इंग्रजी दिनदर्शिकेनुसार २०२३ या आंग्लवर्षाचा हा शेवटचा आठवडा. या मावळत्या वर्षाकडे पाहता, क्रीडा क्षेत्रातील भारताची, भारतीय क्रीडापटूंची कामगिरीही तितकीच लक्षणीय आणि चमकदार ठरली. त्यानिमित्ताने क्रीडा क्षेत्रातील काही ठळक घडामोडींचे सिंहावलोकन करणारा, हा माहितीपूर्ण लेख...
आपण सर्वसाधारणतः तीन वर्षे आचरतो. भारतीय कालगणनेतील स्वधर्माचे गुढीपाडव्याचे हिंदू वर्ष, ख्रिस्ती कालगणनेनुसारचे सर्वत्र अपरिहार्य असलेले प्रचलित जानेवारी महिन्यात सुरू होणारे ग्रेगरी दिनदर्शिकेनुसारचे वर्ष आणि एप्रिलला येणारे आर्थिक वर्ष. चीन, ग्रीक, पारशी, मुस्लीम अशा आपल्या-आपल्या धर्मांनुसार ती-ती धर्माभिमानी जनता निष्ठेने स्वतःचे कालगणनेवर आधारित वर्ष आचरतात. २०२४च्या ख्रिस्ताब्दाचे स्वागत तसेच हिंदू वर्ष, आर्थिक वर्ष आणि प्रचलित आंग्ल वर्ष या तीन वर्षांपैकी एक असणारी ग्रेगरी वर्षाखेर २०२३ डिसेंबरच्या अखेरच्या सप्ताहात साजरी करण्याचा हा काळ. इसवी १००० पर्यंत युरोपातील सर्व ख्रिश्चन देशांनी आणि आधुनिक युरोपीय साम्राज्यवादाच्या विस्ताराने संपूर्ण जगाने त्याचा स्वीकार केला. त्यांच्या पंचांगाचा, आंग्ल दिनदर्शिकेचा दिनपत्रिकेचा (डायरीचा) हा काळ. या वर्षाच्या सांगतेची/स्वागताची महोत्सवी धामधूम नाताळापासून सुरू होताना आपण बघतो. असे जरी असले तरी जे ख्रिश्चन नाहीत व जे स्वधर्माभिमानी आहेत, ते ‘हॅपी न्यू इयर’चे स्तोम न माजवता, अपरिहार्यता म्हणून आपल्या भिंतीवरील दिनदर्शिका बदलतात. आपण आपल्या दिनपत्रिका आणतो (अनेकांना ती स्नेहभेट प्राप्त होत असते). असे आपण सारे २०२३ला निरोप देण्यास आता सज्ज आहोत.
सवाई मार्गशीर्ष
अशा २०२३च्या वर्षाखेरीस गायन, वादन, नृत्य, चित्रकला, क्रीडा अशांसकट अनेकांचा असलेल्या थंडीच्या आणि उत्साहाच्या या मार्गशीर्ष/पौष मासात अनेक उत्सवांचा ते आनंद घेतात. तसा सरत्या वर्षीच्या दि. १३ ते १७ डिसेंबरदरम्यान संपन्न झालेला, आर्य संगीत प्रसारक मंडळाचा ६९वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, मुकुंदनगर येथील सुप्रसिद्ध महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात पुणेकरांनी तो अनुभवला.
आम्ही अजूनही मैदानात उतरू शकतो!
सर्वसामान्यांच्या तोडीस तोड असलेले, काही क्रीडापटू पाहिल्यावर मैदानात कधीही सहजी निवृत्ती घ्यायची नसते, हे सगळ्यांना दाखवत, नवी दिल्लीत उतरलेले, ते ज्येष्ठ क्रीडापटू तीन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेत उतरले होते. ‘खेलो मास्टर गेम्स २०२३’ या देशातील विविध क्षेत्रांतून आलेल्या स्त्री-पुरूष क्रीडापटूंनी त्यात उत्साहात सहभाग घेतला होता. वयवर्ष ३० ते वयवर्ष ९० यांच्यासाठीच्या राष्ट्रीय स्पर्धेत अनेकजण उतरले होते. त्यात अशा झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला पदक मिळवून दिलेले, काहीजण पदक पटकवताना दिसत होते.
