संपूर्ण जगातील औषधशास्त्र हे एकच आहे. सर्व औषध प्रणालींचा एकच उद्देश असतो व तो म्हणजे रोग्याला रोगमुक्त करणे. होमियोपॅथीमध्ये रोग्याला नुसते रोगमुक्त करून काम भागत नाही, तर त्या माणसाची निरोगी स्थिती कशी अबाधित राहील, यावरही खूप मेहनत घेतली जाते व प्रयत्न केले जातात. अॅलोपॅथी काय किंवा होमियोपॅथी काय, या दोन्ही शाखांमध्ये सर्व समान विषयच शिकवले जातात.
सर्व पुस्तकेही दोन्हीकडे समानच असतात. शरीररचनाशास्त्र (anatomy) शरीर कार्यशास्त्र (physiology) फोरेन्सिक मेडिसीन आणि टॉक्सीकोलॉजी (preventive and social medicine-PSM) पॅथॉलॉजी, सर्जरी, गायनॅकोलॉजी आणि ऑब्स्ट्रेटीक्स (obstetrics) ‘प्रॅक्टिस ऑफ मेडिसीन’ हे सर्व विषय सारखेच असतात. परंतु, होमियोपॅथीच्या पदवीधारकांना मात्र दुय्यम वागणूक देण्यात येते, हा फारच वाईट प्रकार आहे.
अकरावी आणि बारावीमध्ये पण फक्त ‘एमबीबीएस’ला अॅडमिशन मिळावी म्हणून लोक लाखो रुपये क्लासेसच्या फीसाठी मोजतात. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये खासगी महाविद्यालयांची संख्या खूप जास्त आहे. या महाविद्यालयांमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची आर्थिक गुंतवणूक असते व त्यामानाने या महाविद्यालयांमध्ये शिकवल्या जाणार्या अभ्यासाचे Standard म्हणजे पातळी ही कुठल्या थराची असते, हा एक संशोधनाचा विषय आहे आणि या महाविद्यालयाच्या फीबद्दल जर तुम्ही विचाराल तर ही फी सामान्य नागरिकांना परवडण्याच्या पलीकडे गेलेली आहे. म्हणजेच ज्या लोकांकडे पैसे आहेत, तसेच लोक डॉक्टर होऊ शकतात व गरीब घरातील मुले हुशार असूनही मागे पडतात.
राज्य सरकार व केंद्र सरकारला हे दिसत असेल का? असो. यामुळे या व्यवसायाचा धंदा केला जातो व लोकांच्या मनावर पद्धतशीरपणे हेच बिंबवण्यात येते की, अॅलोपॅथी हीच एकमेव पॅथी आहे, त्याचबरोबर असेही अनुभव आहेत की, अॅलोपॅथीचे काही डॉक्टर रुग्णांच्या मनात होमियोपॅथी व आयुर्वेदाबद्दल चुकीचे समज जाणूनबुजून पसरवत असतात. प्रत्येक पॅथी ही आपल्या जागी श्रेष्ठ आहे व इतरांना कमीपणा देऊन स्वत:चा मोठेपणा दाखवणे म्हणजे कद्रूपणाचे लक्षण आहे, हेदेखील त्यांना कळत नाही. लोकांच्या मनावर या अॅलोपॅथिक सिस्टीमचा इतका पगडा आहे की, हे लोक विसतात की पूर्वी भारतात जेव्हा अॅलोपॅथी नव्हती, तेव्हासुद्धा लोक नैसर्गिक औषधे घेऊन बरे होत हेतो.
तेव्हासुद्धा लोक दीर्घायुषी होत होते. परंतु, आताच्या जमान्यात साधी सर्दी किंवा साधा खोकला जरी आला तरी सर्वप्रथम जाऊन antibiotics किंवा प्रतिजैविके खाण्यात या लोकांना धन्यता वाटते. यामुळे शरीराची जी हानी होते, ते त्यांना आता लक्षात येणार नाही. हल्लीच्या काळात उद्भवणार्या नवनवीन आजार व कॅन्सरसारखा रोग ज्या वेगाने पसरतोय. तो का पसरतोय? त्यामागचे नेमके कारण काय? हे नीट समजून घ्यायला पाहिजे व ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. (क्रमश:)
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६