अविनाश हजारिका... ज्यांनी स्वतः स्वावलंबी होण्याबरोबरच गावकर्यांनाही स्वावलंबनातून समृद्धीचा मार्ग दाखवत त्यांच्या आयुष्याचा कायापालट केला, अशा माणसाची ही यशोगाथा...
आपल्या सभोवती फुललेला निसर्ग जो स्वतःमध्ये परिपूर्ण आहे, स्वावलंबी आहे, कदाचित म्हणूनच तो मानवाला नेहमी स्वावलंबनाची प्रेरणा देत असतो. आसामच्या अशाच एक स्वावलंबी व्यक्तीची ही यशोगाथा. अविनाश तानकेश्वर हजारिका, ज्यांनी स्वतः स्वावलंबी होत इतर गावकर्यांनाही स्वावलंबी बनवून त्यांच्या आयुष्याचा कायापालट केला. आसामच्या बांबूच्या अप्रतिम हस्तकलेला वनवासींच्या उपजीविकेचा आधार बनवणार्या ‘सेवा भारती’च्या पंचजन्य कुटीर उद्योगाने २०२२ पर्यंत ५० लाख रुपयांची उलाढाल साधली असून, ६० हून अधिक गावांना याचा लाभ झाला आहे. बांबूपासून कलात्मक गोष्टी बनवून स्थानिक बाजारपेठ, सौराष्ट्र मेळा, अपना व्यापार मेळा, बिहू फेअर, आसाम फेअर अशा प्रदर्शनांचा लाभ घेऊन हजारो हात आपल्या आयुष्यात प्रगतीकडे वाटचाल करत आहेत.
बांबूची कला हा इथल्या प्रत्येक घरातील संस्कृती आणि परंपरांचा अविभाज्य भाग. बांबूपासून बनवलेल्या वस्तू प्रदर्शनात नवनवीन स्वरूपात मांडल्या जातात, तेव्हा त्या पाहून प्रत्येकाचे डोळे भरून येतात. मानवी मन हे अमर्याद कल्पनेचा महासागर आहे, हे खरेच आणि हे अविनाश यांच्यापेक्षा चांगले कोण सांगू शकेल? २००९ पासून ‘सेवा भारती’शी जोडले गेलेले अविनाश सध्या जोडा जिल्ह्याचे संयोजक आहेत. ते बांबूच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी झाले असून, आजतागायत त्यांनी हजारो लोकांना बांबूच्या विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. जेव्हा हे काम सुरू झाले, तेव्हा फक्त सात-आठ उत्पादने बनवली जात होती. परंतु, आज आसाममध्ये भरलेल्या मोठ्या प्रदर्शनांमध्ये २०हून अधिक प्रकारची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
अविनाश यांच्यासोबत, ‘सेवा भारती’ आसाममधील जोरहाटमध्ये पंचजन्य कुटीर उद्योगांतर्गत गावोगावी बांबू हस्तकला प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहे. नागेन कलिता आणि रोमेन हजारिका यांचाही या संपूर्ण कार्यात शिक्षक आणि सहकारी म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली आहे. ज्या डोंगराळ भागात पक्के रस्ते किंवा वीजही नाही, अशा ठिकाणी जाऊन लोकांना बांबूच्या कलाकुसरीचे पूर्ण प्रशिक्षण देऊन पूर्ण आत्मविश्वासाने शिबिरे उभारणे हे एक मोठे काम आहे.
माजुली गावचा दिव्यज्योती नाथ असो वा जोरहाटचा प्रणबज्योती चांगमाई, ते गरिबीशी झुंजत होते आणि पदवीनंतरही नोकरी शोधत होते. परंतु, त्यांना कुठेही नोकरी मिळाली नाही. आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या आणि कुटुंबाच्या छोट्या-छोट्या गरजाही पूर्ण करू न शकण्याचे दु:ख त्यांना आतून सतावत होते. अविनाश यांच्यामार्फत ‘सेवा भारती’चे घेतलेले प्रशिक्षण शिबीर त्यांच्यासाठी वरदान ठरले. त्यांच्यातील सर्जनशील व्यक्तीने त्यांना नवे आकाश दिले, त्यांच्या कल्पनेला पंख मिळाल्यासारखे वाटले. जिथे १०० रु. मुश्किल होते तिथे आज १० ते १५ हजार रुपयांची कमाई करत आहेत. असे म्हटले जाते की, भारतीय अर्थव्यवस्थेत महिलांचे मोठे योगदान आहे. परंतु, सत्य परिस्थिती अशी आहे की, सामान्यतः भारतीय गृहिणींचे कोणतेही थेट उत्पन्न नसते, ती काही हजार रुपयांसाठीही पतीच्या कमाईवर अवलंबून असते.
आज आसामच्या प्रत्येक घरात स्त्रिया बांबूपासून वस्तू बनवतात, पण त्यांच्या वस्तूंचा प्रचार कसा करायचा? त्यांना स्थानिक बाजारपेठेत कसे आणायचे? सामान्यतः या सर्व प्रश्नांची उत्तरे या महिलांना सापडत नाहीत. परिणामी, त्यांची कौशल्ये एकाच चार भिंतीत बंदिस्त राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून अविनाश यांच्यामार्फत माजुली आणि गोलाघाट जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन बांबू प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहे, ज्यामध्ये पुरुषांसोबत शेकडो महिलाही उत्साहाने सहभागी होत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळत आहेत. आज त्यांच्यापैकी एक दीपशिखा बारसुटिया तिच्या कुशल कारागिरीने दरमहा दहा हजार रुपये कमावते. एवढेच नाही, तर तिच्या हाताने बनवलेल्या वस्तू लोकांना खूप आवडतात. या प्रशिक्षण शिबिरामुळे त्यांना स्वावलंबी तर झालेच, शिवाय स्वत:ची एक वेगळी ओळखही मिळाली. ‘एक आदर्श कृती योजना’ हजारो लोकांना मार्ग दाखवते.
साल २०१९ पासून, अविनाश हजारिका बांबू क्राफ्ट मेघालयातही अशाच धर्तीवर काम करत आहे. बांबूच्या कलात्मक वस्तूंचे प्रशिक्षण देण्यासाठी नोनी पाडा गावात एक केंद्र चालवले जाते. ज्यातून २५० हून अधिक लोकांनी प्रशिक्षण घेतले असून, १५ गावांतील २०० हून अधिक कुटुंबे लाभ घेत आहे. नुकतेच दिल्ली येथे होऊ घातलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात आसाम सरकारने अविनाश हजारिका यांना नामांकित केले आहे, ज्यात त्यांना बनवलेल्या बांबू क्राफ्टचे प्रदर्शन व विक्री करता येणार आहे. जीवन जगत असताना माणसाच्या अंगी धडपडण्याची वृत्ती असणे फार गरजेचे आहे. कारण, एक दार बंद झालं की, अशा वृत्तीच्या माणसाला दुसरा दरवाजा नक्की सापडतो, असे ते आवर्जून सांगतात. अविनाश हजारिका यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!
गौरव परदेशी