सरकारी नोकरीतले खेळाडू...
नोकरीत काम करत उरलेल्या वेळात आपापल्या खेळांचा सराव करताना दिसल्यावर, त्यांना प्रोत्साहन देत आणि पदकप्राप्त क्रीडापटूंना नोकरीत बढती देण्यात पुढाकार घेणारे, फक्त खासगी आस्थापनातच आढळतात असे नाही, तर राज्य सरकारी नोकरीत खेळांना मान्यता देणारे सरकारी बाबू आता बदललेले दिसत आहेत. नुकत्याच विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सरकारी नोकरीत असलेल्या महिला व पुरूष कर्मचार्यांसाठी काही क्रीडा स्पर्धांदेखील नवी दिल्लीत झाल्या होत्या. जलतरणासहित अन्य बर्याच स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. विशेष बाब म्हणजे, जे कर्मचारी दिल्लीत पदकांची कमाई करून येतील, त्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यताही आहे.
सांगता कला-क्रीडेच्या अनोख्या संगमावर...
दि. १९, २०, २१ डिसेंबर या कालावधीत ‘डीडी स्पोर्ट्स’ने ‘पायथियन गेम्स’ या कधी पाहायला न मिळणार्या, दुर्लभ महोत्सवाचे प्रक्षेपण केले होते. ’ऑलिम्पिंक’प्रमाणेच ग्रीकमध्ये अनादी काळापासून चाललेल्या, प्राचीन असलेल्या या महोत्सवात कला व संस्कृतीमधील रंगकला, चित्रकला, नृत्य, संगीत, नाट्यकला, कविता, गायन, थ्रोबॉल, अर्वाचीन शर्यतीमधील निवडक प्रकार, रस्सीखेच, योग कलेवर आधारित खेळ, मार्शल आर्ट, टायक्वोंदो, कराटे, काठी-तलवार यांसारख्या खेळांचा गटका अशा काही पारंपरिक क्रीडा प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये आयोजित महोत्सवात देश-विदेशातील लहानमोठे स्त्री-पुरूष सहभागी झाले होते. त्या महोत्सवाचे उद्घाटन परराष्ट्र आणि सांस्कृतिक राज्य मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केले होते. सरत्या २०२३च्या वर्षात जागतिक स्तरावरील भारतीय क्रीडा, कला, संस्कृती अशा क्षेत्राच्या नेत्रदीपक कामगिरीचा धावता आढावा घेताना, आपल्याला मोदी सरकारला विसरता येणार नाही.
सदैव पाठीशी...
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारमधील सर्वानंद सोनोवाल, जितेंद्र सिंग, विजय गोयल, निवृत्त कर्नल व ऑलिम्पिकपटू राज्यवर्धन सिंग राठोड, किरेन रिजेजू यांच्यानंतर आलेल्या २०२१ पासून विद्यमान असलेल्या अनुराग सिंग ठाकूर अशा सक्षम सदस्यांनी देशाचे क्रीडामंत्रिपद सांभाळले आहे. नरेंद्र मोदी-अनुराग सिंग ठाकूर यांच्या कारकिर्दीत भारत क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल अनुभवत आहे.
रेकार्ड ब्रेक
जागतिक स्पर्धांमध्ये २०२३ सालातच देशाने पदकांची कमाल करून दाखवली आहे. ’आशियाई स्पर्धे’त रेकार्ड ब्रेक करत, भारताने प्रथमच पदकांचा २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य अशा १०७चा तीन अंकी आकडा २०२३ मध्येच पार केला आहे.
अॅथलेटिक्सची धाव...
२०२३च्या याच हांगझोऊच्या ‘आशियाई स्पर्धे’त नीरज चोप्राचा सहखेळाडू असलेल्या किशोर जेनाने भालाफेक या क्रीडा प्रकारात सगळ्यांना प्रभावित केले. ’ओरेगॉन २०२२’मध्ये रजत पटकावल्यानंतर ’टोकियो ऑलिम्पिक’ चॅम्पियन नीरज चोप्राने बुडापेस्ट २०२३मध्ये ’विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’मध्ये सुवर्णपदक जिंकायचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवत, भारतीयांना खुश केले.
महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याने पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस या धावण्याच्या शर्यतीत ’आशियाई स्पर्धे’चा विक्रम प्रस्थापित केला. तसेच प्रथमच महिलांच्या अशाच स्पर्धेत पारूल चौधरी हिने रौप्यपदक आणि पाच हजार मीटरमध्ये पदक पटकावले, तर अन्नू राणी हिने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्ण जिंकले.
धनुर्धरांचे नेम...
धनुर्विद्येत या अगोदरची आकडेवारी ओलांडत, पदकांची नवमी साजरी करत असताना, त्यात असलेली पाच सुवर्णपदक उठून दिसत आहेत. गेल्या १८ ’आशियाई स्पर्धा’ मिळून, भारत फक्त दहा पदके मिळवू शकला होता. एकट्या २०२३च्या वर्षात ’वरिष्ठ विश्व चॅम्पियनशिप’पासून ते ‘आशिया चषका’पर्यंत झालेल्या विविध १६ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १०७ पदक मिळवून, हा एक इतिहासच रचला गेला आहे.
सोने पर सुहागा...
नवी दिल्लीत दि. १७ डिसेंबरला संपन्न झालेल्या तसेच पहिल्यांदाच झालेल्या ’खेलो इंडिया पॅरा गेम्स’मध्ये महाराष्ट्राने देशात ३५ पदके पटकावत, पाचवे स्थान पटकावलेले आपण बघितले. त्यामध्ये बॅडमिंटनपटूंची देखील मोलाची मदत होती. अशा पॅरापटूंमध्ये पूर्वी उत्साह दिसत नसे, त्यांचे सतत मागणे असायचे की, त्यांना अपेक्षित असे पाठबळ, प्रोत्साहन (एक्सपोजर) मिळत नाही. यावेळेस या स्पर्धांचे ’डीडी स्पोर्ट्स’ या दूरचित्रवाणीवर आणि आकाशवाणीवरून दिले गेलेले प्रक्षेपण पाहून, देशवासीयांत या पॅरापटूंमध्येही सर्वसामान्यांसारखेच क्रीडा गुण आहेत, हे जाणवले आणि त्यामुळेच त्यांच्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदलताना दिसू लागला. दुबई पॅराबॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मानसी जोशी आणि तिच्या सहकार्यांनी पदके पटकावत, त्या पॅरापटूंनी देशाभिमान नुकताच पुन्हा जागवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सांगत असतात की, ’खेलोगे तो खिलोगे’ कसे आचरणात आणायचे, ते या पॅरापटूंनी सगळ्यांना दाखवून देत, २०२३ची समाधानी सांगता केली.
तोमरचे नेमबाजीतले ऐश्वर्य...
ऑलिम्पियन ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरच्या नेतृत्वात उतरलेल्या, नेमबाजांनी ‘आशियाई स्पर्धे’त जी २२ पदके जिंकली होती, त्यातच सात सुवर्णपदके होती. त्या सातपैकी चार सुवर्णपदकांनी भारतास विश्व रेकॉर्डच्या जवळ आणून ठेवले आहे.
ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन...
बॅडमिंटनचे ’ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन’ या नावाने जगात ओळखल्या जाणार्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या जोडीने ऑक्टोबर २०२३ मध्ये बॅडमिंटन क्रमवारीत ’वर्ल्ड नंबर १’चे स्थान पटकवणारे, ती भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात पहिली भारतीय युगल जोडी ठरली. या जोडीने ’आशियाई स्पर्धां’बरोबरच बॅडमिंटन ‘आशियाई चॅम्पियनशिप’मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकून दाखवले आहे. यांनाच या वर्षीचा ’खेलरत्न पुरस्कार’ही जाहीर झाला आहे.
२०२३ मध्येच आर. वैशाली आणि आर. प्रज्ञानंदची बहीण-भावांची जोडी बुद्धीबळात जगप्रसिद्ध झाली.
आंतरराष्ट्रीय ‘ऑलिम्पिक समिती’ची १४१वी बैठक दिमाखात मुंबईत भरली होती की, ज्यात क्रिकेट टी-२०ला ‘ऑलिम्पिक स्पर्धे’त परवानगी देण्याची चर्चा झाली होती.
