चीनच्या पोलादी पडद्यामागील घटनांचे अन्वयार्थ लावणे अवघड असतानाच चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांच्या मृत्यूची बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे चीनच्या गूढ राजकारणात या बातमीचा मागोवा घेताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, एखाद्या सरळ असू शकणार्या घटनेकडेही आता सरसकटपणे शंका घेतली जाऊ शकते, अशी ही परिस्थिती.
चीनमधील कम्युनिस्ट पक्षाची मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात २० वी काँग्रेसची बैठक पार पडली होती. त्या बैठकीत शी जिनपिंग यांनी पक्ष, संरक्षणदल आणि सरकारमधील त्यांचे स्वतःचे स्थान भक्कम केले होते. त्यांना आव्हान देऊ शकणार्या सर्व व्यक्तींना एकतर बाजूला सारण्यात आले होते अथवा सार्वजनिक जीवनातून दूर ठेवण्यात आलेले होते. शी जिनपिंग यांचे पूर्वसुरी असणारे हू जिंताओ यांना या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीतून अक्षरशः अपमानास्पद पद्धतीने बाहेर काढण्यात आलेले सर्व जगाने बघितले होते. त्या बैठकीतच चीनचे नवीन पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री लष्कर प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. या सर्व व्यक्ती शी जिनपिंग यांच्या विश्वासातील मानल्या जात होत्या.
हू जिंताओ यांनीच पुढे आणलेले चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांचे आता निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर चीनमधील व्हॉट्सअॅपचे प्रतिरूप असणार्या ’वुई चॅट’वर काही तासात लाखो चिनी लोकांनी ली केकियांग यांना श्रद्धांजली वाहिल्याचेे दिसून आले होते. पण हा आकडा चिनी सरकारने दाबून टाकल्याचा आरोप होतो आहे. चीनची सामान्य जनता अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर सध्या प्रचंड नाराज असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेही ली केकियांग यांच्या मृत्यूनंतर लोकांनी चीनमधील दोन ठिकाणी आयोजित केलेल्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात ली केकियांग यांच्या फोटोला असंख्य प्रमाणात फुलांचे गुच्छ वाहिल्याचे दिसून आले.
चीनच्या पोलादी पडद्यामागील घटनांचे अन्वयार्थ लावणे अवघड असतानाच चीनच्या माजी पंतप्रधानाच्या मृत्यूची बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे चीनच्या गूढ राजकारणात या बातमीचा मागोवा घेताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे एखाद्या सरळ असू शकणार्या घटनेकडेही आता सरसकटपणे शंका घेतली जाऊ शकते, अशी परिस्थिती आहे. चीनमध्ये तसे बघितले, तर वय वर्षे ८० पर्यंत साधारणपणे लोकांचे आयुष्य असते. त्यामुळे वय वर्षे ६८ असणार्या ली केकियांग यांच्या मृत्यूकडे बघावे लागते.
शांघायमधील एका तारांकित हॉटेलमधील तरण तलावात पोहायला ली केकियांग उतरले असताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगण्यात येते. सध्या चीनमध्येही भारताप्रमाणेच ऑक्टोबरचे उष्णपर्व संपून हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे. या ऋतूबदलात अनेकजण आरोग्याच्या अचानक उद्भवणार्या समस्येला बळी पडतात. त्यामुळे ली केकियांग यांचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचा दावा केला जात असला तरी त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूबद्दल चीनमध्येही चर्चा आहे असे सांगतात. या चर्चेचा रोख हा ‘शी जिनपिंग‘ यांच्या राजवटीबद्दल असंतोष व्यक्त करूनच थांबतो असे दिसते आहे.
