असेल की, जी या स्पर्धेचा अधिकृत शुभंकर असेल. ही छोटी चिमणी दिल्लीच्या अभिमानाचे प्रतीक आहे आणि तिचे वेगळेपण दृढनिश्चय आणि सहानुभूती दर्शवते. उज्ज्वला आपल्याला आठवण करून देईल की, शक्ती अनेक रुपात येते आणि मानवी चैतन्य अतूट ठेवते.
आर्थिक पाठबळ
दिव्यांग क्रीडापटूंना त्यात होणार्या क्रीडा स्पर्धेत त्यांचा दोन वेळचा प्रवास, जेवण, निवास असा खर्च दिला जाईल. एवढेच नव्हे तर विजेत्यांना पाच लाखाची शिष्यवृत्तीदेखील देण्यात येणार आहे. सर्वसाधारण खेळाडूंकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, तशाच दृष्टिकोनातून दिव्यांग क्रीडापटूंकडे बघितले, तर नक्कीच हे क्रीडापटूही स्वतःच्या नावाबरोबर देशाचेही नाव उज्ज्वल करतील, यात कोणाचीच दोन मतं नसतील.
अॅथलेटिक्स, जलतरण, बॅडमिंटन, व्हीलचेअर बास्केटबॉल, व्हीलचेअर टेनिस, धनुर्विद्या, नेमबाजी, रोविंग, कॅनॉई, ब्लाईंड फूटबॉल, टेबलटेनिस, सिटिंग व्हॉलिबॉल, गोटबॉल, भारोत्तोलन अशा क्रीडा प्रकारांत आज भारतीय दिव्यांग क्रीडापटू सहभाग घेत असतात, त्यातील धनुर्विद्या, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, फुटबॉल, नेमबाजी, टेबलटेनिस, भारोत्तोलन अशा मोजक्या सात क्रीडा प्रकारांसाठी ’खेलो इंडिया पॅरा गेम्स’मधील दिव्यांग क्रीडापटू आपले कसब दाखवतील.
’पॅरालिम्पिक’
‘पॅरा खेलो इंडिया’तून जागतिक स्तरावरील ’ऑलिम्पिक’मध्ये ज्यांना जाण्यासाठी मदतीला येणार आहेत-त्या स्पर्धा म्हणजे ’पॅरालिम्पिक.’ त्या ’पॅरालिम्पिक’ शब्दाचा थोडक्यात अर्थ म्हणजे ’ऑलिम्पिक’च्या धर्तीवर (पॅरलल) समांतर पातळीवर बहुविध क्रीडा प्रकारांसाठी आयोजित होणारी स्पर्धा. दर चार वर्षांनी शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असणार्या खेळाडूंसाठी ’पॅरालिम्पिक’ स्पर्धांचे आयोजन ’द इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटी’कडून केले जाते.
एका डॉक्टरची संकल्पना...
नाझी राजवटितील जर्मनीतून इंग्लंडला रवाना झालेल्या, सर ल्युडविक गटमन या डॉक्टरने स्टोक मँडव्हिले नावाच्या एका रुग्णालयात मणक्याच्या दुखापतींकरिता एक विभाग सुरू केला होता. १९४८ साली ब्रिटनमध्ये पहिल्यांदा भरवण्यात आलेल्या, त्या स्पर्धेला तेव्हा ’स्टोक मॅण्डव्हिले गेम्स’ असं संबोधले जात असे. दुसर्या महायुद्धात सहभागी झालेले काही सैनिकही या स्पर्धेत खेळले होते. नंतर १९६० सालापासून याचे नाव ’पॅरालिम्पिक गेम्स’ असे ठेवण्यात आले. लाल, निळा आणि हिरव्या रंगाचा समावेश असलेले ’पॅरालिम्पिक गेम्स’चे बोधचिन्ह. ‘अगिटो’ म्हणजे लॅटिन भाषेत ’आय मूव्ह’ असा अर्थ असलेले बोधचिन्ह असलेल्या या क्रीडा स्पर्धांत गतीकेंद्रित खेळांना म्हणजेच जगभरातल्या पॅरालिम्पिकपटूंना एकत्र आणण्यासाठी असलेल्या त्या स्पर्धेतील रोम इथे झालेल्या स्पर्धेत २३ देशातले ४०० खेळाडू सहभागी झाले होते. ’पॅरालिम्पिक’ स्पर्धेच्या सुसूत्रीकरणासाठी पुढे १९८९ साली ’द इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटी’ची स्थापना करण्यात आली.
