करण जोहर बनवणार 'झिम्मा'चा हिंदी रिमेक, दिग्दर्शक हेमंत ढोमेने केला खुलासा
22-Nov-2023
Total Views | 36
मुंबई : बायका एका छताखाली राहू शकत नाहीत ही संकल्पना खऱ्या अर्थाने दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या 'झिम्मा' आणि 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या माध्यमातून मोडित काढली आहे. करोनानांतर प्रदर्शित झालेल्या पहिल्या झिम्मा या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात ओढून आणले. प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळेच आता 'झिम्मा २' प्रदर्शित होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी झिम्मा चित्रपटाचा करण जोहर हिंदी रिमेक बनवणार असून स्टारकास्टही निश्चित झाल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्ताबाबत दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांनी लोकमत फिल्मीमध्ये खुलासा केला आहे.
याबाबत हेमंत ढोमे म्हणतात, ''हे खरंय. यावर चर्चा सुरू आहेत. मी स्पष्टपणे नकार देणार नाही. क्षिती आणि करण जोहर सरांनी यांनी नुकतेच रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये एकत्र काम केले आहे. त्या काळात याबद्दल त्या दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. त्यादरम्यान बाहेर असं पसरलं की झिम्माचा हिंदी रिमेक येणार आहे आणि त्यातील कलाकारांची निवडदेखील झाली आहे. मात्र कास्टिंगच्या वृत्तात अजिबात तथ्य नाही. ही निव्वळ अफवा आहे. पण याबद्दल आता मी जास्त काही सांगू शकत नाही.''
तर क्षिती जोग म्हणाली की, ''कास्टिंगबद्दल पसरलेली चर्चा खोटी आहे. एवढ्यात तरी काही नाही. येत्या वर्षात किंवा २०२४ मध्ये हा चित्रपट येईल, हे शक्य नाही. बायकांची गोष्ट असल्यामुळे यावर चित्रपट कोणत्याही भाषेत बनला तरी माझी काही हरकत नाही. ही कथा आणि पात्र तेवढ्याच प्रामाणिकरित्या मांडता आली तर मला चित्रपटाची कलाकार आणि निर्माती म्हणून खूप आनंद होईल. ही गोष्ट अजून वेगळ्या भाषेतील वेगळ्या बायकांनी जरुर पाहावी.''
दरम्यान, झिम्मा २ हा चित्रपट २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुत्रिचा बांदेकर, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकु राजगुरु यांच्या प्रमुख भूमिका आहेत.