क्रिस्टियानो रोनाल्डो, लियोनेल मेसी यांच्या जोडीला आता भारताच्या सुनील छेत्री याचेही नाव डिसेंबर २०२३ मध्ये जोडले जात आहे. क्लब आणि देशाकडून असे एकूण मिळून २४९ गोल सुनील छेत्री या फूटबॉलपटूने डिसेंबर अखेर नोंदवले आहेत.
२०२३च्या आपल्या क्रीडा दिनपत्रिकेतली काही मोजकीच पाने चाळण्याचा प्रयत्न आपण येथे केला. आता नाताळ सुरू होत आहे. त्याच्या भेटींचेही आदानप्रदान सुरू होईल. तसाच एक क्रीडाप्रकार आपण पाहू.
विनामुष्ठीयुद्धाचा ’बॉक्सिंग’ दिवस
भारताच्या पुरुषांच्या क्रिकेटचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर आहे. त्यादरम्यान ते दि. २६ डिसेंबरपासून तेथील सेंच्युरियनच्या मैदानावर कसोटी सामना खेळणार आहेत. ’बॉक्सिंग डे’ कसोटी म्हणून त्याला संबोधले जाते. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अशा देशांमध्ये जे पाहुण्या देशांचे संघ येतात, त्यांच्या बरोबर तो ’बॉक्सिंग डे’ कसोटीचा महोत्सव साजरा केला जातो.
दरवर्षी ख्रिसमस म्हणजेच दि. २५ डिसेंबरच्या दुसर्या दिवशी दि. २६ डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो. ’बॉक्सिंग डे’ हे नाव ऐकल्यानंतर जर तुम्ही त्याचा संबंध मुष्ठीयुद्ध (बॉक्सिंग) या क्रीडा प्रकाराशी जोडण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला फसायला होईल. ’बॉक्सिंग डे’चा ’बॉक्सिंग’शी काडीमात्र संबंध नाही. मूळ ’बॉक्स-इन’ या शब्दांवरून प्रचलित झालेल्या, दि. २६ डिसेंबरला ’बॉक्सिंग डे’ हे नाव कसे पडले, याविषयी सांगण्यात येते. त्यानुसार, हा दिवस १८३० पासून जोमात चालू झाला. ब्रिटिश प्रथेनुसार ख्रिसमसनंतरच्या आठवड्यातील हा पहिला दिवस असतो. सार्वजनिक सुट्टी असलेल्या, या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी काम करणार्या, कर्मचार्यांना ख्रिसमस बॉक्स मिळतो. या बॉक्समधून त्यांना भेट वस्तू, मिठाई वगैरे खुशीने दिली जाते. घरगड्यांचा त्यात प्रामुख्याने सन्मान केला जातो. सगळे एकत्रित सहलीला जातात, तर अनेकजण विविध क्रीडा स्पर्धांचा आनंद घेतात.
आता २०२४चे आंग्ल नववर्ष सुरू होणार आहे. आपणही सगळ्यांना त्यासाठी शुभेच्छा देण्यास दि. १ जानेवारी २०२४ रोजी सिद्ध होऊ. तत्पूर्वी २०२३च्या अखेरीस आपण आपले हे ग्रेगरी दिनदर्शिकेनुसारचे वर्ष कसे व्यतित केले, याचे सिंहावलोकन करू आणि त्यातून आपण काय कमावले, काय गमावले, ते बघू. दि. ३१ डिसेंबरला थर्टीफर्स्ट पार्टी न करता, शांतपणे आपण २०२३ मध्ये काय जिंकलो, काय हरलो, हे आठवत आपले क्रीडाविश्व समृद्ध करण्यास, त्याचा उपयोग करू. बाहेर दि. ३१ डिसेंबर ज्याप्रकारे साजरी होत असते, तसे आपण न करता, अंतर्मुख होऊन साजरी करू. ती पार्टी आपल्याला आगामी वर्षाच्या लाभाची ठरेल हे नक्की. जाताजाता आपल्या २०२३च्या दिनपत्रिकेचे/रोजनिशीचे वाचन करायला आपण विसरायचे नाही आणि नवी कोरी आणायलाही विसरायचे नाही. त्यातूनच आपण आपल्याला ओळखायला मदत होणार आहे.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४