मुरलीकांता तुमचा श्रीगणेशा...
’पॅरालिम्पिक’ स्पर्धांमध्ये भारताच्या कामगिरीवर एक दृष्टिक्षेप टाकला, तर आपल्याला भारतीयांनी नऊ सुवर्ण, १२ रजत आणि दहा कांस्य अशी एकूण ३१ पदके मिळवलेली दिसतील. यामध्ये १९६५च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात सहभाग घेतलेल्या मुरलीकांत पेटकर या दिव्यांग जलतरणपटूने १९७२च्या जर्मनीमध्ये झालेल्या ’पॅरालिम्पिक’मध्ये पटकवलेल्या सुवर्णपदकाचा समावेश असून, भारताच्या पहिल्या ’पॅरालिम्पिक’ पदकाचा श्रीगणेशा तेथून झाला. त्याच स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाईल-३ या प्रकारात पुण्यातील थेरगाव भागात राहणार्या मुरलीकांत पेटकर या जलतरणपटूने विश्वविक्रम केला होता. भारतीय सैन्यदलाच्या ’कोर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मेकॅनिकल इंजिनिअर्स’ (ईएमई) मध्ये असलेल्या मुरलीकांत पेटकर या जवानाने आधी लष्करात सुरुवातीला हॉकी खेळण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांची संघात निवड न झाल्याने हा जवान मुष्ठियुद्धात निपुण झाला. युद्धातील गोळीबारात या जवानाला आपला एक हात गमवावा लागला होता, म्हणून त्या जवानाने जलतरणात सूर मारला. भारताच्या चौथ्या सगळ्यात मानाच्या असलेल्या नागरिक पुरस्कारातील ’पद्मश्री’ने २०१८ साली सरकारने त्यांना सन्मानित केले आहे. आपला त्यांना सॅल्युट.
मग पुढे भिमराव केसरकर या दिव्यांग पॅरालिम्पिकपटूने १९८४च्या मैंडविल व न्यूयॉर्कमधील स्पर्धेत भारताला थाळाफेकीत रौप्यपदक मिळवून दिले. अशी ’पॅरालिम्पिक’मधील पदकांची प्रथा आजतागायत चालू आहे. एक पदक, दोन पदक असे करत-करत एकाच २०२०च्या ’टोकिओ पॅरालिम्पिक’मध्ये भारतीय पॅरा खेळाडूंनी १९ पदके मिळवून दाखवली आहेत.
आता या ’पॅरा खेलो इंडिया’ स्पर्धेत नावारुपाला येणार्या क्रीडापटूंना आपण शुभेच्छा देऊ आणि २०२४च्या ऑगस्टमध्ये पॅरीसमध्ये होणार्या ’पॅरालिम्पिक’ स्पर्धेत भारताच्यावतीने सहभाग घेणार्या पॅरा खेळाडूंच्या निवडीसाठी उभरते खेळाडू या ’पॅरा खेलो इंडिया’तून उपलब्ध होवोत, ही आपण सारे मनोकामना व्यक्त करू. हे असे ’पॅरा खेलो इंडिया’चे पहिले प्रस्तुतीकरण यशस्वी होत प्रतिवर्षी असेच यशस्वी सादरीकरण होत राहो. आपले पॅरापटू ’पंगुं लंघयते गिरीम्’ कसे करतात, ते बघण्याची संधी, एक झलक आपल्याला डिसेंबर महिन्यात मिळत आहे. ते पॅरापटू, त्यांचे पालक, प्रशिक्षक, क्रीडा मंत्रालय अशा अनेकांना आपण सारे सलाम करू.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४