‘कोविड’ विषाणूच्या चीनमध्ये पसरलेल्या साथीनंतर शी जिनपिंग यांनी जी ’झिरो कोविड’ मोहीम राबविली होती त्यामुळे चीनमधील सामान्य जनता आणि अनेक उद्योग चालविणारे अत्यंत त्रस्त झालेले होते. पण शी जिनपिंग यांच्या विरुद्ध बोलण्याची कोणाची टाप न्हवती. पण ली केकियांग यांनी ’झिरो कोविड’ विरोधात सूर लावण्याचा प्रयत्न केलेला होता. ली केकियांग तसे बघितले तर कोणताही व्यक्तिगत ’करिष्मा’ नसणारे राजकारणी होते. ते कायम ’लो प्रोफाईल’ व्यक्ती म्हणूनच वावरताना दिसले. पण कम्युनिस्ट पक्षातील त्यांचा अनेक वर्षांचा दांडगा अनुभव असल्याने ते बरीच वर्षे राजकीय पटलावर राहिले. किंबहुना ’हू जिंताओ’ यांच्या कार्यकाळानंतर त्यांच्याकडेच चीनची धुरा येईल, असे बोलले जात होते. म्हणूनच मागील वर्षी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत त्यांना दूर सरण्यात आले आणि निवृत्त करण्यात आलेले होते.
चीनचे एकेकाळचे अमेरिकेतील राजदूत असणारे आणि नंतर परराष्ट्र मंत्रिपदावर आरूढ झालेले शी जिनपिंग यांच्याच विश्वासातील ‘किन गँग‘ यांना अचानक त्यांच्या परराष्ट्रमंत्रिपदावरून दूर करण्यात आलेले होते. जुलै महिन्यात सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अनुपस्थित असणारे चीनचे परराष्ट्रमंत्री ‘किन गँग‘ यांच्या अनुपस्थितीबद्दल चीनच्या सरकारकडूनच त्यानंतर सुमारे पाच आठवड्यानंतर अधिकृत वक्तव्य आले होते. ’किन गँग’ यांना त्यांच्या चीनच्या परराष्ट्र मंत्रिपदावरून हटविण्यात आले असल्याबद्दल घोषणा करण्यात आली होती. त्यांच्या परराष्ट्रमंत्रिपदाच्या जागी चीनचे जुने परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या फेर नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी चीनमधील सरकारच्या अधिकृत प्रवक्त्यांची किन गँग यांच्या अनुपस्थितीबद्दल उत्तरे देताना तारांबळ उडत होती. किन गँग यांना हटविण्यामागची कारणे कोणती याबद्दल संपूर्ण मौन बाळगले गेले होते. सुरुवातीला काही दिवस किन गँग हे आजारी असल्याचे सांगण्यात येत होते. नंतर त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे सांगण्यात येत होते.
नंतर चीनचे संरक्षणदल प्रमुख ली शांग फू यांनाही त्यांच्या पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आलेले होते. चीनचे संरक्षणदल प्रमुख ली शांग फू यांच्याबाबतीत घडली होती. ली शांग फू यांनी संरक्षण खात्यासाठी खरेदी करताना प्रचंड भ्रष्टाचार केला असल्याचे सांगण्यात येत होते.
शी जिनपिंग यांना आव्हान देऊ शकणारे कम्युनिस्ट पक्षातील आणि सरकारमधील एक एक मोहरे गळून पडताना दिसत आहेत. जियांग झेमीन यांचे निधन झाले होते. नंतर हू जिंताओ यांना अपमानास्पद रीतीने पक्षाच्या केंद्रीय बैठकीतून बाहेर काढण्यात आले होते. ली केकियांग हे कायदा आणि बिझनेसमध्ये बीजिंग विद्यापीठातील दुहेरी पदव्युत्तर शिक्षित असे व्यक्तिमत्व होते. चिनी कम्युनिस्ट पक्षातील दुर्मीळ असे ते उच्चशिक्षित राजकारणी नेते होते. एका दशकाच्या राजकारणातील विविध जबाबदार्या पार पाडल्यानंतर सुमारे सात महिने ते राजकारणापासून दूर होते. त्यांनी मुक्त व्यापाराला पाठिंबा दिला होता. पुरवठा साखळीच्या सुधारणा आणि आधुनिकतेला त्यांनी पाठिंबा दिला होता. चीनमधील ६० कोटी सामान्य जनतेचे एका महिन्याचे उत्पन्न १४० अमेरिकन डॉलर्स आहे असे ली केकियांग यांनी साल २०२० मध्ये केले होते. ली केकियांग यांच्यामागे त्यांची पत्नी चेंग हाँग आणि एक कन्या आहे.